माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना मी सर्वप्रथम पाहिले .!

मुंबई (जगदीश काशिकर) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना मी सर्वप्रथम पाहिले तेव्हा मी जेमतेम पंधरा वर्षाचा होतो. माझ्या आठवणीनुसार ते १९७० हे वर्ष होते. नंतर असंच दुरून बघण्याचा योग बरेचदा आला. मात्र प्रत्यक्ष भेटण्याचा आणि बोलण्याचा योग येण्यासाठी १९७८ पर्यंत वाट बघावी लागली होती.
१९७८ मध्ये नागपूरचे प्रतिष्ठित नागरिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतसंघचालक बाबासाहेब घरटे यांचे चिरंजीव आणि संत गुलाबराव महाराजांचे अभ्यासक डॉक्टर श्रीकृष्ण उपाध्य भैय्यासाहेब घटाटे यांच्या संत गुलाबराव महाराजांवरील ग्रंथाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे हस्ते होणार होते. हा समारंभ एवढी दिल्लीतील पंतप्रधानांचे तत्कालीन निवासस्थान १ सफदरजंग मार्ग येथे होणार होता. माझे आणि घटाटे परिवाराचे स्नेहाचे संबंध होते. त्यावेळी मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. या समारंभासाठी मी दिल्लीला यावे आणि समारंभाचे चलत् चित्रण करून द्यावे असा भैय्यासाहेबांचा आग्रह होता. त्या आग्रहाला प्रतिसाद देत मी दिल्लीला गेलो होतो.
त्या संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उभारलेल्या शामियाणन्यात बहुतेक सर्व निमंत्रित जमले होते. मात्र पंतप्रधानांना येण्यास थोडा वेळ होता. समारंभासाठी डॉ. भैय्यासाहेब घटाटे यांच्यासोबत डॉ. अरविंद जोशी, प्रा. सुरेश देशपांडे, डॉ. रूपा कुलकर्णी. डॉक्टर श्री .भा.वर्णेकर, डॉ. म. रा. जोशी असे अनेक मान्यवर विद्वान गोळा झाले होते.
अचानक सायरन वाजवत वाहनांचा ताफा शामियान्यासमोर येऊन थांबला आणि सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली. कोण आले म्हणून बघायला गेलो तर त्यातून तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री अटल बिहारी वाजपेयी हे उतरत होते. वाजपेयींचा आणि घटाटे परिवाराचा चांगलाच स्नेहबंध होता. त्या स्नेहापोटीच ते या कार्यक्रमाला आले होते.
अटल बिहारी वाजपेयी हे एक चांगले वक्ते आहेत आणि चांगले साहित्यिकही आहेत इथपर्यंत मला माहिती होती. मात्र विविध भाषांचा त्यांचा अभ्यास आहे याची मला कल्पना नव्हती. भैय्यासाहेब घटाटे  यांचे ज्येष्ठ बंधू एड. आप्पासाहेब घटाटे हे त्यावेळी दिल्ली मुक्कामीच सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. आप्पासाहेबांची मुलेही या कार्यक्रमात आली होती. त्यांना बघून अटलजींनी त्यांच्याशी शुद्ध मराठीत संवाद साधायला सुरुवात केली.  अटलजी मराठीत बोलताना ऐकून मी अक्षरशः हादरलो. त्या लहान मुलांशी संवाद साधल्यावर अटलजींनी इतरांशी बोलायला सुरुवात केली. तितक्यात कोणीतरी माझी ओळख करून दिली. मी सवयीने त्यांच्याशी हिंदीत बोलू लागलो मात्र अटलजी लगेच म्हणाले, मला मराठी समजते तू माझ्याशी मराठीतच बोल. त्यांची ही सूचना हा माझ्यासाठी दुसरा धक्का होता. मी त्यांना विचारले की आपल्याला मराठीचा इतका चांगला सराव कसा आहे? त्यावेळी अटलजी उत्तरले की मी मराठी साहित्याचाही अभ्यास केला आहे. अनेक मराठी मंडळींबरोबर वावरलो आहे. त्यामुळे मला मराठी चांगली येते. नंतर कोणीतरी मला सांगितले की अटलजींना मराठीसोबत किमान सहा ते सात भारतीय भाषांमध्ये संवाद साधता येतो, इतका त्यांचा सराव आहे.त्यांचा भारतीय भाषांवर चांगलाच अभ्यास आहे हे ऐकून माझा या व्यक्तिमत्वाबाबतचा आदर अधिकच दुणावला.
नंतरच्या काळात पत्रकार म्हणून वावरताना अनेकदा भाषणांमध्ये अटलजींनी काही वेळा शुद्ध मराठीत काही वाक्य बोललेली लक्षात आहेत. १९९५ मध्ये भाजपचे मुंबईत महा अधिवेशन झाले. त्याआधी  पुण्यात कार्यकारिणीची बैठक झाली होती. यावेळी पुण्याच्या एसपी कॉलेज मैदानावर झालेल्या जाहीर सभेत बोलताना आपल्या भाषणाची सुरुवात अटलजींनी अस्खलित मराठीत केली होती. या मराठी भाषणानेच त्यांनी पुणेकरांना जिंकले.
मला आठवतंय २००८ मध्ये दिल्ली दिल्ली स्थित ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणी  यांच्या दिल्ली दरबार या पुस्तकाचे प्रकाशन नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे हस्ते झाले होते. दाणींचे हे पुस्तक मराठीत होते. त्यावेळी बोलताना अडवाणी म्हणाले की माझा मराठीचा काहीही अभ्यास नाही, मात्र आमचे ज्येष्ठ सहकारी अटलजींचा मराठीत चांगला अभ्यास आहे. ते जर आज इथे असते तर त्यांनी या पुस्तकाचे पूर्णतः समीक्षण केले असते असेही त्यांनी जाहीररीत्या सांगितले होते. अटलजींच्या बहुश्रुततेला त्यांच्या ज्येष्ठ सहका-याने दिलेली ही दाद होती.
अटलजी २००४ मध्ये राजकारणातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना स्वर्गवासी होऊनही आज पाच सहा वर्षे लोटली आहेत. आज अटलजींचा जन्मदिवस आहे. सकाळी समाज माध्यमावर हा उल्लेख बघितल्यावर अटलजींच्या या आठवणी जाग्या झाल्या.
अटलजींच्या पुण्यपावन स्मृती माझे विनम्र अभिवादन.
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.