श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प ऐंशी - गोविंदशास्त्री पिंपरकर

शेगांव (वि.प्र.) - 'गजानन विजय' ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक १९ मध्ये गजानन महाराजांचे परभक्त डोणगावचे गोविंदशास्त्री यांचा उल्लेख आला आहे. डोणगावचे गोविंदशास्त्री हे प्रकांड पंडित आणि वेदशास्त्रात निपुण होते. महाराजांनी समाधी घेण्यापूर्वीच ते शेगावी हजर झाले होते. त्यांनी गजानन महाराजांची समाधी ही "संजीवन समाधी" आहे, याचे प्रमाण देऊन भक्तांवर उपकार केले आहेत. गोविंदशास्त्री हे त्यांच्या शास्त्रज्ञानावरून "शास्त्री" या उपाधीने ओळखले जाऊ लागले होते. ते ज्योतिषशास्त्रामध्ये निपुण होते. त्यांनी वेद आणि उपनिषद यांचा अभ्यास केलेला होता. ज्योतिष विद्यातील 'रमल' या पद्धतीमध्ये ते अत्यंत निपुण होते. ते अचूकपणे भविष्य निदान करीत असत. तासनतास ते योग साधना करीत असत. समाधी लावण्याचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता.
एकदा गोविंद शास्त्री बाहेरगावी गेले असता, त्यांच्या घरात काही चोर आले. गोविंदशास्त्रींची पत्नी घरी एकटीच होती. शास्त्रींच्या पत्नीला मारून त्यांचे सर्व सोने-नाणे लुटून घेऊ, असा त्यांचा बेत होता. चोरांनी शास्त्रींच्या पत्नीला सांगितले की, "आम्ही गोविंदशास्त्रींचे परिचित आहोत. आम्हाला काम असल्याने येथे आलो आहोत." गोविंदशास्त्रींच्या पत्नीने त्यांचे हे बोलणे खरे मानून त्यांचे अतिशय उत्तम आदरातिथ्य केले. शेवयाची खीर करून प्रेमाने खाऊ घातली. ते सर्व चार-पाच जण जेवून तृप्त झाले. "ज्या स्त्रीने आपला पती घरी नसून सुद्धा चांगला पाहुणचार केला. तिच्या मनात आपल्याविषयी अपरिचित असूनसुद्धा कसलीही शंका निर्माण झाली. अशा शुद्ध अंत:करणाच्या व्यक्तीला जीवाने मारणे आणि त्यांच्या घरची धनसंपत्ती लुटून घेणे हे योग्य नाही", असा त्या चोरांचा आपापसात वादविवाद सुरू झाला. त्यांची बुद्धी बदलली. त्यांनी बाईंना मारण्याचा आणि चोरी करण्याचा बेत बदलला. ते परत गेले. "देव तारी त्याला कोण मारी" असाच हा प्रसंग. गजानन महाराजांची कृपा त्यांच्या भक्तांवर नेहमीच असते हे यावरून सिद्ध होते.
गोविंदशास्त्री योगाभ्यासाचा अभ्यास करीत असत. ध्यान करण्यासाठी त्यांचे वेगळे देवघर होते. या खोलीला छोटेसे दार होते. त्या दाराला चंद्रकोरीच्या आकाराचे छिद्र होते. ही दारावरची चंद्रकोर अशा प्रकारे केली होती, की सूर्य उगवल्यावर त्याची किरणे त्या चंद्रकोरीच्या आकाराच्या क्षेत्रातून बरोबर देवघरात पडत. याच ठिकाणी ते योगाभ्यास करीत असत. त्यांची योगसाधनेवर चांगली पकड होती
महाराजांना समाधी घ्यायची होती, तेव्हा त्यांनी काही अंतरंगातील भक्त आणि शिष्यांना तेथे खेचून आणले होते. या भक्तांमध्ये गोविंदशास्त्री यांचा प्रथम मान होता. महाराज हे महायोगी आहेत समाधी घेतल्यानंतर काय करावे हे याचे ज्ञान फार कमी जणांना होते. त्यामुळे 'योगाभ्यास जाणणारा, योगी पुरुष त्यावेळी तेथे उपस्थित असणे आवश्यक होते' ही समर्थ गजाननाचीच यंत्रणा होती. गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर गोविंदशास्त्री यांनी लोणी आणावयाला सांगितले. स्वामींच्या मस्तकावर लोणी ठेवताच ते विरघळू लागले. योगशास्त्राचे हे बल पाहून सर्वजण चकित झाले. महाराज आपल्याला सोडून गेले नाही याची प्रत्येक भक्ताला खात्री पडली. महाराज कितीही काळपर्यंत अशा स्थितीत राहू शकतात याची ग्वाही गोविंदशास्त्रींनी दिली. परंतु अशा स्थितीत ठेवणे उचित नसून सर्व भक्त आले की स्वामींना समाधी द्या, असे गोविंदशास्त्रींचे म्हणणे सर्व भक्तांना पटले. समाधीचा सर्व विधी गोविंदशास्त्री आणि इतर विद्वान व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला. खरोखरच गोविंदशास्त्रींसारख्या भक्तांचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत. ते साधारण व्यक्ती नसून योगशास्त्रातील अधिकारी व्यक्ती होते. 
गोविंदशास्त्री आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी गजानन महाराजांची महती आणि श्रेष्ठत्व जाणले होते. एखाद्या अज्ञानी माणसाच्या ज्ञानामध्ये आणि एखाद्या विद्वान, त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीच्या ज्ञानामध्ये बराच फरक असतो. गोविंदशास्त्री दर्शनासाठी नेहमी शेगावात येत असत. एकदा त्यांनी गजानन महाराजांना विनंती करून आपल्या घरी डोणगावला आणले होते. 
शास्त्रींनी आपला चुलत भाऊ गणेश यांना वेदविद्या, ज्योतिष त्याचप्रमाणे भजन, कीर्तनाबाबत सर्व ज्ञान अवगत करून दिले होते. आपला ज्ञानाचा वारसा त्यांनी गणेश यांना दिला होता. गणेश पिंपरकर हे सुद्धा शास्त्रींप्रमाणे गजानन महाराजांना खूप मानत असत. ते शास्त्रींसोबत शेगावला दर्शनासाठी येत असत. कालांतराने गोविंदशास्त्रींनी सर्वसंगपरित्याग करून काशीला प्रयाण केले. तेथेच वास्तव्य केले आणि काशीविश्वेश्वराच्या सानिध्यातच आपला देह ठेवला.
गोविंदशास्त्री आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.