शेगांव (वि.प्र.) - मुंडगाव या गावावर गजानन महाराजांची विशेष कृपा होती, असे मानायला हरकत नाही. त्याकाळी मुंडगावमध्ये झ्यामसिंग राजपूत, पुंडलिक भोकरे, काशिनाथ कुलकर्णी, बायजाबाई ही श्रेष्ठ भक्त मंडळी राहत होती. ही सर्व भक्त मंडळी नियमितपणे शेगावची वारी करीत.
महाराजांचा पुष्कळ सहवास आणि सेवा लाभलेले काशिनाथ कुलकर्णी हे असामान्य भक्त होते. काशिनाथ कुलकर्णी हे मुंडगावच्या वतनदार पटवारी घराण्यातले होते. त्यांची नम्रता आणि भक्ती वाखाणण्याजोगी होती. परोपकारी वृत्ती आणि संतांविषयी आपुलकी असणारे हे व्यक्तिमत्व. त्यांना भजन-गायनाची आवड होती. शेगावी दर्शनाला आले की महाराजांसमोर बसून ते आपल्या गोड आवाजात भजन म्हणत असत. महाराजांची त्यांच्यावर विशेष कृपा होती. त्यांच्या आग्रहावरून महाराज एकदा मुंडगावला आले. शृंगारलेली बैलजोडी आंब्याच्या पानांची तोरणे लावून सजवलेल्या दमणीत बसून महाराज तेथे आले. काशिनाथबुवांनी महाराजांना आपल्या वाड्यात आणले. त्यांना चिलीम भरून दिली. गावात महाराजांची मिरवणूक सुद्धा काढली होती. जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या समारंभात झ्यामसिंग, पुंडलिक भोकरे आणि बायजाबाई या भक्तांनी महाराजांची विशेष बडदास्त ठेवली होती. महाराजांनी काशिनाथ कुलकर्णी यांना आपल्या पादुका सुद्धा दिल्या. त्यांची पत्नी द्वारकाबाई ही सुद्धा पतीप्रमाणेच महाराजांची भक्त होती. महाराज मुंडगावी आले की हे उभयता पती-पत्नी महाराजांच्या सेवेसाठी हजर असे. यांच्या घराण्यात भजनाची परंपरा होती. कुलकर्णी स्वतः अतिशय उत्तम भजन गात. त्यांचा मुलगासुद्धा गोड भजने गाऊ लागला.
एकदा कुलकर्णी शेगावी आले असताना त्यांच्याकडील एक सोन्याची मोहोर चोरीला गेली. त्यानंतर महाराज चोराच्या स्वप्नात गेले आणि त्याला दटावले की 'चोरलेली मोहोर परत कर'. तो चांगलाच घाबरला आणि दुसऱ्या दिवशी त्याने चोरलेली मोहोर परत केली. महाराजांचे भक्तांकडे किती लक्ष असते हे इथे दिसून येते.
समाधी घेण्याअगोदर आठवडाभर महाराज कुलकर्णी यांची आठवण काढत होते. त्यांची वाट बघत होते. दर्शनासाठी कुलकर्णी शेगाव येथे आल्यानंतर महाराजांचा संताप कमी झाला आणि चिडचिड थांबली. सद्गुरु आपल्या भक्ताची किती आतुरतेने वाट बघत असतो, याचा हा दाखला आहे. गजानन महाराज यांनी समाधी घेतल्यानंतर एकदा कुलकर्णी यांच्याकडे गोपाळनाथ नावाची व्यक्ती आली. त्यांनी गोपाळनाथ यांना भोजन दिले. पुढे गोपाळनाथ यांनी त्यांचे भजन ऐकले आणि ते अचानक तिथून निघून गेले, जणू गायबच झाले. कुलकर्णी यांनी ओळखले की हे महाराजच होते. कारण त्यांच्या भजन गायनाची महाराजांना अतिशय आवड होती. गोपाळनाथांच्या रूपात येऊन गजानन महाराज गोड आणि भावपूर्ण भजन ऐकून गेले.
