शेगांव (वि.प्र.) - अकोला जिल्ह्यातील म्हैसांग हे खेडेगाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. म्हैसांग गावात रावसाहेब नारायणराव देशमुख हे वैभव संपन्न गृहस्थ होऊन गेले. त्यांचा तेथे प्रशस्त वाडा आणि प्रचंड शेत-जमीन होती.
नारायणराव हे दानशूर असे व्यक्तिमत्व होते. शिवर येथील व्रजभूषण यांना त्यांनी गुरु मानले होते. व्रजभूषण यांच्याकडे त्यांचे नेहमीच जाणे असे. तेथे गजानन महाराजसुद्धा काही वेळा येत असत. गजानन महाराज शेगावी प्रगट होण्याच्या आधी काही काळ नाशिकला होते. तेथे व्रजभूषण आणि गजानन महाराज यांचा एकमेकांशी संपर्क आला. शिवर गावी नारायणराव यांची गजानन महाराजांशी भेट झाली. पण त्याआधी व्रजभूषण हे गजानन महाराजांविषयी अनेकदा बोलत असत.
गजानन महाराजांची प्रथम भेट होताच महाराजांवर नारायणराव यांची भक्ती जडली. ते दर्शनाला शेगावी नित्यनेमाने येऊ लागले. गजानन महाराजांचे म्हैसांग येथे अनेकदा आगमन होत असे. नारायणराव यांची पत्नी गीताबाई पार प्रेमळ आणि धार्मिक होत्या. एकदा त्यांनी नवरात्रात दुर्गा सप्तशतीचे पाठ करून त्याची सांगता महाशतचंडी यज्ञाने करावी आणि या यज्ञासाठी गजानन महाराज यांना आमंत्रण द्यावे, असे ठरवले. त्यानुसार नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले. यज्ञासाठी वाड्यापासून काही अंतरावर त्यांच्या मालकीचे शेत होते, येथे भव्य मंडप उभारण्यात आला. नारायणराव यांनी महाराजांची संमती आधीच घेतली होती. ठरल्याप्रमाणे शेगाव येथून गजानन महाराज म्हैसांगला आले. देशमुख पती-पत्नी स्वतः जातीने महाराजांच्या सेवेत तत्पर असत. या यज्ञात प्रत्यक्ष सगुणब्रह्माची उपस्थिती असणे ही काही साधारण बाब नाही. महाराजांच्या उपस्थितीने या यज्ञाला अधिक महत्त्व आले.
रावसाहेब नारायणराव देशमुख स्वभावाने अतिशय उदार असल्याने कोणीही याचक विन्मुख जात नसे. त्यांनी गावातील वाचनालयाच्या उज्वल भविष्यासाठी त्याकाळच्या १००० रुपयाची देणगी दिली होती. कोणताही धार्मिक उत्सव त्यांच्या घरी असला की त्यानिमित्ताने संपूर्ण गावाला जेवण दिले जाई. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते नोकर चाकर यांचेसुद्धा आवडते होते. त्यांच्यात कसलाही अहंकार नव्हता. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी होती.
रावसाहेब नारायणराव देशमुख आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.