आदिवासी समाज म्हणजे सात्विकता, पराक्रम आणि परिश्रमाचे प्रतीक - आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (वि.प्र.) : आदिवासी समाज हा केवळ आपल्या सात्विक जीवनशैलीसाठीच नव्हे, तर पराक्रम आणि अथक परिश्रमासाठीही ओळखला जातो. निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा, परंपरा, संस्कार आणि निष्ठा जपणारा हा समाज देशाच्या विकास प्रवासात मोलाचा वाटा उचलतो. देशाच्या राष्ट्रपती मा. द्रौपदीजी मुर्मू यांच्या नेतृत्वातून आदिवासी भगिनींना आणि समाजाला मिळालेला आत्मविश्वास हा अभिमानाचा विषय आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक आदिवासी दिवसानिमित्त पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमात केले.


जागतिक आदिवासी दिवसानिमित्त पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे जिल्हाप्रमुख जगन येलके, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,सचिव हरी कोडापे, महिला अध्यक्षा उषाताई आलाम, महादेव मडावी, कवडू मडावी, कांता मडावी, गीताताई कुळमेथे, गीताताई कोवे, भीमराव मरसकोल्हे, सामाजिक कार्यकर्ता गणेश परचाके तसेच समाजाच्या महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


आमदार श्री. मुनगंटीवार यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत आपला आनंद व्यक्त केला. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी एवरेस्ट शिखर सर केले, ही शक्ती त्यांच्या अंगी जन्मजात आहे. योग्य संधी मिळाल्यास हेच विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जागतिक पातळीवर झेंडा फडकवू शकतात. आदिवासी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे त्यांच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हीच खरी प्रगती असेल, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
कष्टकरी व पराक्रमी आदिवासी समाजाच्या कल्याण, विकास आणि हक्कांच्या रक्षणासाठी सदैव खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमात आदिवासी भगिनींनी आमदार श्री. मुनगंटीवार यांना राखी बांधून आपुलकीचा मान व्यक्त केला आणि रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा उत्साहात साजरा झाला.

-----------------------

माझ्या विजयात लाडक्या बहिणींचा अमूल्य वाटा-आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर -लाडक्या बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादामुळेच मी आज जनसेवेसाठी सक्षमपणे उभा आहे. माझ्या विजयात लाडक्या बहिणींचा अमूल्य वाटा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर नाट्यगृहात, भाजपा बल्लारपूर तालुकाद्वारा आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष रणजयसिंग, महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई जोशी, आरती अक्केवार, कांताबाई ढोके, शिवचंद्र द्विवेदी, जयश्रीताई मोहूर्ले, संध्याताई मिश्रा, रेणुकाताई दुधे, सारिका कणकम, किशोर मोहूर्ले, सतीश कणकम, गुलशन खान, देवेंद्र वाटकर, नजमा खान, उत्तरा सोनटक्के, उन्नती टेकाडे, सुनीता निवलकर, सुरेखा श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती.


आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, रक्षाबंधनाचा हा पवित्र उत्सव आहे. लाडक्या बहिणींच्या मनातील प्रत्येक इच्छा व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. राखीचा हा धागा हा केवळ प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक नाही, तर रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दृढ असा अतूट बंध आहे. हा दिवस माझ्यासाठी अत्यंत सौभाग्यशाली असून शेकडो लाडक्या बहिणींनी राखी बांधून मला आपुलकीचा मान दिला.


या राखीने माझ्यावर लाडक्या बहिणींचा विश्वास, प्रेम, सुरक्षितता आणि काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. लाडक्या बहिणींच्या कल्याणासाठी स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली असून, या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला आत्मनिर्भर होत आकाशात उंच भरारी घेतील. असा विश्वास देखील आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".