काशिनाथ कुलकर्णी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा पिंड कावळ्याद्वारे लवकर घेतला गेला नाही. तेव्हा त्यांचा मुलगा भाऊसाहेब याने मनोमन प्रार्थना केली की, "आम्ही गजानन महाराजांची भक्ती आणि व्यवस्था पुढेही चालू ठेवू." असे कबूल केल्याबरोबर कावळ्याने तेथून पिंड उचलला. महाराज आपल्या भक्तांकडून सेवाकार्य करण्याची कबुली कशी करून घेतात हेच यावरून दिसून येते.
काशिनाथ आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.
श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प अठ्ठयाहत्तरावे - रामराव देशमुख
दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद या गावी देशमुख या धनसंपन्न आणि प्रसिद्ध घराण्यामध्ये रामराव यांचा जन्म झाला.
लहानपणी रामराव त्यांच्या आजीसोबत काकांकडे म्हैसांग या गावी आले. त्यावेळी देशमुखांकडे गजानन महाराज आले होते. लहान मुलांना महाराजांबद्दल खूप कौतुक आणि कुतूहल वाटायचे. आजीने त्यांना सांगितले होते की, 'गजानन महाराजांसारख्या संतांचा आशीर्वाद लाभला तर आपला भाग्योदय होतो.' आजीचे शब्द त्यांच्यासाठी जणू ब्रह्मवाक्य! गजानन महाराजांच्या मागे फिरत असताना महाराजांचा दृष्टिक्षेप या लहानग्या रामराव यांच्यावर पडला. महाराजांच्या दृष्टिक्षेपात सामर्थ्य होते. महाराजांनी ज्यांच्यावर कृपा केली त्याचे प्रत्यंतर त्यांना होत असे.
पुढे रामराव देशमुख हे शेगावला दर्शनासाठी येत असत. संतांची कृपा ज्या व्यक्तीवर झाली, त्याला जीवनात कशाचीही कमतरता राहत नाही. लहानपणी संत सहवास आणि कृपा झालेले रामराव आपल्या घराण्याचे संस्कार जोपासणारे होते. ते बुलढाणा येथे इंग्रजी शाळेत शिकत होते. पुढे त्यांना प्रेरणा झाली की समर्थ रामदासस्वामी यांच्या प्रमाणे आपणही तपश्चर्या करावी. त्यानुसार ते कोणालाही न सांगता जवळच्या डोंगरावर गेले आणि तपश्चर्येला बसले. संध्याकाळ झाली तरी मुलगा घरी आला नाही, म्हणून तपास सुरू झाला. सर्वत्र धावपळ सुरू झाली. तेव्हा ते सकाळी जंगलात सापडले. त्यांना घरी आणण्यात आले. प्रपंच करूनही परमार्थ साधता येतो, अशी सर्वांनी त्यांची समजूत घातली. पुढे ते पुन्हा जोमाने अभ्यासाला लागले.
उच्च शिक्षणासाठी रामराव पुढे लंडन येथे गेले. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी एलएलबी केली. बॅरिस्टर होऊन ते पुढे भारतात परत आले. ते ज्या ज्या क्षेत्रात गेले तेथे त्यांनी अनेक पदे भूषवली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत असत. पुढे ते ग्वाल्हेर संस्थांचे अर्थमंत्री होते. त्यानंतर ते डेमोक्रॅटिक स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष झाले. सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे भरीव कामगिरी केली. कालांतराने रिझर्व बँकेचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे ते राज्यसभेचे खासदार बनले. असे असामान्य आणि अजोड व्यक्तिमत्व असलेले बॅरिस्टर रामराव देशमुख वयाच्या ८९ व्या वर्षी इहलोक सोडून गेले.
रामराव देशमुख आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.