शेगांव (वि.प्र.) - करंजेकर हे मूळ कोल्हापूरचे रहिवासी होते. ते अतिशय उच्चशिक्षित असल्याने त्यांचा संतांपेक्षा विद्वत्तेवर जास्त विश्वास होता. महाराजांची ख्याती करंजेकरांनी ऐकली होती.
विद्वान, जिज्ञासू आणि मुमुक्षवादी लोकांशी झालेल्या चर्चेमध्ये करंजेकर यांच्यासोबत इंग्रजी भाषेतून झालेली चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. ते एकदा शेगावला महाराजांच्या दर्शनाला आले. त्यांच्याबरोबर पंचगव्हाण आणि अकोट येथील परशुराम पोतदार आणि जयवंत कुलकर्णी अशी विद्वान मंडळीसुद्धा दर्शनासाठी शेगावी आली. करंजेकर जेव्हा शेगावला आले, तेव्हा भास्कर पाटील महाराजांची महती कथन करताना म्हणाले की, "महाराज ब्रह्मज्ञानी आहेत. विप्रानासुद्धा वेद शिकवण्यासारखे वेदज्ञान त्यांना आहे." भास्कराचे हे बोलणे करंजेकरांसारख्या इंग्रजीतील उच्चशिक्षित व्यक्तीला कदाचित पटले नसावे. कारण महाराजांच्या बाह्य अवतारावरून प्रत्येक विद्वान भ्रमात पडायचाच. त्याचप्रमाणे कदाचित करंजेकरांची स्थिती झाली असावी. ज्याला शास्त्र आणि संत हे "ब्रह्म" असे म्हणतात, त्याविषयी आणि अध्यात्मशास्त्राविषयी जो गलबला नेहमीच सुरू असतो, त्याच संबंधित काही प्रश्न करंजेकरांना पडले होते. त्यामुळे त्यांनी गीतेच्या आठव्या अध्यायातील पहिला श्लोक उच्चारला,
किं तदब्रह्म किंमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम | अधिभूतेच किं प्रोक्तमधदैवम् किमच्युते || (गीता)
गीतेच्या या एकाच श्लोकामध्ये अर्जुन भगवान कृष्णाला विचारतो, "ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय ? सकाम कर्म म्हणजे काय? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय? देवता कोण आहेत?" आणि दुसऱ्याच श्लोकामध्ये, "यज्ञाचा अधिपती कोण? देहामध्ये तो कसा निवास करतो? भक्तीमध्ये युक्त झालेले लोक मृत्यूसमयी कसे पुढे जाऊ शकतात?" हे प्रश्न अर्जुनाचेच आहेत असे नाही, तर प्रत्येक जाणत्या जिज्ञासू जीवाला ते पडतात. जणू महाराजांना पारखण्यासाठीच करंजेकरांनी हा श्लोक उच्चारला. त्यांच्या त्या प्रश्नार्थक श्लोकाला महाराजांनी अस्खलित इंग्रजीमधून उत्तर देण्यास सुरुवात केली. महाराजांची अमृतवाणी ऐकून करंजेकर मुग्ध होऊन गेले. तृप्त होऊन गेले. आजपर्यंत महाराजांची माहिती त्यांच्या ऐकिवात होती, पण आज त्यांनी आपल्या चर्मचक्षूंनी प्रत्यक्ष परब्रम्ह बघितले. महाराजांचे खरे स्वरूप त्यांना कळले. महाराज ईश्वरी अवतार आहेत. चैतन्य स्वरूप सावळे परब्रम्ह प्रत्यक्ष पाहून करंजेकर धन्य झाले. अशा प्रकारे उच्चतम जिज्ञासेला पोहोचलेले जीव महाराजांनी मुमुक्षु अवस्थेत पोहोचविले. त्यांना या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त केले. ईश्वरनिष्ठांना दर्शन देऊन बोध करून त्यांना जीवदशेतून वर काढून आत्मस्थितीत नेऊन ठेवले आणि त्यांना क्षणार्धात खऱ्या स्वरूपाची प्राप्ती करून दिली.
वाडेगाव हे शेगाव पासून ३०-३२ किलोमीटर अंतरावर निर्गुणा नदीच्या काठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. येथे निर्गुणा नदीच्या काठावर अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे. काही वेळा गजानन महाराज या ठिकाणी येत असतात. या गावात अनंतशास्त्री नावाचे अतिशय वेदपारंगत असे विद्वान गृहस्थ होते आणि महाराष्ट्र जणू वेदब्रह्मच! अनंतशास्त्री आणि गजानन महाराजांची संस्कृत भाषेतच चर्चा होई. महाराज अनंतशास्त्रीसोबत बोलताना आरोह-अवरोह सांभाळून अगदी स्पष्ट छंदबद्ध स्वरात वेदऋचांचा उच्चार करीत असत. अनंतशास्त्री हे गजानन महाराजांना आपले आराध्य मानीत असत. महाराज वाडेगावला गेल्यावर त्यांना भेटण्यासाठी शास्त्री येत असत. महाराजांची ही संस्कृत चर्चा त्यावेळी अनेकांना मंत्रमुग्ध करायची. खऱ्या अर्थाने मौनी भासणारे, अवलिया भासणारे महाराज या विद्वानांसोबत वैदिक पंडितांनासुद्धा लाजवेल अशा पद्धतीने वेदऋचा म्हणत.
करंजेकर, अनंतशास्त्री आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.