एकावर एक फ्री! फेक ऑनररी पीएचडी वाटप घोटाळा!
मुंबई (जगदीश काशिकर) : कोणत्याही देशाची मान्यता नसलेले विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्यांनी पीएचडीचा मांडलेला बाजार 'स्प्राऊट्स'ने (ईंग्लिश वृत्तपत्र) सातत्याने उघडकीस आणला. जनजागृती झाली, तसा धंदा मंदावला. पण झटपट पैशाची चटक लागलेले महाठग थोडेच सुधारणार? त्यांनी आता जुनी दारू नव्या बाटलीत विकण्याचा धंदा सुरु केला आहे.
पीएचडी वितरणाचा कार्यक्रम बिनबोभाट करता येत नाही, म्हणून पुरस्कार सोहळ्याचा गोंडस थाट मांडला जात आहे. अर्थात हे पुरस्कार कसे मिळवतात, हे वेगळे सांगायला नको, असो. आणि आज याच पुरस्कार सोहळ्यात १० ते १५ जणांचे पदवीदानही उरकून घेतले जाते. म्हणायला पुरस्कार सोहळा, त्यासाठी फार परवानग्या काढायची गरज नाही. आणि मधूनच पदवी, अशी ही डबल कमाईची टूम सध्या नव्याने फोफावत आहे.
'स्प्राऊट्स'ने सातत्याने आवाज उठवल्याने अनेक बड्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमात पाहुणे म्हणून येण्याचे बंद केले. अर्थातच कार्यक्रमाचे ग्लॅमर कमी झाले. ते पुन्हा कमविण्यासाठी हा नवा मार्ग भामट्या आयोजकांनी शोधून काढलेला आहे. येणारे पाहुणेही पुरस्कार समारंभासाठी येतात. महाराष्ट्र सदन, पत्रकार भवन अशा नावाजलेल्या ठिकाणी सोहळे होतात. दुर्दैव म्हणजे कुणीच खात्री करून घेण्याच्या भानगडीत पडत नाही.
झोपेचे सोंग घेतलेले आयोगाचे भ्रष्ट अधिकारी : केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मानद पीएचडी विकण्याचा धंदा तेजीत चालला आहे. हे पीएचडी वाटप करण्याचे कार्यक्रम जवळपास दररोज होत आहेत. यातील बहुतांशी कार्यक्रम हे पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात होतात. याविषयीच्या तक्रारी 'स्प्राऊट्स'ने 'विद्यापीठ अनुदान आयोगा'कडे (युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन) वारंवार केलेल्या आहेत. मात्र इतके होऊनसुद्धा आयोगा'चे वरीष्ठ अधिकारी 'हप्ते' खाऊन झोपेचे सोंग घेत आहे, अशी खळबळजनक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (SIT) हाती आलेली आहे.
भारतात सध्या पुरस्कार म्हणजेच पुरस्कार वाटण्याचे (Award Distribution) कार्यक्रम सर्रास होत असतात. यातील काही अपवाद वगळता सर्वच कार्यक्रम हे 'पेड' असतात. अवार्ड घेणाऱ्याकडून कार्यक्रमाच्या खर्चासाठी दामदुपटीने पैसे घेतले जातात. याशिवाय प्रसारमाध्यमांतून त्या व्यक्तीची प्रसिद्धी करायची झाल्यास वेगळे पैसे आकारले जातात.
अशा कार्यक्रमातच बोगस पीएचडी पदवीचे 'गिऱ्हाईक' हेरले जाते व त्याच्याकडून अक्षरश: लाखो रुपये उकळले जातात. या कार्यक्रमात तर गृहमंत्री, शिक्षण मंत्री इतकेच नव्हे तर निवृत्त न्यायाधिशांनाही आणण्याचे लेखी प्रॉमिस केले जाते, प्रत्यक्षात यापैकी कोणीही येत नाही. येतात त्या फक्त 'सी' ग्रेडच्या फटाकड्या नट्या व लो प्रोफाइल राजकीय नेते.
अभिषेक पांडे (Abhishek Pandey) हा असाच एक भामटा (fraudster). सध्या हा भामटा Maryland State University, The University of Macaria, Theophany University हे तीन बोगस विद्यापीठ चालवतो. याचा भांडाफोड 'स्प्राऊट्स'ने याआधी केलेला होता. त्यामुळे या भामट्याचा खरा चेहरा जनतेसमोर आला.
