श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प एकोणसाठावे - अवधूत खेडकर

शेगांव (वि.प्र.) - गजानन महाराजांचे राहित-साहित या गावातील एक भक्त अवधूत जयराम खेडकर यांचा उल्लेख 'गजानन विजय' या ग्रंथामध्ये आला आहे. 
"अवधूत जयराम खेडकरासी | राहित-साहित गावासी | 
भेटते झाले पुण्यराशी | 
संन्याशाच्या वेशाने || "
(अध्याय २०/ ४७) 
सन १९०२ साली राहीत-साहितमध्ये जिल्हा परिषदेची शाळा उघडली. त्या शाळेवर अवधूत जयराम खेडकर यांची शिक्षक पदावर नियुक्ती झाली. हे मूळचे अमरावतीचे होते. त्यांची गजानन महाराजांवर अतिशय श्रद्धा आणि भक्ती होती. आता राहीत-साहित गावी आल्यावर त्यांना अजून काही मित्रमंडळी मिळाले. त्यांचे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी येणे सुरू झाले. महाराजांच्या एकनिष्ठ भक्तांमध्ये त्यांची गणना होते. १९१० मध्ये महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा ते शेगावी दर्शनासाठी येत असत. 
राहीत-साहित हे गाव काटेपूर्णेच्या काठावर वसले आहे. येथील नदी उत्तर वाहिनी असून तिच्या काठावर ही दोन गावे आहेत. येथे मुदगलेश्वराचे प्राचीन मंदिर आणि राम मंदिर आहे. एक दिवस नित्यनेमाप्रमाणे अवधूत खेडकर राम मंदिरात दर्शनासाठी गेले. रामाचे दर्शन घेऊन झाले. तोच मंदिराच्या पाठीमागे खेडकर यांना गजानन महाराज हे परमहंसाच्या रूपात दिसले. त्यांनी दर्शन घेतले आणि धन्य झाले. आपल्या भक्ताची तळमळ आणि दर्शनाची इच्छा जाणून समाधीनंतर महाराज परमहंस रूपात राहीत-साहीत येथे गेले. केवढी ही थोर भक्ती!
अवधूत खेडकर आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

