शेगांव (वि.प्र.) - गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वीच बाळाभाऊ यांना हात धरून आपल्या गादीवर बसवले आणि आपला उत्तराधिकारी नेमले. गजानन महाराजांनी संकेत दिल्यानुसार नारायण महाराज यांनी या अधिकार पदावर विराजमान होऊन भक्तांना मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्य बाळाभाऊ यांच्यानंतर केले.
नांदुरा येथील महादूजी देवकर आणि देवकीबाई हे शंकराचे निश्चिम उपासक होते. या गरीब कुटुंबात नारायणांचा जन्म झाला. नारायण लहानपणापासूनच शांत आणि धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना भजनाचा, पोथीपुराणे ऐकण्याचा नाद होता. ते रानावनात फिरत असत आणि वनात निवांतपणे भजन, नामस्मरण करीत बसत. गावात भिक्षा मागून गोळा केलेले अन्न ते गरिबांना वाटून देत. त्यांना गोरगरिबांविषयी विलक्षण प्रेम होते. खामगावजवळ वाघोली येथे बारा वर्षे त्यांनी हनुमंताची उपासना आणि तपश्चर्या केली. त्यानंतर भुसावळ तालुक्यातील उधळी या पहाडी प्रदेशात शिव-उपासना करून योग मार्गात उच्चतम स्तर प्राप्त केला. नारायण महाराज संतत्व पदाला पोहोचले. या भागात त्यांनी अनेक चमत्कार केले. त्यांचे चमत्कार नांदुरा येथील गजाधर या व्यक्तीला समजले. त्याने उधळी येथे जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि नांदुरा येथे आपल्या घरी परत यावे, अशी विनंती केली. गजाधर याच्या आग्रहामुळे नारायण पुन्हा आपल्या गावी परत आले. त्यांना घरी आल्याचे पाहून सर्वांनाच आनंद झाला.
नांदुरा येथे आल्यावरसुद्धा नारायण महाराज यांनी अनेक चमत्कार केले. त्यांच्या कृपेने रावजी राखुंडे यांना संतान प्राप्ती झाली. एकदा एक कुत्री मरून पडली होती. नारायण महाराजांनी तिचा कान पकडून तिला उचलतात ती जिवंत झाली.
नांदुरा गावातील नारायण पुराणिक हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. एकदा त्यांनी गजानन महाराजांना आपल्या घरी आणले. घरी येताच गजानन महाराजांनी त्यांना विचारले, "येथे घोंगडीवाला कोण राहतो? त्याला माझ्यापाशी घेऊन ये." गजानन महाराजांनी अंतर्ज्ञानाने सर्वकाही जाणले होते. नारायण महाराजांना निरोप देण्यात आला की, आपल्याला शेगावच्या गजानन महाराजांनी भेटीला बोलावले आहे. हे ऐकताच नारायण महाराज गजानन महाराजांच्या भेटीला धावतच आले. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. अशाप्रकारे नारायण महाराजांचे संतप्रेम आणि भोळाभाव पाहून गजानन महाराजांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला.
नांदुरा गावातील पुंजासा सावजी नावाचे एक गृहस्थ होते. त्यांचा तुपाचा धंदा होता. ते नित्यनेमाने नारायण महाराजांची सेवा करीत असत. एक दिवस कोणालाही न सांगता नारायण महाराज शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले. नारायण महाराज नांदुऱ्यात नाहीत, हे समजताच पुंजासा सावजी शेगावला गेले. दोन्ही संतांना एकत्र पाहून पुंजासा सावजींना अतिशय आनंद झाला. त्याने नारायण महाराजांविषयीचा सर्व वृत्तांत मठातील लोकांना सांगितला. सर्वांना अतिशय आनंद झाला. अशा प्रकारे संतत्व प्राप्त होऊनसुद्धा नारायण महाराजांनी गजानन महाराजांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांची मनोभावे सेवा केली. यावरून गजानन महाराजांचे श्रेष्ठत्वसुद्धा लक्षात येते. गजानन महाराज म्हणजे प्रत्यक्ष परब्रम्ह आहेत, याची जाणीव नारायण महाराजांसारख्या संतपदावरील व्यक्तीला झाली होती.
ज्यावेळी बाळाभाऊ यांनी समाधी घेतली तेव्हा नारायण महाराज नांदुरा येथे आले होते. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात जाऊन गजानन महाराजांनी त्यांना शेगावला त्वरित जाण्याची आज्ञा केली. सद्गुरूंचा आदेश मान्य करून ते शेगावी पोचले. गजानन महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी पुढे काही काळ भक्तांना मार्गदर्शन केले. सन १९३६ मध्ये त्यांनी गजानन महाराजांच्या चरणी समाधी घेतली.
