श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प एक्याऐंशी - केशव गणेश आठले

शेगांव (वि.प्र.) - केशव गणेश आठले यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातले. सन १८८९ मध्ये अतिशय सदाचारी आणि भगवदभक्त आई-वडिलांच्या पोटी केशवबुवांचा जन्म झाला. आई-वडिलांचे भक्कम असे सुसंस्कार त्यांच्या पाठीशी होते. अगदी बालपणापासूनच संतांची काव्यपदे त्यांच्या कानी उतरली ती त्यांच्या मातोश्रींच्या मुखातून. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ह्या बालकाला भजनाचा नाद लागला. काठी खांद्यावर घेऊन आपल्या सोबत्यांमध्ये पदे म्हणून ते भजन किंवा कीर्तन करीत असत. वयाच्या आठव्या वर्षी उपनयन करून वडिलांनी त्यांना संस्कृत शिक्षणाचा आरंभ करविला. तेव्हापासूनच त्यांना कथा, कीर्तन, पुराण, श्रवणाचा नाद लागला. श्रवणाच्या नादातून मनावर नामजपाचा प्रभाव पडतो. मन उन्मन व्हायला लागते. श्रवणभक्ती श्रेष्ठ कशी ठरते याचे उदाहरण म्हणजे केशव आठले यांना वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रामनामाच्या जपाचा छंद लागला. त्यांनी जपाच्या नियमात खंड पडू दिला नाही. नियमितपणे ठरलेला जप ते करू लागले.
श्री बरकत शहा साई या सत्पुरुष व्यक्तीने गणेश आठले यांना बालपणीच परमार्थाचे साधन एकांतात समजावून दिले होते. ते साधन केशवांनी न चुकता पुढे सहा महिने केले. केशव बुवांचा रामनामाचा जप रात्रंदिवस चालू असे. तेरा लक्ष जपाचे एक पुरुश्चरण अशी तेरा पुरुश्चरणे त्यांनी केली. दहा वर्षे नित्यनेम सुरू असूनही चित्ताला शांती मिळेना. पुढे बाळकृष्ण महाराज पराडकर नावाचे एक ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष केशव यांना भेटले. त्यांची केशवांवर कृपा झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि कृपेने वयाच्या विसाव्या वर्षी केशव बुवांनी कीर्तन करायला सुरुवात केली. बाळकृष्ण पराडकर महाराजांनी केशवबुवांना बाहेरगावी फिरून किर्तन आणि प्रवचनाद्वारे लोकांना परमार्थाचा उपदेश करण्याची आज्ञा केली. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून ते पर्यटनाला निघाले. पर्यटनात अनेक साधुसंतांची दर्शने झाली. त्यांचा सहवास, मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले. 
फिरत फिरत केशव बुवा नागपूर येथे आले. त्यावेळी गजानन महाराज यांचे वास्तव्य नागपूर येथे गोपाळराव बुटी यांच्याकडे होते. त्यावेळी ह. भ. प. केशव गणेश आठले यांची भेट गजानन महाराजांसोबत झाली. गजानन महाराजांची त्यांच्यावर कृपा झाली. गजानन महाराजांनी स्वतःच्या हाताने आठले यांच्या मुखात आंब्याचा रस पिळून म्हटले, "जा ! आंब्यासारखा गोड बोलशील!" महाराजांच्या या शब्दाची प्रचिती त्यावेळी त्यांना आणि श्रवण करणाऱ्यांनासुद्धा येऊ लागली. केशव बुवा यांच्या जिभेवर जणू सरस्वतीचा वास आहे आणि तीच प्रत्यक्ष बोलत आहे, अशी अनुभूती कीर्तन-प्रवचन श्रवण करणाऱ्यांना होत असे. त्यांच्या शब्दात असे काही सामर्थ्य निर्माण झाले होते की, श्रोते मंत्रमुग्ध होत असत. 'भजनी कीर्तनी रंगली काया' अशी वक्ता आणि श्रोत्यांची अवस्था होत असे. श्रींचा आशीर्वाद आणि प्रसादात हे सामर्थ्य होते. 'आंब्यासारखा गोड बोलशील' ह्या गोड बोलण्याचा अर्थ नुसते पांडित्य किंवा पोपटपंची नव्हे, तर जीवाला गोड वाटणारे, जीवाला शिवाकडे नेणारे, अमृततुल्य वचन बोल की ज्याने जीवांचा उद्धार होईल, कल्याण होईल, असा समर्थ गजानन महाराजांचा आशीर्वाद होता. काशिनाथ धारकर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर "केशवबुवांचा कीर्तनात पूर्वरंगावर विशेष भर असतो. त्यांचे बोलणे साधे, गंभीर, ओजस्वी, ठसकेदार आणि अल्प शब्दांचे असते. त्यात अनुभवाचा आणि गुरुकृपेचा जिव्हाळा असल्यामुळे त्याचा परिणाम श्रोत्यांच्या अंतःकरणावर झाल्या वाचून राहत नाही. विषय परमगहन आणि वेदांतपर असला तरी तो सर्वांना सारखाच प्रिय होतो. अशी त्यांची विलक्षण प्रवचनशैली आहे. मुखातून पुन्हा पुन्हा ऐकला तरी प्रत्येक वेळी त्यात नवीनपणा भासतो." अशा प्रकारे बुवांच्या कीर्तन, प्रवचनाची माधुरी आम्रप्रसादाने निर्माण झाली. सद्गुरूंची कृपा आणि मिळालेला प्रसाद हा अमृतसिद्धीचा योग. या कृपाप्रसादाच्या बळावर पुढे गणेश बुवांनी "श्रीदासबोध गुढार्थदीपिका" हा टीकाग्रंथ लिहून जगाच्या कल्याणासाठी आपली साधना, ज्ञान आणि संतकृपेचा प्रसाद उपलब्ध करून दिला.
ह भ प केशव आठले यांच्या पत्नी रुक्मिणी बाई या सदाचरणी आणि धर्मनिष्ठ होत्या. त्यांनी धर्मकार्यात फार मोठा वाटा उचलला. गृहस्थ धर्माचे उत्तम रीतीने पालन केले. केशव बुवांनी कीर्तन प्रवचन करून असंख्य लोकांना भक्ती मार्गाला लावले. आपले संपूर्ण जीवन या सेवा कार्यात खर्च केले.
केशव गणेश आठले आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.


