अपघात होऊनही काहीच उपाययोजना नाही .!
भद्रावती (ता.प्र.) - शहरातील मुख्य रस्ता आणि चंद्रपूर-नागपुर हायवेला असलेल्या सर्विस रस्त्याचा वापर हा रस्त्यालगत असलेल्या दुकानाचे सामान किंवा गाड्या ठेवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे अनेकदा सर्विस रस्त्यावरून शहरातील वेगवेगळ्या वार्ड मुख्यत्वे गौतम नगर भागात प्रवेश करतांना अडचन निर्माण होत आहे शिवाय रस्त्यावर दुकाने, गाड्या उभ्या ठेवल्यामुळे अपघात सुद्धा होत आहे.
याबाबत पोलिस ठाणे, भद्रावती येथे नुकतेच रूजु झालेले ठाणेदार यांना वेगवेगळ्या संघटनांनी, सामाजिक संस्थांनी भेटुन, पत्र देऊन भरधाव दुचाकी चालवणाऱ्यांवर तसेच ऐन रस्त्यावर गाड्या उभ्या करणाऱ्यावर कारवाई करून शिस्त लावावी यासाठी निवेदन दिले. परंतु अजुनही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसुन येत नाही.
नुकत्याच गौतम नगर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. त्याला जबाबदार फक्त भरधाव चालणारी दुचाकी आणि चारचाकीच नसुन सर्विस रस्त्यावरील अतिक्रमण तेवढेच जबाबदार आहे.
भविष्यात असे पुन्हा अपघात होऊ नये आणि रहदारिला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासन आणि वाहतुक विभाग यांनी मिळुन शहरातील दुचाकी, चारचाकी तसेच दुकानदार यांना शिस्त लावावी अशी अपेक्षा भद्रावतीकर करित आहे.