श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प सत्तरावे - देवराव देशमुख

शेगांव (वि.प्र.) - अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात टाकळीपोटे नावाचे एक छोटेसे गाव आहे. येथील सुख संपन्न घरातील देवराव हरबाजी देशमुख हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांची महाराजांवर अतिशय श्रद्धा होती. येथून दर महिन्याला शेगावास पायी वारी करीत. देवराव हे ब्रिटिश राजवटीतील पोलीस पाटील होते. घरी श्रीमंती असूनसुद्धा त्यांच्या अंगी नम्रता होती. त्यांना साधुसंतांविषयी प्रेम आणि आदर होता. 
शेगावची पायी वारी नित्यनेमाची असली तरी पुढे वयोमानानुसार दरवर्षी सहजपणे होईल याची शाश्वती देशमुख यांना वाटत नव्हती. पावसाचे दिवस होते. भिजत भिजत ते शेगावी पोहोचले. त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले आणि म्हणाले, "महाराज, वयोमानानुसार आता माझ्याने पायी वारी करणे होत नाही. पण आपल्या दर्शनाला येण्याची मनाला सारखी तळमळ असते. त्यावर महाराज म्हणाले, "आता तू येथे येऊ नकोस. मी तुझ्याकडे येईल." 'महाराज आपल्या गावी येणार हे कसे शक्य आहे?', त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले. पण मौन बाळगून ते परतीच्या प्रवासाला निघाले. पुढच्या महिन्यात पुन्हा शेगावच्या वारीचा दिवस उजाडला. सकाळपासून त्यांच्या मनाने शेगावचा ध्यास घेतला होता. पण शेगावची वारी करणे शक्य नव्हते. दुपारी अकराच्या सुमारास ते शेतावर गेले. झाडाखाली बसले. इतक्यात तेथे गजानन महाराज अचानक आल्याचे त्यांना दिसले. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. 
महाराजांनी भेट दिल्याची स्मृती म्हणून त्या स्थळी त्यांनी छोटेसे मंदिर बांधले. महाराजांच्या प्रगट दिनाला तेथे आज सुद्धा अन्नदानाचा सोहळा साजरा केला जातो.
देवराव देशमुख आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.