पत्रकारांच्या मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन.!

बल्लारपुर (का.प्र.) - शासन दरबारी प्रलंबीत असलेल्या पत्रकारांच्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहीती अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.      
ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करून तसे शासन निर्णय काढावे, पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने द्यावी. माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. त्या घोषणेची अमंलबजावणी करण्यात यावी. टीव्ही, रेडियोआणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा, अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत. सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी.
सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी, आदी मागण्यांकारिता हे धरणे आंदोलन करण्यात आले.
व्हाॕईस आॕफ मीडियाच्या राज्य कोअर टिमच्या निर्देशानुसार मागण्याचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशमुख आणि जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांना देण्यात आले. यावेळी व्हाॕईस आँफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, राज्य सदस्य श्याम ठेंगडी, साप्ताहीक विंगचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड, चंद्रपूर महानगर अध्यक्ष सारंग पांडे, कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडीया, गुरू गुरनुले, अनिल बाळसराफ, अमर बुध्दारपवार, तालुकाध्यक्ष चैतन्य लुथडे, मंगेश पोटवार, प्रविण झोडे, दयाराम फटींग, रामदास हेमके, सुरेश डांगे, मनोहर दोतपल्ली, विनोद बोदले, नरेश निकुरे, विट्ठल आवले, आशिष रैच, संजय कन्नावार, अनूप यादव, दीपक शर्मा आदीसह जिल्ह्यातील तीनही विंगचे महीला व पुरूष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.