शेगांव (वि. प्र.) - काशिनाथ खंडेराव गर्दे हे शेगाव जवळील खामगाव येथील रहिवासी. ते ब्राह्मण घराण्यातले होते. महाराजांची स्वारी खामगावला गेली की त्यांना महाराजांच्या दर्शनाचा लाभ होत असे. अधून-मधून तेही महाराजांच्या दर्शनाला शेगाव येथे येत असत.
काशिनाथ गर्दे हे रामानंद बिडकर यांचे भक्त. त्यांनी बिडकर महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. त्याचप्रमाणे ते गजानन महाराजांना सुद्धा गुरुस्थानी मानत असत.
सन १९०५ मध्ये एकदा ते दर्शनासाठी शेगाव येथे गेले. त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. तेव्हा महाराजांनी अनपेक्षित अशी लीला केली.
"तो समर्थांनी लीला केली | कोपरखळी मारीली | काशिनाथाच्या पाठीस भली | आपल्या परम कृपेने ||" (१९/०९) आणि त्यास म्हणाले, "जा, तुझा हेतू पूर्ण झाला. तारवाला तुझी वाट पाहत आहे." महाराजांच्या त्या असंबद्ध बोलण्याने काशिनाथ मनातून घोटाळले. त्यांनी विचार केला की मी मनात काहीही हेतू घेऊन आलो नाही. त्यामुळे याचा अर्थ काय असावा? घरी पोहोचताच त्यांनी दारात तारवाला शिपाई उभा असलेला पहिला. त्यांनी घाईघाईने तार घेतली. तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मोर्शी येथे आपली मुन्सफीच्या हुद्द्यावरती नेमणूक झाली आहे. असा मजकूर तारेत होता. त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. महाराजांनी पाठीत मारलेल्या कोपरखळीचा अर्थ कळला होता. महाराजांचं ज्ञान किती श्रेष्ठ आहे, याची प्रचिती त्यांना आली. या प्रसंगाने त्यांची महाराजांवर अतिशय श्रद्धा बसली.
काशिनाथ गर्दे यांच्यावर महाराजांची अतिशय कृपा होती. पुढे त्यांना सतत बढती मिळत गेली. १९२५ मध्ये नागपूर येथे ते सब-जज होते. अशी असते संतांची कृपा. ज्यांच्यावर संतांची कृपा होते, त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. अशा या भक्ताचे महाराजांच्या एका कोपरखळीने कल्याण केले.
श्रीगजानन महाराज अंतर्ज्ञानी होते. भक्तांच्या मनातील इच्छा महाराजांना आपसूकच कळत असतात. महाराज शंकराप्रमाणे साधे भोळे ,लवकर प्रसन्न होणारे असे दैवत. त्यांची कृपा व्हावी यासाठी कोणतीही पूजा, आराधना करावी लागत नसे. मनात फक्त शुद्ध भाव असला की पुरे. आजही महाराजांचे सूत्र तेच आहे. ते मागितल्याबरोबर देतात. भक्ताची योग्यताही पाहत नाहीत. मागितल्याबरोबर तत्क्षणीच देऊन टाकतात व हळूहळू त्याला भक्तिमार्गात आणतात. देवी-देवता योग्यता पाहतात. परीक्षा घेतात व तोलून मापून कृपा करतात. महाराजांचे तसे नाही. त्यांचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. ते सर्वाधिकारी आहेत. प्रत्यक्ष जीवनात अनेक भक्तगण हे अनुभव आजही घेतात. महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी जाहीरपणे सांगितले आहे की,'मी गेलो असे मानू नका! मी येथेच आहे फक्त भक्तीत अंतर पडू देऊ नका. ज्याला माझी गरज असेल तो माझ्याकडे येईल. इतरांची मला जरुरी नाही. जे लोक म्हणतात की,'आमची वर त्यांची कृपा नाही त्यांची कारणे त्यांनी शोधावीत व आपले नेमके काय चुकते? यावर लक्ष द्यावे. महाराजांना सर्वार्थाने शरण यावे व त्यांची कृपा करून घ्यावी.
काशिनाथ खंडेराव गर्दे आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.