श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प - अडतीसावे - श्री. व्रजभूषण महाराज

शेगांव (वि.प्र.) - दर्यापूरहून पाच ते सहा कि. मी. अंतरावर काटेपूर्णा नदीच्या काठावर वसलेले शिवर हे एक लहानसे खेडेगाव. शेगावहून अकोटमार्गे दर्यापूर व तेथून शिवर असे हे ९७ कि. मी. इतके अंतर आहे. गजानन महाराजांचे समकालीन श्री परमहंस महाराज शिवर येथे राहत असत. त्यांचे वास्तव्य शिवमंदिरात असे. त्यांच्याकडे श्री गजानन महाराज जात असत.
याच गावाबाहेर रोकडीया हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. या रोकडीया हनुमंताची आणि वारी येथील हनुमंताची स्थापना एकाच दिवशी झाली असे गावकरी सांगतात. अशा या शिवर गावात व्रजभूषण नावाचे विद्वान पंडित राहत असत. व्रजभूषण मूळचे १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी होते. ते शिवरमध्ये येऊन राहिले. त्यांच्या गावाचा व नावाचा सुगावा त्यांनी गावकऱ्यांना कधीही लागू दिला नाही. त्यांना चार ते पाच भाषा अवगत होत्या. विद्वत्तेबाबत त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती. ते सुर्योपासक होते. प्रतिदिनी प्रातःकाळी नदीवर जावून, स्नान करून ते सूर्यास अर्घ्य देत असत. त्यांचे अखंड व्रत होते.
एकदा श्री गजानन महाराज सुप्रभाती शिवरला नदीकाठी जाऊन शिष्यांसवे ब्रह्मानंदी डोलत बसले होते. व्रजभूषण सूर्यास अर्घ्य देत असता त्यांच्या समोर समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज उभे राहिले. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानबाहू,दृष्टी नासाग्री स्थिर अशी योगमाऊली समोर उभी पाहताच व्रजभूषणांना अतिशय आनंद झाला. ते महाराजांजवळ धावतच आले व त्यांच्या पायावर अर्घ्य देऊन प्रदक्षिणा घातली, द्वादश नमस्कार घातले, आरती ओवाळली आणि प्रार्थनापूर्वक नमस्कार करून ते स्तवन करू लागले, " माझ्या तापचरणाचे फळ मला आज खऱ्या अर्थाने मिळाले आहे. या दिव्यचरणाचे दर्शन घेऊन मी धन्य झालो. आकाशातल्या सूर्यास अर्घ्य देत असतांसमयी युगानूयुगे अवतार घेणाऱ्या ज्ञाननिधी योगेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडले. आपल्या नुसत्या दर्शनाने भाविकांची घोर भावसागरातून मुक्तता होते, तेव्हा "हे जगदीश्वरा, मजवर कृपा करा!" सद्गुरू श्री गजानन महाराजांनी व्रजभूषणांना दोन्ही हाताने दृढ आलिंगन दिले. आई आपल्या मुलास जसे प्रेमाने पोटाशी धरते तसे व्रजभूषणांना कवटाळले व त्यांच्या मस्तकावर हात ठेवून , "तुझा सर्वदा जयजयकार होईल!" असा त्यांना आशीर्वाद दिला आणि कर्ममार्गाचे रहस्य कथन केले.
महाराजांना कर्माचा त्याग करणे मान्य नाही, कर्मफलाची आशा मान्य नाही. कर्मबंधनही मान्य नाही. कर्म करताना फलाच्या आशेने केल्यास वैफल्य निर्माण होते. त्यासाठी कर्म करताना मनात ईश्वरीय हेतू ठेवून कार्य केले पाहिजे म्हणजे वैफल्य किंवा निराशा यांचे भय टळेल. कर्मात ईश्वरीय पूजेचा, भक्तीचा चालता बोलता अनुभव येईल. कर्म ही ब्रह्मविद्येची प्रतिष्ठा आहे. कर्म हेच ब्रह्म आहे या भावाने, तन्मयतेने, एकाग्रतेने ते केले जाणे अगत्याचे आहे. केवळ करावयाचे आहे म्हणून कर्म करू नये. कर्म म्हणजे केवळ क्रिया नसून ते ब्रह्मप्राप्तीचे द्वार आहे. कर्म व भक्तीचा अविभाज्य संबंध मात्र साधता आला पाहिजे. कर्म जेवढ्या तन्मयतेने केले जाईल तेवढ्या जोमाने ईश्वराच्या चरणी ते एककेंद्रित होऊ द्यावे. कर्माचा उद्देश व भाव म्हणजेच कर्माचे मर्म होय. कर्मात इतके सामर्थ्य आहे की त्यामुळे ईश्वर लगेचच वशीभूत होतो. कर्म कोणतेही असले तरी त्याच्या मागील उद्देश व भाव जास्त महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अंतरबाह्य उन्नती होऊ शकते. केलेल्या कर्माचा मोबदला तर मिळणार आहे परंतु त्यामागे जर ईश्वरीय भाव नसेल तर त्यातून आनंदाची, शांतीची प्राप्ती होऊ शकणार नाही. कर्म करणारा संसारी असो वा संन्यासी, कर्मात भेद नसावा. महाराजांना कर्म त्याग मान्य नाही तर कर्तेपणाचा त्याग अपेक्षित आहे. कर्तेपणाच्या अहंकाराने माणूस खाली खाली घसरतो, कर्म बंधनात पडतो. कर्म जर भक्ती भावाने केले गेले तर तेथे श्रेणीला स्थान उरणार नाही, महत्त्व राहणार नाही.
