वणी (वि.प्र.) : अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजण मोबाईल परत करतात. आज प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन आहे, मात्र एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक माणसे स्वतःहून मोबाईल परत करत असतात.
तसाच काहीसा प्रकार शहरातील कनकवाडी परिसरात पहायला मिळालं. काल रात्री किसन कडू वणी येथील रहिवासी हे नेहमीप्रमाणे नगर परिषद शाळा क्र. ७ समोरील परिसरात फिरत असतांना त्यांना रोडवर Vivo कंपनीचा मोबाईल सापडला. त्यांनी बराच वेळ तेथील परिसरात कोणी मोबाईल संबंधित चौकशी करेल याची वाट बघितली, पण कोणीही आले नाही.
एखाद्या व्यक्तीला स्क्रीनटच मोबाईल सापडला तर तो खूप खुश होतो. परंतु त्यांनी मोबाईल सापडल्यानंतर, हा मोबाईल कोणाचा हरवला असेल, तो माणूस किती नाराज असेल असा विचार करत आज सकाळी किसन कडू यांनी सापडलेला मोबाईलची चौकशी केली असता मोबाईल हा कनकवाडी परिसरातील नरेंद्र पोटे यांचा असल्याचे समजले. यावेळी किसन कडू यांनी आज दि. २५ मे ला संबंधित मोबाईलच्या मूळ मालकाला त्यांचा हरवलेला मोबाईल परत दिला. यावेळी नरेंद्र पोटे यांनी मोबाईल परत केल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
किसन कडू यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले, असा प्रामाणिकपणा आजकाल क्वचितच पाहावयास मिळत आहे.