श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प शहात्तरावे - भवानराव देशमुख

शेगांव (वि.प्र.) - सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणांनी पावन झालेल्या गावांपैकी जयपूर कोथळी हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटेसे खेडेगाव. तेथे भवानराव देशमुख हे धनसंपन्न व्यक्ती राहत होते. ते अतिशय करारी आणि मुत्सद्दी असे व्यक्तिमत्व होते. भवानराव हे गावचे पोलीस पाटील होते. 
भवानराव यांची पत्नी अंबाताई या गजानन महाराजांच्या भक्त होत्या. अंबाताई आणि भवानराव यांच्या इच्छेनुसार गजानन महाराज जयपुर कोथळी येथे आले. पांढऱ्या घोड्यांच्या टांग्यात बसवून मोठ्या मानसन्मानाने महाराजांना आणले गेले. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे महाराज या ठिकाणी तीन दिवस मुक्कामाला होते. महाराजांच्या आगमनाने सर्व आसमंत भक्तिमय झाले. या गावच्या पंचक्रोशीतील लोकांची दर्शनासाठी गर्दी उसळली. महाराजांचे दर्शन घेऊन जो तो धन्य झाला. या तीन दिवसात महाराजांना मंगलस्नान घातले जाई. दर्शनासाठी येणारे लोक आणि सर्व गावकरी यांना अन्नदान दिले जाई. दररोज भजनाचा कार्यक्रम असे. या भजनाच्या नादावर महाराज तल्लीन होत. तिसऱ्या दिवशी गजानन महाराजांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. महाराजांनी भक्ताच्या इच्छेमुळे मिरवणुकीदरम्यान वापरलेल्या पादुका शेगावी परत जाण्यापूर्वी स्वहस्ते भवानराव देशमुख यांना दिल्या. या गुरुपादुका भवानरावांनी आपल्या बैठकीत ठेवल्या. पादुकांची आजही नियमित पूजा केली जाते.
महाराजांच्या आशीर्वादाने भवान राव यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव आनंद ठेवण्यात आले. भवानराव यांचे नातू दिनेशकुमार देशमुख हे सुद्धा महाराजांचे परमभक्त असून त्यांनी महाराजांच्या पादुका आणि त्या वेळची भजनाची सर्व वाद्ये जतन करून ठेवली आहेत. भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून या पादुका दिनेशकुमार देशमुख काका स्वतः गावोगावी नेत असतात.
भवानराव देशमुख आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.