मुंबई (जगदीश काशिकर) : सरकारी संस्था, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचालनालय, धर्मदाय आयुक्त कार्यालय व मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील शिक्षणमाफियाने खोटे प्रस्ताव शपथपत्रांवर सादर केले व त्याआधारे १२० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा महाभ्रष्टाचार केला, अशी खळबळजनक माहिती 'आरटीआय'च्या माध्यमातून 'स्प्राऊट्स' (ईंग्लिश वृत्तपत्र) च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सापगाव हे गाव आहे. या गावात कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टच्या (Koti Charitable Trust ) मालकीचे अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ARMIET) हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये डिप्लोमा, डिग्री, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग व एमएमएस यांसारखे कोर्सेस घेतले जातात.
हे कोर्सेस चालविण्यासाठी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) या केंद्रीय तंत्रशिक्षण परिषदेची तर राज्यात तंत्रशिक्षण संचालनालयची (DTE) मान्यता असणे बंधनकारक आहे. ही मान्यता मिळवण्यासाठी मानकांची (approved handbook) पूर्तता करावी लागते. यामध्ये शिक्षक- विद्यार्थी प्रमाण, पायाभूत सुविधा, बांधकाम क्षेत्र, वर्ग, प्रयोगशाळा, भोगवटा प्रमाणपत्र (OC Certificate), अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, कर्मचाऱ्यांचे पगार यांसंबंधीची इत्यंभूत माहितीची नोंद करावी लागते. हे हँडबुक प्रतिवर्षी अपडेट करावे लागते व त्याआधारे प्रतिवर्षी पुनर्मान्यता मिळते.
ARMIET या कॉलेजने मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) यांचीही संलग्नता (affiliation) मिळवलेली आहे. ही संलग्नता मिळवण्यासाठी विद्यापीठालाही कॉलेजसंबंधी इत्यंभूत माहिती आवश्यक कागदपत्रांसह पुरवावी लागते. मात्र कोटी चॅरिटेबल ट्रस्टने AICTE, DTE, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळालाही चक्क खोटी माहिती व बनावट डॉक्युमेंट्स असलेले प्रस्ताव सादर केले.
याआधारेच मान्यता व संलग्नता मिळवली, इतकेच नव्हे तर दरवर्षी अशाच प्रकारे खोटी माहिती व ऑडिट सादर केले. त्यातूनच विद्यार्थी व सरकारची फसवणूक केल्याची माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमकडे आलेली आहे.
कोटी चॅरिटेबल ट्रस्टने ही सारी खोटी माहिती शपथपत्रावर (affidavit ) दिलेली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे AICTE, DTE व मुंबई विद्यापीठाच्या उच्च अधिकाऱ्यांनी ही सर्व माहिती व कागदपत्रांची सत्यता तपासली व प्रत्यक्ष कॉलेजला भेटही दिली, तपासणी केली व सर्व काही कायदेशीर असल्याचा खोटा निर्वाळाही दिलेला आहे.
विद्यार्थ्यांच्या शुल्कातही (fees) महाघोटाळा .!
कोटी चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचे ARMIET हे कॉलेज विनाअनुदानित आहे. त्यामुळे शिक्षकांचा पगार हा कॉलेजच्या व्यवस्थापनाला करावा लागतो, त्यामुळे या कॉलेजचे शुल्क ठरविण्याचा अधिकार हा शुल्क नियामक प्राधिकरण (Fees Regularitory Authority) या समितीकडे आहे. या समितीलाही चक्क खोटी माहिती व बनावट ऑडिट रिपोर्ट सादर करण्यात आले. ही खोटी माहिती सादर करताना फुगवटा म्हणजेच वाढीव कर्मचारी व त्यांचे वाढीव पगार दाखविण्यात आले व त्याआधारेच वाढीव शुल्क मंजूर करून घेतले.
तसेच या कॉलेजने 'कलाश्री व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट'च्या नावेसुद्धा वाढीव शुल्क घेतल्याचे निदर्शनास आल्याची माहितीही 'स्प्राऊट्स'ला मिळालेली आहे.
शुल्क प्रस्ताव व शिक्षक घोटाळा .!
● या ट्रस्टने शुल्क वाढीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. या प्रस्तावात बनावट कर्मचाऱ्यांची यादी दाखवून त्यांना वेतन दिल्याचे दाखविण्यात आलेले आहे. या कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये संस्थाचालकांचे नातेवाईक, मित्र परिवार व इतर अनेक बनावट कर्मचारी दाखविण्यात आलेले आहेत.
● या बनावट कर्मचाऱ्यांच्या नावासमोर 'डोंबिवली नागरी सहकारी बँके'चा खाते नंबर व त्यांना देण्यात आलेला पगारसुद्धा नमूद करण्यात आलेला आहे. तसेच काम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाचादेखील या यादीत समावेश आहे.
