श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प अडूसष्ठावे - बाळकृष्ण जोशी (अनंत महाराज)

शेगांव (वि.प्र) - कोकणातील गुहागर या गावी विनायक जोशी आणि अन्नपूर्णा जोशी यांच्या पोटी १८८७ ला बाळकृष्ण यांचा जन्म झाला. त्यांना दोन भावंडे होती. हे घराणे सुसंस्कृत आणि सदाचारी असल्याने बालपणापासून बाळकृष्णांवरती शास्त्राचा चांगलाच पगडा होता. त्यांना अध्यात्माची आवड होती. त्यांच्या खेळण्यातूनही देवपूजा ओसंडत असे. बाळकृष्ण लहानपणी आपल्या भावंडांसोबत शिक्षणासाठी पुण्याला मामाकडे आले. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने त्यांना शिक्षणासाठी योग्य ते वातावरण मिळाले. विद्याध्यायनासाठी त्यांना अतिशय परिश्रम घ्यावे लागले. हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांना भटकंती करावी लागली. तशा परिस्थितीतही त्यांनी नवनवीन विषय शिकण्याचा छंद जोपासला हे अतिशय महत्त्वाचे आहे. विद्याविभूषित बाळकृष्ण यांचा कर्मकांडावर अतिशय विश्वास होता. त्यांची सोवळ्यात तासन-तास पूजा चालत असे. विद्वत्तेचा मानसन्मान करण्यात त्यांनी कधीही कसूर केला नाही. ज्ञानी लोकांशी त्यांचे चांगलेच सख्य होते. ज्यांच्याकडून आपल्याला काही चांगले शिकता येईल, त्यांच्याकडून ते शिक्षण घेत असत. चांगल्या गोष्टीची त्यांना आवड होती. त्यांची वेदांवर भक्ती आणि श्रद्धा होती. एकदा ते विदर्भात टुणकी येथे आले. टुणकी या छोट्याशा गावात त्याकाळी वेदमूर्ती काळे शास्त्री नावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्याकडे राहून बाळकृष्ण यांनी पुढचे अध्ययन केले. त्यांना तेथे राहण्यात धन्यता वाटत होती. तेथे राहताना तेथील जहागीरदारांशी त्यांचे चांगलेच सख्य जमले. जहागीरदार वयाने वृद्ध परंतु त्यांना गुणी माणसाबद्दल भारी प्रेम होते. अशातच जहागीरदारांचे नातू आणि बाळकृष्ण यांची चांगलीच मैत्री जमली. जहागीरदार रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करीत असत. त्यामुळे बाळकृष्ण यांनासुद्धा आपण रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा, अशी इच्छा झाली आणि ते नियमित पाठ करायला लागले.
टुणकी हे गाव शेगाव पासून फारसे लांब नसल्याने त्या गावातही महाराजांचे बरेचसे भक्त होते. त्यापैकी जहागीरदारांसारखे काही सज्जन भक्तगण महाराजांना अतिशय मानत असत. गावातील लोकांसोबत अधून मधून बाळकृष्णाचे भाऊ आप्पा शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. महाराजांवर आप्पांची चांगलीच भक्ती जडली होती. पुढे आप्पा नेहमी बाळकृष्ण यांना गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे घेऊन येऊ लागले. वारंवार दर्शन घेऊन लगेच जाणे होत नसल्याने कधी कधी मठात मुक्कामही करावा लागत असे. महाराजांच्या संपर्कात आल्याने हळूहळू बाळकृष्णांच्या मनात त्यांच्याविषयी भक्ती निर्माण झाली. ही सर्व महाराजांचीच किमया होती. आपल्या मनात भक्ती भाव निर्माण झाला, हे पुढे त्यांना सुद्धा जाणवू लागले. हा संत सहवासाचा परिणाम होता. पुढे शेगावी जेव्हा जेव्हा मठात मुक्काम होत असे तेव्हा तेव्हा ते महाराजांची सेवाही करायला लागले. मठात असताना ते सोवळ्याने स्वयंपाक करून महाराजांना नैवेद्य अर्पण करीत असत. बाळकृष्णांनी आणलेला नैवेद्य महाराज स्वीकारत. त्यांचा नैवेद्य आला नाही तर महाराजही भोजन करीत नसत. इतके महाराजांचे त्यांच्यावर प्रेम होते. 