|| श्री मोदक ||

ॐ गजानना गुरुराया | 
सच्चिदानंदस्वरुपा |
शेगाव क्रिडारमणा | 
दुःखदारिद्रयप्रभंजना || 1 || 
तू दीनपतितपावना | 
इच्छितवरदायका |
भक्तकल्याणकारका |
योगीराज आनंदरुपा || 2 || 
तू ज्ञानविज्ञानस्वरुपा | 
वेदवेदान्तप्रकाशा |
आपस्तंभा तू मुळारंभा | 
भृगुर्बह्मा ऋषिश्‍वरा || 3 || 
अजानबाहू दिगंबरा | 
करीचिलीमधारका | 
उपाधि विरक्तरुपा | 
अवलियादंभकारका || 4 || 
नासिकाग्रदृष्टीस्थिरा | 
निरंजना अलक्षमुद्रा |
सगुणनिर्गुण विस्तारा | 
गजाननायोगसिद्धा || 5 || 
बापुसत्वंदत्तस्वरुपा | 
बापुनांविठ्ठलरुपा |
बाळकृष्णे रामदासा | 
शंकरबुवेरामरुपा || 6 || 
बाळशास्त्रेउमारमणा | 
निमोणकरा श्री गणेशा | मुंगसाजीत्वंतपंब्रह्मा | 
नरसिंगा योगेश्‍वरा || 7 || 
अकोलीकुपापुष्करिणां | 
अकोटी पातळगंगा |
द्वारकेश्‍वरी मनकर्णा | 
ओंकारकन्यापुजका || 8 || 
देविदासा तु जलंब्रह्मा | 
बंकटा अद्वैतरुपा| 
तात्यास गृहस्थधर्मा | 
टाकळीकरा सोहंरुपा || 9 || 
व्रजभुषणां कर्मब्रह्मा | 
महेताबा सर्वधर्मा |
श्रीधरा देशसेवाव्रता | 
गीतारहस्यप्रसादा || 10 || 
हरीपाटला बलरुपां | 
ब्रह्मगिरी गर्वनाशा | 
विप्रमाधवामहारौद्रा | 
दांभिकादंडदेयका  || 11 || 
जाखड्या पत्नीदेयका | 
रामदेवा पुत्रवरदां |
वारकरे विघ्नरक्षां | 
बिरबला सद्गुरुत्वां || 12 || 
मृतश्‍वाना जिवित्वदाना | 
सुकलाले गोरक्षका | 
निवारंद्वाडवारुत्वा | 
अडगांव काकरक्षका || 13 || 
बंडुतात्यां दैन्यहरा | 
पुंडलीका भक्तरक्षका |
कवंरभाके उपोषिता | 
बुटीअहंकारनाशका || 14|| 
बायजेत्वंसत्वरक्षका | 
जानके पुत्रत्ववरा|
ज्ञानेष्कन्नेमाऊलीरुपा | 
साळूंआज्ञा अन्नब्रह्मा || 15 || 
आत्मारामे ज्ञानसविता | 
मारुत्पंते धान्यराखा |
देवमास्तरा राजगुह्या | 
आसराजी प्रायश्चित्ता || 16 || 
बच्चुलाले मनोरथा | 
झ्यामसिंगा पर्जन्येश्‍वरा |
झुंबरलाला धनदर्शा | 
मणीरामां गजमुखा || 17 || 
गणु जवरी रक्षका | 
भारती रोगनिवारका |
भक्ता आरोग्यदेयका | 
जानरावा चरणतीर्थां || 18 || 
खापर्डेत्वंसर्वेश्‍वरा | 
दत्तोपंता परमहंसा |
करंजेकरा परंब्रह्मा | 
रंगनाथागुणातीता || 19|| 
श्री भास्करा वैकुंठधामा | 
पीतांबरा श्रीभुषणा |
बाळास पुरुषोत्तमा | 
गणेशकुळासार्वभौमा || 20 || 
स्वामीसमर्थ शिष्यत्वां | 
कपिलतिर्था तपरुपा | 
सुनंदायांतुब्रह्मसिद्धा | 
शेगाव संजीवस्थिता || 21 || 
भार्गेश्रद्धाभक्ति अर्पिता | 
आवडी तव मोदका |
पुरविभक्त मनोरथा | 
सुखशांतित्वदायका || 22 || 
|| इति भार्गवकृतं 
एकविंशोमोदकं 
श्रीगजाननार्पणमस्तू ||


