श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प एकोणतीसावे - श्री गणेश आप्पा आणि चंद्रा बाई

शेगांव (वि.प्र.) - अमरावती येथील भक्तांमध्ये गणेश आप्पा यांना विसरून चालणार नाही. त्यांनी महाराजांची मनोभावे सेवा केली. पती-पत्नी दोघेही महाराजांचे भक्त. दोघांचीही महाराजांवर कमालीची निष्ठा होती. गणेश आप्पांचे समर्पण देखील बावनकशी सोन्यासारखे. 
शके १८२८, अश्विन शुद्ध दशमी, दि. २७.०९.१९०६ रोजी दादासाहेब खापर्डे यांच्या विनंतीवरून महाराजांनी त्यांच्या घरी येण्याचा होकार दिला. त्याप्रमाणे दादासाहेबांनी त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवास म्हणजे बाबासाहेब यांना भोजनाची तयारी करण्याचा तातडीने निरोप दिला.खापर्डे यांनी आपल्या भव्य वाड्यात महाराजांना सन्मानाने आणले. पूजा-अर्चा झाली. या श्रीमंत व मान्यवर लोकांच्या घरी महाराजांच्या पूजनाचा जो कार्यक्रम झाला, त्या समारंभात गणेश आप्पा आणि त्यांची पत्नी चंद्राबाई हजर होते. नावलौकिक असलेल्या व त्याला वैभवाची जोड असलेल्या बड्या नामांकित लोकांना वाटणारा महाराजांविषयीचा भक्तीभाव, त्यांनी केलेले पूजन व त्यासोबतचा अन्नदानाचा अमृतसोहळा बघून गणेश आप्पांना महाराजांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना आली. तो आनंदाचा सोहळा पाहून दोघेही मंत्रमुग्ध झाले. अनंत जन्माच्या पुण्याईने अशा थोर अवतारी संताची भेट झाली, असे त्यांना वाटू लागले. 
गणेश आप्पांची पत्नी चंद्राबाई फार धार्मिक होती. मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी महाराजांचे पूजन झाले. महाराजांसारख्या देवपुरुषाला आपण देखील आपल्या घरी नेऊन त्यांची पूजा करावी, असा विचार तिच्या मनात आला. तिने आपल्या पतीस हा विचार बोलून दाखवला.
पण महाराजांना आपल्या घरी येण्यासाठी विनंती करण्याची गणेश आप्पांची हिंमत होईना. तोच महाराज उठले आणि गणेश आप्पांचा हात धरून म्हणाले, "तुझे घर किती दूर आहे? ते मला सांग. मला तुझ्या घरी येऊन काही वेळ बसावे असे वाटते. अरे ! चित्तात असेल ते कोणाचीही भीड न धरता बोलले पाहिजे." महाराजांनी आपल्या चित्तातील इच्छा ओळखली व ते स्वतःहून आपल्या घरी यायला तयार झालेत. हे पाहून दोघेही पती-पत्नीचा आनंद शब्दात न लिहिता देण्याजोगा होता. श्रीमंत भक्ताकडून आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे महाराजांनी त्यांच्या मनातील भाव ओळखून जावे, या गोष्टीवरून महाराजांच्या देवत्वाची ओळख पटते. महाराजांच्या सर्वव्यापी कृपाळूपणाची यापेक्षा दुसरी साक्ष कोणती बरे असणार ? महाराजांना घेऊन गणेश आप्पा आपल्या घरी गेले. दोघांच्याही मनाला आनंदाचे भरते आल्यासारखे झाले. अमृताचा कुंभ सापडावा असे त्यांना झाले. घरी नेऊन उभयतांनी मनोभावे महाराजांची पूजा केली. आज त्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवंत आला होता. त्याने त्यांची पूजा स्वीकारली होती. पाद्यपूजा करून दोघेही हात जोडून महाराजांसमोर उभे राहिले. देवावर श्रद्धा ठेवा, असे बोलत महाराजांनी हात लावून दोघांनाही आशीर्वाद दिला. समर्थांची पूर्ण कृपा त्यांच्यावर झाली. त्याक्षणीच त्यांनी आपला संसार महाराजांच्या चरणी अर्पण केला. 
अमरावतीवरून महाराजांसोबतच गणेश आप्पा आणि बाळाभाऊ हे आले. एका दर्शनाने भक्ताचे जीवन उद्धरावे अशी महाराजांची कृपा ! असा त्यांचा अधिकार ! गणेश आप्पा आणि चंद्राबाई यांनी महाराजांच्या सेवेत जीवन अर्पण केले. गणेश आप्पा शेगावात महाराजांच्या मठात राहूनच सेवा करीत. गणेश आप्पांनी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांची भक्ती जोपासली. अशी निष्ठावंत भक्ती, त्याग, समर्पण आजकाल समाजात अभावानेच सापडतो. खरा संत आणि खरा भक्त दिसणे, सापडणे हे अनंत जन्मांच्या पुण्याइचे प्रतीक आहे.
श्री गणेश आप्पा - चंद्राबाई आणि इतर गजानन महाराज भक्तांच्या अधिक माहितीसाठी 'श्री दासभार्गवजी लिखित श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.