नारायण महाराज आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.
|| श्री मोदक ||
ॐ गजानना गुरुराया |
सच्चिदानंदस्वरुपा |
शेगाव क्रिडारमणा |
दुःखदारिद्रयप्रभंजना || 1 ||
तू दीनपतितपावना |
इच्छितवरदायका |
भक्तकल्याणकारका |
योगीराज आनंदरुपा || 2 ||
तू ज्ञानविज्ञानस्वरुपा |
वेदवेदान्तप्रकाशा |
आपस्तंभा तू मुळारंभा |
भृगुर्बह्मा ऋषिश्वरा || 3 ||
अजानबाहू दिगंबरा |
करीचिलीमधारका |
उपाधि विरक्तरुपा |
अवलियादंभकारका || 4 ||
नासिकाग्रदृष्टीस्थिरा |
निरंजना अलक्षमुद्रा |
सगुणनिर्गुण विस्तारा |
गजाननायोगसिद्धा || 5 ||
बापुसत्वंदत्तस्वरुपा |
बापुनांविठ्ठलरुपा |
बाळकृष्णे रामदासा |
शंकरबुवेरामरुपा || 6 ||
बाळशास्त्रेउमारमणा |
निमोणकरा श्री गणेशा | मुंगसाजीत्वंतपंब्रह्मा |
नरसिंगा योगेश्वरा || 7 ||
अकोलीकुपापुष्करिणां |
अकोटी पातळगंगा |
द्वारकेश्वरी मनकर्णा |
ओंकारकन्यापुजका || 8 ||
देविदासा तु जलंब्रह्मा |
बंकटा अद्वैतरुपा|
तात्यास गृहस्थधर्मा |
टाकळीकरा सोहंरुपा || 9 ||
व्रजभुषणां कर्मब्रह्मा |
महेताबा सर्वधर्मा |
श्रीधरा देशसेवाव्रता |
गीतारहस्यप्रसादा || 10 ||
हरीपाटला बलरुपां |
ब्रह्मगिरी गर्वनाशा |
विप्रमाधवामहारौद्रा |
दांभिकादंडदेयका || 11 ||
जाखड्या पत्नीदेयका |
रामदेवा पुत्रवरदां |
वारकरे विघ्नरक्षां |
बिरबला सद्गुरुत्वां || 12 ||
मृतश्वाना जिवित्वदाना |
सुकलाले गोरक्षका |
निवारंद्वाडवारुत्वा |
अडगांव काकरक्षका || 13 ||
बंडुतात्यां दैन्यहरा |
पुंडलीका भक्तरक्षका |
कवंरभाके उपोषिता |
बुटीअहंकारनाशका || 14||
बायजेत्वंसत्वरक्षका |
जानके पुत्रत्ववरा|
ज्ञानेष्कन्नेमाऊलीरुपा |
साळूंआज्ञा अन्नब्रह्मा || 15 ||
आत्मारामे ज्ञानसविता |
मारुत्पंते धान्यराखा |
देवमास्तरा राजगुह्या |
आसराजी प्रायश्चित्ता || 16 ||
बच्चुलाले मनोरथा |
झ्यामसिंगा पर्जन्येश्वरा |
झुंबरलाला धनदर्शा |
मणीरामां गजमुखा || 17 ||
गणु जवरी रक्षका |
भारती रोगनिवारका |
भक्ता आरोग्यदेयका |
जानरावा चरणतीर्थां || 18 ||
खापर्डेत्वंसर्वेश्वरा |
दत्तोपंता परमहंसा |
करंजेकरा परंब्रह्मा |
रंगनाथागुणातीता || 19||
श्री भास्करा वैकुंठधामा |
पीतांबरा श्रीभुषणा |
बाळास पुरुषोत्तमा |
गणेशकुळासार्वभौमा || 20 ||
स्वामीसमर्थ शिष्यत्वां |
कपिलतिर्था तपरुपा |
सुनंदायांतुब्रह्मसिद्धा |
शेगाव संजीवस्थिता || 21 ||
भार्गेश्रद्धाभक्ति अर्पिता |
आवडी तव मोदका |
पुरविभक्त मनोरथा |
सुखशांतित्वदायका || 22 ||
|| इति भार्गवकृतं
एकविंशोमोदकं
श्रीगजाननार्पणमस्तू ||