शेगांव (वि.प्र.) - गजानन विजय ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या साळुबाई यांचे बंधू म्हणजे दत्तोपंत घोडेगावकर. दत्तोपंत मूळचे नाशिक जवळच्या वाडेघोडे गावचे रहिवासी. त्यांचा जन्मसुद्धा वाडेघोडे गावचाच. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १८९० साली झाला. त्यांचे वडील आबाजी आपल्या कुटुंबासह अमरावती येथे स्थायिक झाले. त्यांनी १९०४ मध्ये अमरावतीच्या बुधवारा भागात एक घर विकत घेतले.
पुढे या घरात गजानन महाराजांचे आगमन होत असे. गजानन महाराजांचे घोडेगावकर कुटुंबीयांवर फार प्रेम होते. त्यांच्या या भक्तीमुळे महाराज अमरावतीला त्यांच्या घरी जात आणि पाहिजे तितके दिवस तेथे मुक्काम करत. महाराज आले की घराच्या डावीकडील पहिल्या खोलीतच महाराजांचा मुक्काम असायचा. घर आनंदाने फुलून जायचे. महाराजांची पूजा अतिशय थाटात व्हायची. महाराजांसाठी घोडेगावकरांनी सुंदर लाकडी पलंग तयार करून या खोलीमध्ये ठेवला होता. त्या सागवानी लाकडाच्या सुंदर पलंगावर महाराज आराम करायचे. "इस्तंबू रामू आपस्तंभू" असे पुटपुटत उठून पलंगा भोवती फिरायचे.
पलंगावर झोपलेल्या अवस्थेत महाराजांचा जो फोटो उपलब्ध आहे, तो घोडेगावकरांच्याच पलंगावरचा आहे. दत्तोपंत घोडेगावकर यांनी सुरुवातीला फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला होता. ते उत्तम फोटोग्राफर होते. पुढे त्यांनी कापसाचा व्यवसाय सुरू केला. महाराज येथे आले की भक्तांची गर्दी सुरू असायची.
गजानन महाराजांचा समाधीनंतरसुद्धा महाराजांचे आवडते शिष्य पुंडलिकबुवा भोकरे अनेकवेळा घोडेगावकरांकडे जात असत. दत्तोपंतांनी महाराजांच्या नामस्मरणातच पुढे २६ जानेवारी १९६६ या दिवशी आपला देह ठेवला.
दत्तोपंत घोडेगावकार आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.