शेगांव (वि.प्र.) - बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या मेहकर तालुक्यातील साखरखेर्डा या छोट्याशा खेडेगावातील बंडूतात्या पांडुरंग दंडे यांचा जन्म १८-०१-१८४५ साली झाला. बंडू तात्या सदाचार संपन्न, मनाने अत्यंत उदार असे ब्राह्मण गृहस्थ होते. औदार्य हे त्यांच्या गृहस्थ जीवनाचे वैभवच म्हणावे असे त्यांचे वर्तन असे. आपले गृहस्थ जीवन ते आनंदात जगत होते. त्यांच्या मनातील 'अतिथी देवो भव' हा भाव येणाऱ्या जाणाऱ्यांचे आदरातिथ्य करण्यातून जाणवत असे, या कारणाने त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना कशाचीही कमतरता नव्हती. सुखसंपन्न प्रापंचिक जीवनात प्रत्येकास जशा अनेक अडचणी येतात तशा बंडू तात्यांनाही येत असत पण त्यांची जगण्याची धडपड काही थांबली नाही. घरातील खर्च वाढत होता. एके वर्षी त्यांना त्यांच्या कापसाच्या धंद्यात अतिशय नुकसान झाले. पैशाचा संचय संपला, तरीही पै पाहुण्यांच्या आतिथ्यात, सरबराईत त्यांनी कमतरता केली नाही.
अवास्तव खर्चामुळे आणि कापसाच्या धंद्यातील तोट्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज काढावे लागले. पुढे घरदार शेती गहाण ठेवली गेली. लोकांना तोंड दाखवण्याची त्यांना लाज वाटू लागली. घरातील भांडीकुंडी, चीजवस्तू विकूनही कर्ज शिल्लक राहिले. सावकाराची तयारी सुरू झाले. घरात अन्नाचा कण नव्हता. तसेच कोणी त्यांना पैसेही उसने देईनात. बायको मुलं संतापून चिडचिड करू लागले. अपमानास्पद बोलू लागली. सावकाराचे शिपाई वरचेवर पैसे मागू लागले. बंडू तात्यांना जगणे लाजिरवाणे वाटू लागले. अशा अपमानात्मक परिस्थितीत "जगण्यापेक्षा मरण बरे" असे बंडूतात्यांना वाटू लागले आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला.
पुढे सर्व घटना श्री दासगणू महाराज लिखित 'श्री गजानन महाराज विजय ग्रंथात' सविस्तर नमूद करण्यात आली आहे. श्री गजानन महाराजांनी बंडूतात्या योग्य उपदेश करून सन्नतीच्या मार्गावर आणले.
महाराजांना उसने वैराग्य मान्य नाही. प्रपंचात असून जी मानसिक स्थिती व अवस्था निर्माण होते ते वैराग्य नाही. अशा स्थितीत हा प्रपंच जर त्यागला तर त्यातून काही निष्पन्न होत नाही. अनासक्तीच जर निर्माण झाली असेल तर प्रश्नच वेगळा.
दुसरे असे की या अडचणींना वैतागून जीव दिला तरी ऋणातून तो मुक्त होत नाही. ते ऋण फेडण्यासाठी पुन्हा जन्माला यावे लागते व ते ऋण फेडून मुक्त होता येते. भोग हे त्यागून नव्हे तर भोगून मुक्त होता येते.
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बंडूतात्या साखरखेर्ड्यास घरी परत आले. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी कोणासही, काहीही न सांगता साखरखेर्डाहून अंदाजे तीन किलोमीटर दूर असलेल्या (शेत सर्वे क्रमांक १३०) त्यांच्या मळ्यातील म्हसोबापाशी घेऊन पूर्व दिशेस बाभळीच्या झाडाखाली खोदू लागले. खोदताना जमिनीत सुवर्ण मोहरांनी भरलेली एक तांब्याची घागर लागली. बंडूतात्या तिथेच आनंदाने नाचू लागले व मुखाने "जय जय गजानन गुरुराया" असे म्हणू लागले. सुवर्ण मोहरांचा हंडा घेऊन ते घरी आले. त्या हंड्यात ४०० सुवर्ण मोहरा भरलेल्या होत्या. मोहरा विकून त्यांनी अवघे कर्ज फेडले. गहाण असलेला मळाही सोडवला. बंडूतात्यांच्या संसाराची घडी चांगल्या रीतीने बसली. श्री गजानन महाराजांच्या कृपेने बंडूतात्याची वृत्ती आनंदून गेली. मृत्यूची घटका येता हातात अमृताचा कुंभ यावा किंवा समुद्रात बुडताना नाव किंवा होडी हाती यावी अशी त्यांची आनंदमयी अवस्था झाली. त्यांचे दुःखाचे दिवस संपले. अशा तऱ्हेने श्री गजानन महाराजांनी बंडूतात्यांचे दैन्य दूर केले.
महाराजांच्या दर्शनासाठी बंडूतात्या शेगाव येथे आले. तिथे त्यांनी बराच दानधर्म केला. महाराजांना ते अनन्यभावाने शरण आले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले,'अरे! मला का वंदन करतोस? ज्या परमेश्वराने तुला मोहरांची घागर दिली त्यालाच वंदन कर! आता यापुढे सांभाळून खर्च कर! उधळेपणा करू नकोस! उधळेपणात काही एक अर्थ नसतो. सर्व नातेवाईक, आप्तजन सुखाचे सोबती असतात. निर्वाणीचा मात्र एक परमेश्वरच व तोच संकट समय कामी येतो. सदैव ईश्वराची भक्ती कर. तो तुझी उपेक्षा कधीही करणार नाही'. पुढे महाराजांच्या आज्ञेनुसार बंडू तात्यांनी संसार धर्माचे पालन केले व राहिलेले आयुष्य महाराजांच्या चिंतनात घालविले. बंडूतात्यांचा मृत्यू साखरखेर्डा येथे दिनांक ०९-१०-१९२५ रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी झाला.
महाराजांना संसारात उधळेपणा मान्य नाही आणि कृपणताही मान्य नाही. उधळेपणा म्हणजे अनाठायी व अवाजवी खर्च. उधळेपणातून काही निष्पन्न होत नाही. म्हणून अनावश्यक व जास्तीचा असा खर्च टाळला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट महाराज सांगतात ती म्हणजे जन हे सुखाचे सोबती असतात. धनसंपत्ती गेली की कोणीही आपणास ओळखत नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंतच ते हाजी हाजी करीत असतात मात्र स्वार्थ साधला गेला की ते आपल्यापासून दूर निघून जातात. तेव्हा महाराज " विवेक बुद्धीने प्रपंच करा" असा सल्ला देतात.
श्री बंडूतात्या दंडे आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पाहावा.