वरोरा (वि.प्र.) : कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, वरोरा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा तसेच मुंबई, पुण्यासाठी दररोज सुपर एक्सप्रेस चालविण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी वरोरा - भद्रावती - चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून निगरगट्ट जनप्रतिनिधी व कामचुकार प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात जनतेत तीव्र आक्रोश खदखदत असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने निदर्शनास आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मागण्या सोडविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी डॉ शिवनंदा लंगडापुरे यांनी दिले. सुप्रसिद्ध चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या हस्ते निंबू शरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणात संघाचे सचिव जितेंद्र चोरडिया, उपाध्यक्ष प्रवीण गंधारे, सहसचिव अशोक बावणे, संघटक राहुल देवडे, सदस्य खेमचंद नेरकर, प्रवीण सुराना, मयूर दसुडे यांचा समावेश होता. उपोषणाला वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. रेल्वेच्या विविध समस्या निराकरण करण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडू,असा इशारा वरोरा - भद्रावती - चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी दिला. संघाच्या वतीने राहुल देवडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.