श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प अठ्ठावन्नावे - दुर्गासा मारवाडी

शेगांव (वि.प्र.) - अकोली जहागीर गावाजवळच अकोलखेड म्हणून एक गाव आहे. एके रात्री अचानक भास्करास बरोबर घेऊन गजानन महाराज अकोलखेड येथे आले आणि गावातील विठ्ठल मंदिरासमोर आले. विठ्ठल मंदिराच्या शेजारी राहणाऱ्या दुर्गासा मारवाडी नावाच्या सोनाराकडे आले. 
त्या रात्री त्या सोनाराचा एकुलता एक मुलगा भोजासा आजारी पडून मरण पावला होता. सर्व वैद्य आणि हकिमांचे औषध झाले, तरीही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी तो आईच्या मांडीवर डोके ठेवून मरण पावला. सर्वजण दुःखाने आक्रोश करत होते. मुलाचे कलेवर पाहून ती माऊली जिवाचा आकांत करू लागली. तिचा आक्रोश पाहून भास्कर पाटील महाराजांना म्हणाले, "या मुलाला वाचवा!" महाराज हसत हसत त्याला म्हणाले, "अरे जीव कधीही मरत नाही. तो जुने शरीर टाकून नवे शरीर धारण करतो." असे म्हणून त्यांनी भोजासा याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला म्हणाले "अरे, उठ! असा निजतोस का?" महाराजांचे अमृतमय शब्द ऐकताच भोजासा उठून बसला. 
हा चमत्कार पाहून त्याच्या आई-वडिलांनी गजानन महाराजांच्या चरणांवर लोळण घातली. दुःखाची जागा आनंदाश्रूनी घेतली. हे रडणाऱ्याला क्षणात हसते करण्यासारखे होते. असा सद्गुरूंचा अधिकार आहे. त्यांच्या जे जे मनात येते किंवा ते जे काही बोलतात ते क्षणार्धात किंवा वेळ येताच कसोटीला उतरते.
शेगावात श्री गजानन महाराजांसारखा संत आहे, याचा अर्थ तेथे कोणीही यम सदनी जाणार नाही. मृत्यू पावणार नाही. परंतु हा कुतर्क आहे. संत निसर्गाप्रमाणे वागतात. ते मृत्यू टाळत नाहीत. ते संकटाचे निवारण करतात. संत गंडांतर टाळतात.
श्री दासगणू महाराजांनी 'श्री गजानन विजय' ग्रंथात म्हटल्याप्रमाणे जगात मृत्यूचे तीन प्रकार आहेत - आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक.
आध्यात्मिक मृत्यू हा मृत्यू वरील तीनही मृत्यूंमध्ये श्रेष्ठ व बलवान आहे. हा कशानेही कळत नाही व तो कोणालाही टाळता येऊ शकत नाही. तो अटळ आहे.
आधिभौतिक मृत्यू हा मृत्यू कुपथ्यातून ओढवतो. औषधांच्या सहाय्याने याचा परिहार करता येतो. मात्र औषधे देणारा त्या क्षेत्रातील तज्ञ असणे जरुरीचे आहे. ज्याला औषधांचे परिपूर्ण ज्ञान आहे असा वैद्य, डॉक्टर भेटल्यास आधिभौतिकाचा नाश होऊ शकतो.
आधिदैविक मृत्यू हा मृत्यू नवसांद्वारे टाळता येतो. हा गंडांतर स्वरूपाचा मृत्यू आहे.
दुर्गासा आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.