श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प ब्याऐंशी - बळीराम विरखरे


सद्गुरु गजानन महाराजांच्या आज्ञेने स्वामी दत्तात्रय केदार हे काचुर्णा गावी आले. तेथे त्यांच्या संपर्कात बळीराम चिमणाजी विरखरे आले. गजानन महाराजांच्या अवतार लीला आणि श्रेष्ठत्व स्वामींच्या मुखातून त्यांनी ऐकले. महाराजांविषयी त्यांच्या मनात भक्ती निर्माण झाली आणि ते महाराजांचे एक श्रेष्ठ भक्त बनले. त्यांनी स्वामींना गुरुस्थानी मानले आणि महाराज म्हणजे त्यांचे दैवत. स्वामीं सोबत ते वारंवार शेगावी येऊ लागले. महाराजांच्या कृपाकटाक्षाने त्यांना अंतर्सुखाचा अनुभव आला. 
स्वामींच्या काचुर्णा येथील सन 1902 साली प्रथम आगमनापासून बळीराम विरखरे तेथे सेवेत रुजू होते. बळीराम हे संतप्रेमी होते. त्यांच्यावर संतांची कृपा होती. त्यांच्यात सेवाभाव भरलेला होता. त्यांनी स्वामींची दमणी वीस वर्षे हाकली. ते स्वतः दमणीचे धुरकरी असत. शेगावी महाराजांच्या दर्शनासाठी वरचेवर येणे होत असे. त्या कारणाने त्यांना महाराजांचे सानिध्य प्राप्त झाले होते. सेवा म्हणजे समर्पण एवढेच त्यांना माहीत होते. त्यांच्या या शुद्ध सेवेवर महाराज तर प्रसन्न होतेच तसेच स्वामी देखील खुश होते. सेवा अनंत पुण्याईने लाभते. ती जास्तीत जास्त तन्मयतेने आणि भावपूर्ण अंत:करणाने कशी होईल या गोष्टींचे पथ्य सेवा करणाऱ्याने पाळणे अतिशय महत्त्वाचे असते. ते त्यांनी तंतोतंत पाळणे आणि महाराजांची कृपा प्राप्त करून घेतली.
महाराजांच्या कृपेने विरखरे कीर्तन आणि भजन करीत. काचुर्णा येथील महाराजांच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्वामी, विरखरे आणि इतर काही भक्त महाराजांना काचुर्णा येथे नेण्यासाठी शेगावी आले. तेव्हा महाराजांनी सांगितले की 'आम्ही नंतर येऊ. आमच्या पायाच्या पादुका घेऊन जा.' सद्गुरूंनी दिलेल्या पादुका डोक्यावर ठेवून ही मंडळी काचुर्णा येथे पायी आली. त्या दिवसापासून बळीराम यांनी पायात पादत्राणे घालणे सोडले आणि पूर्ण आयुष्यभर त्यांनी या संकल्पाचे पालन केले.
बळीराम यांच्यावर गजानन महाराजांची कृपा झालेली होती. त्यांचा मुलगा उच्चशिक्षित होऊन पुढे उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचला. त्याने आपल्या घराण्यावरील गजानन महाराजांची कृपा जाणून भक्तीपरंपरा पुढे जोपासली. तो उत्कृष्ट कीर्तनकारसुद्धा झाला. त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागात कीर्तने-प्रवचने केली. बळीराम यांचा पणतू (नातीचा मुलगा) सुद्धा पुढे कीर्तनकार झाला. त्याची ख्याती लांबवर पसरली. बळीराम यांनी आपल्या अंतकाळी गजानन महाराजांचा फोटो आणि गजानन विजय ग्रंथाला नमस्कार करून मगच साक्षीभावाने आपला देह ठेवला. 
संत दर्शनाने काय लाभ होतो याचे हे मूर्तीमंत उदाहरण ! तन-मन-धन अर्पण करून जो भक्त सेवा करतो त्याचे जीवन धन्य होते. महाराजांच्या सहवासात जे आले, ज्यांना त्यांची सेवा घडली ते भक्त धन्य होते. नुसत्या दर्शनाने ईश्वराची प्राप्ती झालेले असंख्य भक्त होते. संतांच्या दर्शनाने पद्मनाभ कसा जोडला जातो किंवा प्राप्त कसा होतो याचे उदाहरण म्हणजे बळीराम विरखरे! त्यांच्या प्रत्येक पिढीने आपल्या अशा भक्तिमार्गाने पद्मनाभ जोडला. असा हा भाग्यवान जीव !
बळीराम विरखरे आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.