वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शोकसंवेदना.!
बल्लारपुर (का.प्र.) : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा जपणारा आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा वसा आयुष्यभर जपलेल्या व्यक्तीला आपण गमावले असल्याची भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ह.भ.प. बाबासाहेबांच्या निधनाने अतीव वेदना झाल्या. महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्मासाठी अर्पण केले. वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा बाबा महाराज सातारकरांनी यथायोग्य जपली. कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा त्यांनी घेतलेला वसा मागील अनेक दशके सुरु होता. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारकडून सन २०२०-२१ चा ज्ञानोबा - तुकोबा पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या जाण्याने समाजप्रबोधनातील एक ओजस्वी आवाज हरवल्याची खंत आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबियांना व शिष्य वर्गाला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच प्रार्थना.