समतत्त्व भावाने कर्म करणे म्हणजे योग. असे समतत्त्व जेव्हा सुरू होते तेव्हा आपोआपच योग देखील साधला जातो. मग तेथे आसनांची व साधनांची भानगड उरत नाही. योगाचे लक्ष्य देखील समतत्त्वाची प्राप्ती हेच आहे. समतत्व कर्माने ही साधले जाऊ शकते. यात नवल नाही. बऱ्याच संत, महंतांनी ते साधले आहे. ब्रह्म जर सम आहे, जर ते चराचरात भरलेले असून भेदरहित आहे तर आपला व्यवहार, वर्तणूक कशा प्रकारची आहे, आपण ब्रह्मतत्वाचा अंगीकार केला आहे का याचे मूल्यमापन आपल्या कर्मावरून करता येते. आपल्या दृष्टीने ते चांगले वाईट ठरवता येईल ही. पण त्याचे ठाई सम अवस्था असल्याने त्याला पाप-पुण्य हा दोष राहणार नाही. आपल्या वाट्याला आलेले वर्तमान कर्म प्रामाणिकपणे केले गेले पाहिजे. नुसते पुस्तकी पांडित्य तेथे उपयोगाचे ठरणार नाही. ते आचरणात दिसून आले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारात, वागण्यात त्याचप्रमाणे प्रत्येक कृतीतून ते दिसले पाहिजे. आपले प्रत्येक कर्म ब्रह्माशी निगडित आहे याची जाणीव आपल्याला पावलोपावली झाली पाहिजे. महाराज व्रजभूषांना म्हणतात, "विधी निरर्थक मानू नकोस!" विधी म्हणजे पद्धत. त्या विधीचे लक्ष, ध्येय काय आहे? यावर वृत्ती स्थिर झाली पाहिजे. तेव्हा विधी म्हणजे आपल्या इष्ट प्राप्तीची पद्धत समजावी. येथे इष्ट म्हणजे फळ नव्हे तर इष्ट म्हणजे केवळ ईश्वर. तेव्हा विधी हा भावपूर्ण, श्रद्धापूर्ण व प्रेमपूर्ण असला पाहिजे. केवळ विधीच महत्त्वाचा नसून त्या विधीसोबत अंत:करणाचा भाव प्रवाहित झाला पाहिजे. आपण त्या विधीत विधिपूर्वक बांधले जाण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच महाराज म्हणतात " कर्म व विधी यामध्ये गुंतून राहू नकोस!".
कर्म त्यागून नव्हे तर भोगून मुक्त व्हावे कारण कर्म त्यागुन मुक्त होता येत नाही. तो भोगूनच मुक्त होणे श्रेयस्कर ठरते. जेव्हा आपण कर्म त्यागणाचा प्रयत्न करू तेव्हा ते समोर उभे ठाकेल. त्याचे स्वरूप जरी बदलले तरी हे कर्म करावेच लागेल. तेव्हा कर्माला डावलण्याचा प्रयत्न करू नये. महत्त्वाचे एवढेच की त्यातून फलप्राप्तीची आशा करणे टाळले पाहिजे. केवळ ईश्वरी भावाने कर्म करावे, तसे केल्याने कर्मबंधन पडणार नाही. कर्म जर सकाम असेल तर जे मिळवायचे आहे ते मिळेलच, परंतु ईश्वरी आनंद भोगता येणार नाही.
दैनंदिन जीवनातील कोणतेही कर्म ब्रह्माशीच निगडित असते, ईश्वराशीच निगडित असते व ते तशा विधीनेच करावे. भोजन करीत असतानाही ते ब्रह्मभावाने करावे. अन्न हे ब्रह्म आहे व शरीर हे यज्ञकुंड आहे. आपण शरीरातील आत्म्यास त्याचे हवन करीत आहोत असा भाव मनामध्ये धरून ब्रह्माच्या आहुती पडत आहेत असे समजावे. मग प्रत्येक क्रिया ब्रह्ममय होण्यास वेळ लागणार नाही. जे जसे असेल ते ईश्वराचे व ते ईश्वरास अर्पण होत आहे. प्रत्येक कृती जर अशा भावाने केली गेली तर जीवनाचे सार्थक झाले असे समजता येईल. त्याचा व्यवहार व कृती सर्वकाही ईश्वर रूप होईल. फक्त हे कार्य भक्तीपूर्वक घडणे जरुरीचे आहे. प्रत्येक कृतीतून ईश्वराचे स्वरूप नुसते भासमान नव्हे तर दृश्यमानही होईल. तेव्हा प्रत्येक कर्म हे भावपूर्ण, भक्तीपूर्ण विधीने करावे असे महाराज सांगतात त्यामागील रहस्य हेच आहे. सद्गुरूंनी शिवर येथील व्रजभूषणांना जो उपदेश केला त्याचा अंगीकार करणे तितकेसे कठीण नाही कारण महाराजांनी सर्वकाही सहजसाध्य व सोपे करून सांगितले आहे.
व्रजभूषण हे केवळ कर्मठच नव्हते तर ते ज्ञानी व विद्वान म्हणून लोकमान्यता पावलेले होते. अशा या थोर गजानन महाराज भक्ताने,व्रजभूषणाने शिवर येथे शके १८२२ (इ. स. १९००) मध्ये समाधी घेतली.
श्री व्रजभूषण महाराज आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.