|| श्री दुर्वा || 

ब्रह्म आकारा आले, 
शेगांवी प्रगटले |
देविदास गृहासी, 
उच्छिष्ट सेवियेले | 
अन्न परब्रह्म हे, 
दावी श्रृतिवचना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 1 || 
अशुद्ध प्याले नीर, 
भेदाभेद व्यापार |
सर्व ब्रह्मबाजार, 
हा आत्माविश्‍वाकार |
ब्रह्म असे अभेद, 
कळे अभेद मना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 2 || 
बंकटामनी ध्यास, 
पुरविलासे खास |
दिधले दर्शनास, 
जैशी श्रद्धेची कास |
इच्छाराम आग्रहाने, 
सेविले पक्वान्ना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 3 || 
माळीणीच्या गृहीची, 
खाती चुन भाकरी |
बंकटाची सुपारी, 
सेविती साक्षात्कारी |
संतुष्ट स्वामी भारी, 
भावभक्ती चलना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 4 || 
भक्तांच्या ईच्छेसाठी, 
स्विकारी गांजाबुटी |
मृत्युची सोडली गाठी, 
जानरावासाठी |
घाटोळा मारी काठी, 
ताडून अहंपणा |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 5 || 
चिलीम अग्निविन, 
प्यायले पेटवून |
नासले चिंचवन, 
टाकी शुद्धकरोन |
जानकीरामा घडविले, 
अतिथी भोजना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 6 || 
वैराग्य माधवाचे, 
होते कुचकामाचे |
तारुण्य ते भोगाचे, 
वृद्धपण त्यागाचे |
घेतलीसे कसोटी, 
दिले भयदर्शना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 7 || 
अकोलीचे शिवार, 
जलविना विहीर |
फोडुनी जलधार, 
नमविला भास्कर |
भास्करा बोध केला, 
दास केले चरणा |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 8 || 
कणसे खाया गेले, 
मक्याची मळ्यातले |
माहोळ खवळले, 
चिंच वृक्षांमधले |
योगबळे काढीले, 
लिलयेने काट्यांना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 9 || 
अकोट गावी गेले, 
नरसिंगा भेटले |
तीन मार्ग कथीले, 
फल एक बोलले |
कर्ममार्ग बोधीला, 
शिवाराच्या भुषणा |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 10 || 
उसाने मार साहला, 
पाटील जिंकला |
इक्षुरस पाजीला, 
तुम्ही मारणार्‍याला |
योगास सांगितला, 
राष्ट्रशक्तीचा कणा |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 11 || 
कुकाजी नवसास, 
पावले तुम्ही खास |
दिले पुत्र रत्नास, 
वाढविले वंशास |
ब्रह्मगिरी साधुचा, 
नाशीला अहंपणा |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 12 || 
अतिद्वाड वारुला, 
तुम्ही गरीब केला |
वाघिणीप्रत गाईला, 
नम्रता धडा दिला |
रामदासी बाळकृष्णा, 
तुम्ही दिले दर्शन |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 13 || 
वृत्ती बाळाभाऊची, 
ती अतिविरक्तिची |
नोकरीही पोटाची, 
त्यागली सेवेसाची |
मारीले बाळाभाऊसी, 
भास्करा अहंपणा |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 14 || 
व्याधी लक्ष्मणाची, 
बरी केली पोटाची |
आंब्याच्या प्रसादाची, 
योजना केली साची |
कोपलेया त्याच्या, 
परमार्थी खोटेपणा |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 15 || 
श्री भास्कर धन्य, 
वैकुंठी दिले स्थान |
गुरुसेवे कारण, 
केले भक्त रक्षण |
स्वामी सर्वाधिकारी, 
तु पतितपावना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 16 || 
तु गणु जवर्‍याला, 
विहिरीत रक्षिला |
वृक्ष हिरवा केला, 
पितांबरासाठी भला |
गंगाभारती बरा केला, 
लागता चरणा |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 17 || 
बापुना दिले दर्शन, 
रुक्मिणी रमण |
बोधी वेदान्ताकारण, 
शुद्ध करा मन |
उपहास सदभक्तांचा, 
तुम्हा सहवेना |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 18 || 
पुंडलिक बरा केला, 
प्लेगात रक्षिला |
नौका बुडता जला,
रक्षी भक्तप्राणाला |
स्त्री वेशात आलीसे, 
नर्मदाही रक्षणा |
नमन गुरुराया
तुम्हा श्रीगजानना || 19 || 
भाकरी प्रसाद दिला, 
बाळ टिळकाला |
गीतारहस्य भला, 
तो ग्रंथ प्रसविला |
स्वातंत्र महती बोले, 
उपस्थिती भाषणा |
नमन गुरुराया
 तुम्हा श्रीगजानना || 20 || 
द्वेष धर्माधर्मात, 
टाका केला संकेत |
महताब पंजाबात, 
धाडीला सत्यासत्य |
सत्य एक बोलले, 
मानवाचे कल्याण |
नमन गुरुराया 
तुम्हा श्रीगजानना || 21 || 
गजानना चरणी, 
दुर्वा भावे अर्पूणी |
दासभार्गवाची वाणी, 
लावली कारणी |
स्वामी स्विकारा पुजना व 
आमुच्या मना |
नमन गुरुराया
 तुम्हा श्रीगजानना || 22 || 
|| इति भार्गवकृतं एकविंश दुर्वा श्रीगजाननार्पणमस्तू  ||


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.