● संस्थाचालकांच्या नातेवाईकांना नियमांचे उल्लंघन करत वाढीव वेतन देण्यात आलेले आहे. हे सर्व करताना नियम धाब्यावर बसविण्यात आलेले असल्याचे 'स्प्राऊट्स'च्या टीमला निदर्शनास आलेले आहे.
शुल्क नियामक प्राधिकरणाला बोगस कर्मचाऱ्यांची नावे सादर करून, त्याआधारे शुल्क मंजूर करून घेतले. त्यामुळे शुल्क प्रवर्गातील विद्यार्थी व राज्य सरकारच्या समाजकल्याण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अल्पसंख्याक विभाग या सर्वांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे.
असा केला महाघोटाळा? .!
● सन २०२१ ते २०२२ च्या आधी एका विद्यार्थ्याचे शुल्क जवळपास १ लाख रुपयांच्या आसपास होते. हे शुल्क घेताना विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे, यामुळे काही कर्मचारी व संघटना यांनी तक्रारी केल्या. रामचंद्र परशुराम यादव, अपर्णा खाडे, निकिता राव, निलेश पंडित यांनी तर 'मुक्ता शिक्षक संघटना', 'शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' या संघटनांनी तक्रारी केल्या, वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे कॉलेजच्या व्यवस्थापनाचे धाबे दणाणले.
● या तक्रारी व पाठपुराव्यानंतर तात्काळ आदेश आला व कॉलेजच्या व्यवस्थापनाने हे शुल्क ६० हजार रुपयांच्या आसपास केले.
● आतापर्यंत या कॉलेजमध्ये ६००० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. साधारणतः इंजिनीअरिंगचा कोर्स हा ४ वर्षांचा असतो. त्यामुळे प्रतिविद्यार्थी सुमारे २ लाख रुपये व्यवस्थापनाने लाटले आहेत. त्यामुळे हा घोटाळा १२० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा झालेला आहे, अशी माहिती 'स्प्राऊट्स'च्या एसआयटीला मिळालेली आहे.
संस्थाचालकांवर एफआयआर दाखल .!
● या ट्रस्टचे संस्थाचालक अलमुरी वेंकटेश्वर गुप्ता (Alamuri Venkateshwar Gupta) आणि डॉ. लवेंद्र बोथरा (Dr.Lavendra S. Bothra) यांच्या विरोधात शहापूर पोलीस स्टेशन येथे ३४, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
● संस्थाचालकांनी विद्यार्थी व सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे, मात्र आतापर्यंत फक्त आदिवासी विभागाने एफआयआर केलेला आहे. बाकी इतर विभाग व्यवस्थापनाकडून पैसे मिळाल्यामुळे मूग गिळून गप्प आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
लुटारू सरकारी अधिकारी मोकाट .!
या महाभ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे तत्कालीन अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे तत्कालीन पश्चिम विभाग प्रमुख अजित सिंग, तंत्रशिक्षण संचालनालय (महाराष्ट्र राज्य) माजी संचालक डॉ. अभय वाघ व सध्याचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (मुंबई) उपसचिव संतोष ताजी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, नियमबाह्य पद्धतीने नेमणूक झालेले प्र.कुलगुरू अजय भामरे, प्र-कुलसचिव सुनील भिरुड, शुल्क नियामक प्राधिकरणचे अध्यक्ष विजय अचलिया, तक्रार निवारण प्रमुख प्रधान, जागडे, विजय नारखेडे, आवळे, राणे या सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले आहे. त्यासाठी संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व इतर सोयी पुरविलेल्या आहेत.
मंत्रालयीन व राजकीय हस्तक्षेप .!
● संस्थाचालक बोथरा यांनी एकाहून एक असे कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केलेले आहेत. 'स्प्राऊट्स'ने इन्व्हेस्टीगेशन केलेला भ्रष्टाचार हा हिमनगाचे एक टोक आहे.
● असंख्य भ्रष्टाचाराची प्रकरणे 'मॅनेज' केली जातात. संस्थाचालकांवर कारवाई होऊ नये यासाठी प्रसंगी महिलांचाही गैरवापर होतो. प्रसंगी राजकीय व मंत्रालयातील अधिकारीही मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करतात.
संस्थाचालक बोथरा, गुप्ता व अरुण बोंगीरवार यांचा मुलगा पियुष बोंगीरवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. अरुण बोंगीरवार हे जवळपास महाराष्ट्रातील ५ मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव होते. त्याचा पुरेपूर फायदा त्यांचा मुलगा पियुष याने घेतला. पियुष व गुप्ता, बोथरा यांचे आर्थिक संबंध आहेत, त्यामुळेच गुप्ता, बोथरा यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्यास त्वरित मंत्रालयातून सूत्रे हालतात, हस्तक्षेप होतो व पुढील कारवाई टळते.