सध्या राजकारणाचा पट संपुर्णपणे बदलून गेला आहे. राजकारणाचा एकमेव केंद्रबिंदू आता सत्ताकारण ठरले आहे.सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या तडजोडी स्वीकारणे ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. 'तत्त्वनिष्ठा' हे शब्द आता गैरलागू झाले आहे. 'गिव्ह अँड टेक'च्या या राजकारणात एकदा का तूमची खुर्ची गेली की, तूमच्या आजूबाजूचे सर्वजण अचानक गायब व्हायला लागतात. महाराष्ट्राच्या राजकारणात याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो. मात्र राजकारणाच्या या निसर्ग नियमाला काही जण अजूनही अपवाद ठरले आहेत. त्यात सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडूण आलेले सुधीर मुनगंटीवार यांचे नाव प्रामुख्याने घेता येईल.
सुधीरभाऊ आता राज्याच्या मंत्रिमंडळात नाहीत. मात्र सत्तेच्या वर्तुळात अजूनही त्यांची चर्चा असते, त्यांच्या शब्दाला वजन आहे. विधानसभा सभागृहात ते जेव्हा बोलायला उभे राहतात, तेव्हा संपुर्ण सभागृह त्यांना शांतपणे ऐकते. सत्तावर्तुळ, विरोधीपक्ष, नोकरशाही असो की सामान्य माणूस सर्वत्र सुधीरभाऊंचा आदर आजही अबाधित आहे. नवे सरकार आल्यानंतर आतापर्यंत झालेल्या दोन्ही अधिवेशन सुधीरभाऊंनी आपल्या वक्तृत्व व अभ्यासू भाषणाने गाजवली. अर्थ, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री ही महत्वाची खाती सुधीरभाऊंनी गेल्या दहा वर्षात हाताळली. आपल्या कामाच्या धडाडीने निर्णयक्षमता व कल्पकतेने ही सर्व खाती त्यांनी गाजवली. राज्याचा शेवटचा शिल्लकी अर्थसंकल्प त्यांच्याच अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात मांडण्यात आला, हे सर्वजण मान्य करतात.
मनात आणल्यास सरकार काय करु शकते, याची प्रचिती वेळोवेळी सुधीरभाऊंनी आपल्या कामातून दाखवून दिली आहे. गेल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्यसारखे खाते होते. नट, नट्यांसोबत फोटो काढणे, सांस्कृतिक कार्यक्रम, अवार्ड शोला हजेरी लावणे आणि चित्रपटाचे अनूदान वाटणे एवढेच काम या मंत्रालयाचे असते, असे आतापर्यंत चित्र होते. मात्र या विभागाचे सूत्र हाती आल्यावर सुधीरभाऊंनी हे चित्र पालटून टाकले. महाराष्ट्रातचं महाराष्ट्र गीत हे सर्व शासकीय, निमशासकीय समारंभात वाजणे हे बंधनकारक नव्हते. सुधीरभाऊंनी एक साधा जीआर काढून राज्यगीत सर्वच शासकीय, अशासकीय कार्यक्रमात वाजवणे बंधनकारक केले. आज तुम्ही परदेशी वकालत, सिनेमा थियेटर किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जा, राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लागते. आणि सर्व मराठी माणसांचे मन उचंबळून येते. हा निर्णय घेण्यासाठी काही पैसै लागले नाही. केवळ कल्पकता आणि प्रबळ इच्छाशक्ती लागली. आतापर्यंत महाराष्ट्रात कित्येक सांस्कृतिक मंत्री झाले मात्र महाराष्ट्राच्या राज्य गीताला सन्मान देण्यासाठी ही कल्पना त्यांना सूचली नाही.
योजना, कल्पकतेच्या बाबतीत सुधीरभाऊ प्रचंड क्रियेटीव्ह व्यक्तिमत्व आहे.चोवीस तास माझ्या डोक्यात बिनखर्चाच्या अनेक कल्पना, योजना सातत्याने येतात असे ते आम्हाला कायम सांगतात. केवळ कल्पकतेने काम होत नाही, तर त्या योजना प्रत्यक्षात आणण्यापर्यंतचे काम सुधीरभाऊंनी अनेकदा करुन दाखवले आहे. आतापर्यंत निष्क्रिय किंवा कुणाच्या खिजगणतीत नसणारे खाते म्हणून वन खात्याचा लौकिक होता. मात्र जंगल, पर्यावरणाची मनापासून आवड असणाऱ्या सुधीरभाऊंनी एका दशकाच्या काळात वन खाते कुठल्या कुठे नेऊन ठेवले. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या वृक्षलागवड मोहीमेवर भलेही आज आरोप,प्रत्यारोप झाले असतील मात्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा त्यांनी हा महत्वाचा उपक्रम राबवून दाखवला. निव्वळ राबवला नाही तर अनेक संस्था, माणसांना सोबत घेवून या मोहीमेला जनचळवळीचे स्वरुप दिले. आज वातावरण बदलाच्या युगात वृक्षलागवड मोहीम हा देशभरात अंत्यत महत्वाचा विषय ठरला आहे. अनेक राज्यांनी या मोहीमेचे अनुकरण केले आहे.
