शेगांव (वि.प्र.) - डॉक्टर भाऊ कवर आपल्या पत्नीला पार्वतीबाई यांना माहेरून प्रथमच सासरी घेऊन आले, त्यावेळी त्यांना सोबत घेऊन गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला आले. त्यावेळी महाराजांचे वास्तव्य जुन्या मठात होते. पार्वतीबाई आणि डॉक्टर कवर मठात आले तेव्हा महाराजांनी सुकलालच्या द्वाड गाईला शांत करण्याचा चमत्कार केला. महाराजांची ही लीला पार्वतीबाईंनी प्रत्यक्ष बघितली आणि प्रथमदर्शनाप्रसंगीच त्यांनी महाराज अवतारी संत आहेत हे जाणले. त्यांचे डॉक्टरांसोबत येथे वारंवार येणे होत असे. त्या आणि डॉक्टर मठात राहून महाराजांची सेवा करत असत. त्यांनी महाराजांचे अनेक लीला, चमत्कार बघितले. पार्वतीबाईंच्या हातचा स्वयंपाक महाराज आवडीने सेवन करीत असत.
डॉक्टर कवर शेगावला भंडारा करीत असत. असाच शेगावी मुक्काम करणे आणि भंडारा घालणे असा कार्यक्रम ठरला होता. हा भंडारा दरवर्षी मोठाच होत असे. सन १९०७ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी भंडाऱ्याची सर्व तयारी झाली. सकाळी लवकरच स्वयंपाक तयार करण्यात आला. त्या दिवशी अकरा वाजता सूर्यग्रहण लागणार होते. त्यानुसार सर्व स्वयंपाक तयार झाला. महाराजांचे नैवेद्याचे ताट तयार करून महाराजांनी प्रथम नैवेद्य ग्रहण करावा अशी डॉक्टरांनी महाराजांना प्रार्थना केली. पण महाराज काही केल्या नैवेद्य ग्रहण करीत नव्हते. महाराजांनी प्रसाद घेतल्याशिवाय पंगत बसणार नव्हती. डॉक्टरांची चांगलीच पंचाईत झाली. महाराज जोपर्यंत प्रसाद घेत नाहीत तोपर्यंत कोण बरे प्रसाद ग्रहण करेल? महाराज काही केल्या ऐकेनात. डॉक्टर आणि पार्वतीबाई दोघेही वारंवार त्यांना विनंती करीत होते. पण काही उपयोग होईना. अखेर अकरा वाजले. सूर्यग्रहण लागले. तोच महाराज आपल्या पलंगावरून उठले आणि पात्रावर येऊन बसले. डॉक्टर कवरांकडे महाराजांनी लिंबाची फोड मागितली. पार्वतीबाई गरोदर असल्याने त्या लिंबाची फोड कापत नव्हत्या. महाराजांनी अंतर्मनाने हे जाणले आणि 'डॉक्टरांच्या पत्नीने कापलेलीच लिंबाची फोड पाहिजे' असा हट्ट धरून बसले. ग्रहणाच्या काळात पार्वतीबाईंनी लिंबू कापल्यास पोटातील गर्भावर वाईट परिणाम होईल, असा पार्वतीबाईंचा समज होता. महाराजसुद्धा एखाद्या भक्ताची परीक्षा कशी घेतात याचा हा उत्तम दाखला म्हणता येईल. "भौतिकतेचा विचार श्रेष्ठ की भगवंताचा विचार श्रेष्ठ", हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कसलाही विचार न करता; दुःख, शंका-कुशंका न काढता पार्वतीबाईंनी पटकन लिंबू कापून महाराजांच्या पानावर वाढले. महाराजांनी मनोमन स्मित केले.
खरोखरच आज एक भक्त जिंकला! भक्ती श्रेष्ठ ठरली! भगवंतावर जीव ओवाळून टाकावा लागतो, मग त्या भक्तीपुढे सर्व गौण असते. महाराजांनी जेवण केले. त्यानंतर सर्व जण भंडाऱ्याच्या प्रसादाने तृप्त झाले. पुढे पार्वतीबाई बाळंत झाल्या आणि त्यांना मुलगी झाली. मात्र ग्रहणात लिंबाची फोड कापल्याने या मुलीवर काहीही परिणाम झाला नाही. ही मुलगी म्हणजे सौ. ताई पंडित. त्यापुढे त्या प्रसिद्ध कीर्तनकार झाल्या. हा सगळा सद्गुरुकृपेचा प्रताप म्हणावा लागेल.
महाराजांच्या निष्ठावंत भक्तांमध्ये पार्वती बाईंची गणना होते. त्यांच्याकडे फार मोठी त्यागबुद्धी आणि खरी समर्पणात्मक भक्ती होती. पार्वतीबाईंनी वयाच्या ९१ व्या वर्षी सण १९९० मध्ये नागपूर येथे देह ठेवला.
पार्वतीबाई कवर आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.