तुमच्या काळ्या, गोऱ्या पत्रिकेची पुंगळी तुमच्याकडेच ठेवा, आमच्या निषेधाची ही 'लाल पत्रिका' उद्वेगाने मांडत आहोत.!
एडवोकेट शीतल श्यामराव चव्हाण यांचे मनोगत !!
मुंबई (जगदीश काशिकर) : भाजप हा आजघडीला जगातील सर्वात भ्रष्ट राजकीय पक्ष आहे. या पक्षाने सर्व विरोधी पक्षांवर मोठमोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, भ्रष्टाचार संपवण्याचे आणि काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले. मात्र सत्तेत येताच भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात घालून काळा पैसा चलनात, लोकोपयोगात आणायचे तर सोडूनच द्या पण सर्व भ्रष्ट लोकांना स्वत:च्या पक्षात सामील करुन घेवून या पक्षाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना 'क्लीन चीट' देण्याचे सत्रच सुरु केले. नोटाबंदीच्या माध्यमातून गोरबरीबांना त्रास दिला व धनिकांचा काळा पैसा पांढरा करण्याच्या निमित्ताने शेकडो कोटींचा अपहार केला, सार्वजनिक मालकीच्या संस्थांची मनमानी पद्धतीने, किरकोळ किमतीत व आपल्या निकटच्या लोकांनाच विक्री करुन अब्जावधींचा मलिदा जमवला. उद्योगपती व भांडवलदारधार्जिने धोरण आणून हजारो कोटींचा 'कॉर्पोरेट फंड' पार्टीकडे वळवला. म्हणजे भ्रष्टाचार संपवणे, काळा पैसा परत आणणे तर सोडाच पण आधीच्या सर्व भ्रष्टाचारांचे नियमितीकरण करुन, त्यांना 'क्लिन चीट' देवून नवनव्या भ्रष्टाचारांची व भ्रष्टाचाराच्या पद्धतींची निर्मिती या पक्षाने सत्तेत येवून केली. आधीचा भ्रष्टाचार एकेरी होता त्याला अधिक व्यापक करीत भाजपाने अनेक मार्गाने प्रशस्त केले, सदृढ केले, तीव्र केले आणि आधीच्यापेक्षाही कठोरपणाने व राजरोसपणे राबवले. या भ्रष्टाचाराविरुद्ध कुणी काही बोलले तर तो देशद्रोही आहे, धर्मद्रोही आहे असा वैचारिक भ्रष्टाचार सर्वत्र बिंबवला. पक्ष फोडणे, दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले शेकडो लोकप्रतिनिधी स्वत:च्या पक्षात घेणे, स्वायत्त संस्थांच्या गळ्यात सत्तेचे पट्टे घालून त्यांना आपल्या इशाऱ्यावर हाकणे, सैनिकांच्या बलिदानाचे श्रेयही निवडणूकांच्या रिंगणात चलनासारखे वापरणे, जाती-जातीत, धर्मा-धर्मात, नात्या-गोत्यात, माणसा-माणसात भांडणे लावणे, देवा-धर्माची कैफ चढवून गर्दीला उन्मत्त बनवणे असे अनेक नैतिक भ्रष्टाचारही भाजपने केले आहेत. जर्मनीच्या नाझी आणि इटलीच्या फॅसिस्ट पक्षाने लोकांना सरळसरळ संपवले पण भाजपा देश, देशातील जनता, देशाच्या संविधानाची मूल्ये क्षणाक्षणाला, रोजरोज तडपवून संपवत आहे. पुढच्या कित्येक पिढ्या यातून सावरणार तर नाहीतच पण दिशाहीन होवून भरकटत, आपापसात भांडत राहतील याची तजवीज भाजपाने या दहा वर्षात केलेली आहे. म्हणून आधुनिक जगाच्या इतिहासात सर्वात क्रूर, अमानवी, हिंसक तसेच वैचारिक, नैतिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्व पातळ्यांवरील भ्रष्ट पक्ष म्हणून नोंद होण्यास भाजप पात्र झाला आहे. हीच भाजपची मागच्या दहा वर्षांतील खरीखुरी उपलब्धी आहे. तुमच्या काळ्या, गोळ्या पत्रिकांची पुंगळी तुमच्याजवळच ठेवा पण जनतेला बेचिराख केल्याबद्दलची ही 'लाल पत्रिका' आज उद्वेगाने मांडण्याची वेळ आली आहे.