सध्या पांडे याने स्वत:ची इमेज सुधारण्यासाठी पुरस्कार- अवार्ड वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी केवळ मंत्रीसंत्री नव्हे तर दस्तरखुद्द काँगेसचे नेते राहुल गांधी येणार आहेत, अशी सोशल मीडियावरून जाहिरातही या भामट्याने केलेली आहे. या जाहिरातीतून पांडे हा लोकांची दिशाभूल करतो व त्यांच्याकडून दामदुपटीने पैसे गोळा करतो, हे दिसून येते.
पांडे हा या तीन बोगस विद्यापीठांचा मास्टरमाइंड आहे. वास्तविक या विद्यापीठांना भारतासह कोणत्याही देशात कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे केवळ नकली सर्टिफिकेट छापून हा उमेदवारांकडून लाखो रुपये उकळतो, याच पद्धतीने या भामट्याने शेकडो उमेदवारांकडून अक्षरश: कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे, या सर्व गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही स्प्राऊट्सच्या वतीने संबंधित विभागाकडे केली जाणार आहे.
मागील वर्षी चक्क मुंबईतील राजभवनात बोगस पीएचडी पदव्या (honorary doctorate- honoris causa) वाटण्याचा कार्यक्रम थाटामाटात साजरा झाला. या कार्यक्रमाला राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेल्या उल्हास मुणगेकर या भ्रष्ट अधिकाऱ्याची साथ होती. याचा भांडाफोडही 'स्प्राऊट्स' या इंग्रजी दैनिकाने त्यावेळी केला होता, मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातले. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. आजही हाच मुणगेकर राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेला आहे व राजभवनात बसून आर्थिक घोटाळे करीत आहे.
पुण्यातील पत्रकारांनाही गंडवलं! : अगदी असाच एक कार्यक्रम महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. वास्तविक पुणे हे तर विद्येचे माहेरघर. मात्र या विद्यानगरीतही बोगस पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम झाला. तोही नाना पेठमधील पत्रकार भवनातच. छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ, असे या कथित vartual विद्यापीठाचे नाव आहे.
हे विद्यापीठ अमरावतीत असल्याचा दावा केला जातो. वास्तविक अशा virtual विद्यापीठांना भारतात मान्यता नाही. त्यामुळे त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचा अर्थ हे कथित विद्यापीठ सपशेल बोगस आहे, तरीही लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे, व अशी बोगस विद्यापीठे नियमबाह्य पद्धतीने चालवली जात आहे, त्यातही हा कार्यक्रम पत्रकार भवनात व्हावा व पत्रकारांनी मूग गिळून गप्प राहावे, यापेक्षा दुर्दैव ते काय?
या कार्यक्रमामध्ये अलिबाग येथील पत्रकार जयपाल पाटील (Jaypal Patil) यांसारख्या पत्रकारांना बोगस पीएचडी पदव्या दिल्या. या पदवी प्रमाणपत्रावर प्रकाश घवघवे (Prakash Ghavghave), मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh ) व नरेशचंद्र काठोले (Nareshchandra Kathole ) या भामट्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या तिघांच्या टोळीनेही आजवर अनेकांना बोगस पीएचडी पदव्या वाटलेल्या आहेत.
भुरटे पत्रकारही आघाडीवर : महेंद्र देशपांडे (Mahendra Deshpande, नाशिक) व विश्वास आरोटे (Vishwasrao Arote, Akole) या दोन पत्रकारांनीही आता बोगस पीएचडी घेतलेली आहेत. सध्या हे दोघे पुरस्कार वाटण्याच्या नावाखाली चक्क बोगस पीएचडी पदवी वाटतात, असे स्प्राऊट्सच्या निदर्शनास आलेले आहे.
वाचकांना आवाहन : बोगस पीएचडी वाटप करणाऱ्यांचा 'स्प्राऊट्स' मागावर आहे. यासंबंधीचे अनेक गैरव्यवहार 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने (SIT ) उघडकीस आणलेले आहे. आपल्याला शक्य झाल्यास ही स्पेशल स्टोरी सर्वत्र व्हायरल करा.