२०२५ मध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाले. या मंत्रिमंडळात सुधीरभाऊंचे नाव नव्हते. अनेकांसाठी हा धक्का होता. मला भाऊंचा स्वभाव माहिती आहे. सत्तेत असण्याचे किंवा नसण्याचे दुख त्यांना कधीच नव्हते. मात्र त्यांना आतापर्यंत चंद्रपूर आणि राज्यासाठी जे विकासकामे खेचून आणले होते. त्यातील असंख्य कामे ही आता पूर्णत्त्वाच्या टप्यावर पोहोचली आहे. या कामांना आता खऱ्या पुशअपची गरज होती. त्याची सल सुधीरभाऊंच्या बोलण्यातून कायम जाणवते.
राज्याच्या राजकारणात आपली ओळख मिळवण्यासाठी अनेकांना मंत्रिपदाची गरज असते. मात्र मंत्रिपदाशिवाय सुधीरभाऊ जनसामान्यांचे काम त्याच तडफेने आणि वेगाने करू शकतात, याची जाणीव आमच्यासारख्या असंख्य मित्र, व त्यांच्यासोबत संपर्क आलेल्यांना निश्चित आहे. मला आठवत सुधीरभाऊ वर्धा जिल्हाचे पालकमंत्री होते. या काळात त्यांनी जिल्ह्यासाठी भरभरुन निधी दिला. मात्र जिल्ह्याच्या अंतर्गत राजकारणात त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. स्पष्ट बोलणे, पारदर्शक राहणे हे कधी काळी राजकारणातले सर्वात चांगले गुण मानले जात होते. मात्र आजच्या बदलत्या युगात हा अत्यंत घातक गोष्ट मानली जाते. मात्र डिएनयेमध्ये हे गुण असल्यामुळे सुधीरभाऊ आजही स्पष्ट बोलतात. छक्के पंजे वापरुन त्यांना आजपर्यंत कधी बोलता आले असतं तर सुधीरभाऊंचे राजकारण एका मोठ्या टप्यावर असते. मात्र ते कधी जमले नाही. त्यांच्या राजकीय आयुष्याच्या कुठल्याही टप्यात सुधीरभाऊंनी आपला स्वभाव सोडला नाही. कारण मोकळाढोकळा स्वभाव सोडला तर त्यांची खरी घुसमट होईल.
मंत्रीपद नसतानाही सुधीरभाऊंनी अधिवेशनाचे नेतृत्व करताना दिसले, कधी कधी विरोधी पक्षनेत्यासारखे सरकारला धारेवर धरताना दिसले तर कधी वडीलकीच्या भूमिकेतून सरकारचे कान धरताना दिसले.विधीमंडळात जनतेचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी सदस्यांना विविध संसदीय अस्त्रांचा वापर करावा लागतो. त्यात सुधीरभाऊ अत्यंत पारंगत आहे.मला एका अधिकाऱ्याने सांगितले की विधानसभेत जेव्हा लोकप्रतिनिधींचे प्रश्न सुटत नाही. तेव्हा विधीमंडळाबाहेरून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक-एक संसदीय अस्त्र आहे. ते आतापर्यंत केवळ सुधीरभाऊंनी वापरले. केवळ वक्तृत्त्वानेच नव्हे, तर जनतेच्या काळजातील प्रश्न जिव्हाळ्याने मांडून त्यांनी आपण मंत्रिपदाच्या झुलीशिवाय फक्त आमदार असतानाही तेवढेच कार्यक्षम असल्याचे सिध्द केले. विधीमंडळात ते अनेक संसदीय अस्त्र प्रभावीपणे वापरतात, कारण त्यांच्या पाठीशी आहे अनुभव, अभ्यास व जनतेबद्दलची तळमळ.जनतेचे प्रश्न त्यांनी अधिक निर्भीडपणे मांडले. शेतकरी कर्जमाफी असो किंवा लाडकी बहिण योजना, महिलांचे आरोग्य - त्यांच्या भूमिकेत तडजोड नाही, आहे ते फक्त जनहित. सुधीरभाऊंचे राजकारण केवळ पदासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. आणि म्हणूनच आजही सभागृह त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकतं, कारण त्या शब्दांमागे आहे आस्थेची ताकद.
विनोद राऊत - मुंबई