सुरजागड लोहखनिज खाणीतून अवैधपणे उत्खनन .!
बल्लारपुर (का.प्र.) - गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोहखनिजाच्या खाणीतून अवैधपणे उत्खनन करण्यात येत असल्याच्या आरोपात प्राकृती फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर काय निर्णय घेतला, यावर माहिती सादर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले. मागील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी प्रशासनाला या विषयावर निवेदन देण्याचे आदेश याचिकाकर्त्या संस्थेला दिले होते. याप्रकरणी आता येत्या ७ जून रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
सुरजागड येथील झुडपी जंगलातील ही खाण शासनाने उत्खननासाठी राखीव ठेवली. या खाणीतून लोहखनिज उत्खनन करण्याचे कंत्राट लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला दिले आहे. मात्र, या करारामध्ये उत्खनन केलेले लोहखनिज राखीव राहणार असल्याची अट टाकण्यात आली होती. जादा खनिज विक्रीची परवानगी हवी असल्यास त्यासाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. त्याशिवाय पर्यावरण खात्याच्या परवानगी व लीज नुसार उत्खनन करण्याची अट देखील या करारामध्ये होती. मात्र लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता.
यामध्ये जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत असून या प्रकरणाच स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती हायकोर्टाला याचिकेद्वारे करण्यात आली आहे. हायकोर्टाने प्रथम शासनाला निवेदन देण्याचे आदेश याचिकाकर्त्याला दिले. तसेच समाधान न झाल्यास पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा दिली होती. निवेदनावर उत्तर न मिळाल्याने याबाबत हायकोर्टाला याचिकाकर्त्याने अवगत केले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनांतर्गत येणाऱ्या प्रतिवाद्यांना निवेदनावर घेतलेल्या निर्णयावर माहिती सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.