शेगांव (वि.प्र.) - पूर्वीच्या काळी राजस्थान मधील व्यापार करणारी बरीचशी मंडळी सर्व भारतात जेथे व्यापार मिळेल, तेथे पसरली आणि तेथेच पुढे स्थायिक झाली. व्यापाराच्या निमित्ताने सोनाबाई बलदेवदास खेतान आपल्या एकुलत्या एका मुलाला घेऊन शेगावात आली. शेगाव येथे येऊन सोनाबाईने भाड्याचे घर घेतले आणि घरच्या घरीच डिंक, लोणी, कापूस यांची विक्री करून तिने आपल्या उदरनिर्वाहाला सुरुवात केली. पती बलदेवदास यांचा मृत्यू झाल्याने मुलाची जबाबदारी तिच्यावर आली होती.
शेगाव मध्ये स्थिरस्थावर झाल्यावर तिने आपल्या मुलास व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी एका व्यापाराकडे व्यापाऱ्याकडे बिनपगारी काम करण्यास ठेवले. पुढे काही वर्षांनी तिने शेगाव मध्ये एक जागा भाड्याने घेतली आणि त्याच ठिकाणी स्वतःचे दुकान सुरू केले. त्या दुकानाच्या मागच्या बाजूला ती राहू लागली. लक्ष्मीनारायण खेडोपाडी जाऊन डिंक, लोणी आणि कापूस खरेदी करत असत. काही वर्षांनी त्यांना व्यवसायात चांगल्यापैकी यश मिळाले. पैसा मिळाला. ती ज्या जागेत राहत होती, ती जागा त्यांनी विकत घेतली. दुकान सुद्धा व्यवस्थितपणे चालू लागले. व्यवहारातला हिशोबीपणा, मेहनत आणि मनाची जिद्द यामुळे त्यांची भरभराट होऊ लागली. राजस्थानमध्ये जन्मलेल्या लक्ष्मीनारायण घेताना यांचा विवाह मनमाड येथील दगडाबाई यांच्यासोबत झाला.
लक्ष्मीनारायण यांची आई अतिशय धार्मिक होती. ती साधुसंतांना अतिशय मान देत असे. श्री गजानन महाराज लहर आली की त्यांच्या दुकानात पायरीवर जाऊन बसत असत. तेव्हा ही वयस्कर आई महाराजांना जेवायला देई. महाराज दिलेली भाजी भाकरी त्या ओट्यावरच बसून खात आणि निघून जात. लक्ष्मीनारायण धार्मिक वृत्तीचे होते. पहाटे चार वाजता उठून जवळच असलेल्या प्राचीन मारुती मंदिरात ध्यान करावे, घरी पूजा व गीतापाठ करावा आणि नंतर दुकानात बसावे; असा त्यांचा नियम असे. ते अंगात एक बंडी घालत असत. ते दुपारी जेवायला आले की अंगातली बंडी काढून दुकानातील खुंटीवरच टांगून ठेवत. जेवण झाले की पुन्हा ती बंडी अंगात घालून बसत असत. एकदा अंगातली बंडी खुंटीला टांगून ते जेवायला आत मध्ये गेले. त्या दिवशी नेहमीप्रमाणे दुपारी गजानन महाराज दुकानाच्या पायरीवर न बसता सरळ दुकानात गेले आणि त्यांनी खुंटीवरील बंडी घेतली. रस्त्यावर आले. त्यांनी ती बंडी फाडून तिचे तुकडे केले आणि फेकून दिले. इतक्यात लक्ष्मीनारायण जेऊन बाहेर येतात, तो त्यांना प्रकार हा प्रकार दिसला. तेथे काही लोक सुद्धा गोळा झाले होते. महाराजांनी ते तुकडे फेकत म्हटले, "आजपासून याचे जुने गेले. नवीन निर्माण होईल. मात्र सत्य सोडू नये." खरोखरच महाराजांची त्यांच्यावर कृपा झाली. त्यांच्या कृपेने लक्ष्मीनारायण यांची प्रचंड भरभराट झाली आणि त्यांची वंशवृद्धी झाली.
गजानन महाराजांच्या कृपापात्र लक्ष्मीनारायण खेतान यांचे निधन ०४/०७/१९६८ रोजी झाले. महाराजांच्या कृपेने त्यांचा वंशवृक्ष भरभराटीला आला.
लक्ष्मीनारायण खेतान आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.