अंत:करणाचे शुद्ध, शास्त्रज्ञानात परिपूर्ण असे बाळकृष्ण हे जिज्ञासू व्यक्तिमत्व होते. महाराजांना सुद्धा जिज्ञासा अभिप्रेत आहे. त्यांना अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास मान्य नाही. प्रथम पारखून तपासून घ्या. बुद्धी आणि मनाला पटले, दोघांनीही एकच कौल दिला, तरच ते स्वीकारा. केवळ मनाच्याच आहारी जाऊ नका. बुद्धीचासुद्धा वापर करा. असा महाराजांचा संकेत आहे. बाळकृष्ण असेच जिज्ञासू होते. म्हणून महाराजांचे त्यांच्यावर प्रेम होते. कृपा होती. बाळकृष्ण शास्त्रपारंगत विद्याविभूषित जरी असले तरी त्यांचे ठाई वकृत्व नव्हते. पण महाराजांनी अशी काही कृपा केली की ते प्रवचन आणि कीर्तन करायला लागले. परिपूर्ण ज्ञानातून ओथंबलेले कीर्तन ऐकण्यात लोकांनाही धान्यता वाटायची. त्यांची ओजस्वी वाणी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असे. ही शेगावकरांसाठी एक पर्वणीच होती. शेवटी ती गजानन माऊली केवळ कृपेचा वर्षाव करणारी. बाळकृष्णांचे किर्तन ऐकण्यासाठी एखादे दिवशी महाराज उपस्थित नसले की बाळकृष्ण बेचैन होत आणि महाराजांच्या शोध घेत असत. कीर्तन करण्यामध्ये त्यांचे मन रमत नसे. मात्र महाराज असले की त्यांच्या मुखातून ज्ञानगंगा प्रवाहित होत असे. जणू सरस्वतीच त्यांच्याद्वारे बोलत असे. जेथे सद्गुरूंची कृपा तेथे काय उणे. गजानन महाराजांसारखे अवतारी संत ज्यांना सद्गुरु म्हणून प्राप्त झाले, तेथे ज्ञान भक्ती आणि वैराग्य हा त्रिवेणी संगम व्हायला वेळ कसा लागणार? महाराजांनी कधी शब्दातून कधी कृपाकटाक्षद्वारे तर कधी स्पर्शाने अनेक भक्त आणि शिष्यांवर क्षणार्धात कृपा केली. अशा महाभाग्यशाली भक्तांमध्ये बाळकृष्ण जोशी यांचा सुद्धा समावेश आहे. 
गजानन महाराजांनी एक दिवस बाळकृष्ण यांना "अनंता" अशी हाक मारली. तेव्हापासून सर्वजण त्यांना "अनंता" असे संबोधू लागले. अशा प्रकारे नुसत्या एका शब्दाने महाराजांनी बाळकृष्ण यांना "अनंता" करून टाकले. त्यांचे ज्ञान आणि आचरण पाहून त्यांना 'अनंत महाराज' व्हायला वेळ लागला नाही. गजानन महाराजांनी आपल्या लीलेने अनंत महाराज यांना साक्षात्कारी बनवले. आपल्या शक्तीसंक्रमणाने अनंत महाराजांमधील दोष, विकल्प, भेदबुद्धी नष्ट केली आणि त्यांना 'सम' अवस्था प्राप्त करून दिली. महाराजांच्या स्पर्शात विलक्षण शक्ती होती.
गजानन महाराजांच्या आज्ञेवरून पुढे अनंत महाराज शेगावहून टुणकीला परत आले. महाराजांनी त्यांना पूर्णत्व प्रदान केले होते आणि जड जिवांचा उद्धार करावा या हेतूने त्यांना आपल्यापासून दूर पाठवले. आपल्या सद्गुरूच्या आज्ञेनुसार साक्षात्कारी होऊनसुद्धा त्यांनी आचारधर्माचे तंतोतंत पालन केले. लोकांना आपल्या कीर्तन आणि प्रवचनातून ज्ञानोत्तर भक्ती सांगून महाराजांच्या भक्तीचा प्रसार केला. तिन्ही त्रिकाळ संध्या आणि सप्तशतीचे पाठ त्यांनी पूर्वीसारखेच सुरू ठेवले. आचरधर्माचे पालन केले. कारण महाराजांचा आचारधर्माविषयी त्यांना तसा संदेशच होता. त्यांनी अनेक अनुयायी करून आचारधर्माची दीक्षा दिली. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा होता. अशा प्रकारे सद्गुरु गजानन महाराज यांनी बाळकृष्ण यांना "अनंत महाराज" केले आणि त्यांच्याकडून कार्य करून घेतले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी महाराजांच्या आदेशाचे पालन केले असे कार्य करता करता दिनांक २० मार्च १९७१, फाल्गुन वद्य अष्टमी रोजी त्यांचे निधन झाले. अमरावती येथे त्यांचा समाधी सोहळा मोठ्या समारंभाने पार पडला.
बाळकृष्ण जोशी (अनंत महाराज) आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.