चंद्रपूर (वि.प्र.) :अत्यंत निष्ठेने वर्षानुवर्ष इमाने इतबारे पक्षाचे काम करणारे कॉग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकारी आयारामांमुळे प्रचंड अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आयारामांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विधानसभा उमेदवारीत निष्ठावंतांची नावे मागे पडत आहेत. पक्षाच्या कठीण काळात आम्ही सोबत होतो, मात्र आता आयारामांना स्थानिक, राज्य तथा केंद्रीय नेत्यांकडून बळ मिळत असल्याने आम्ही आयुष्यभर सतरंज्यांच उचलायच्या का हा प्रश्न निष्ठावंत करित आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला व कॉग्रेस पक्षाला निर्विवाद यश मिळाले. या यशामुळे कॉग्रेस पक्षात सध्या आयारामांची संख्या वाढली आहे. लोकसभा निवडणुकीपासून स्थानिक पातळीवर अनेक जण कॉग्रेस पक्षासोबत जुळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुका बघून ही मंडळी पक्षाशी जुळत आहेत. मात्र यामुळे निष्ठावंत पक्षापासून दुरावला जात आहे. चंद्रपूर विधानसभा या अनुसूचित जातीसाठी आरक्षीत मतदार संघाचाच विचार केला तर पक्षासोबत वर्षानुवर्ष निष्ठावंत राहिलेले अनेक जण उमेदवारी मिळावी म्हणून धडपड करित आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी पक्ष प्रवेश करणारे बल्लारपूरचे राजु झोडे यांना स्थानिक नेत्यांना आशिर्वाद दिला आहे. त्यामुळेच झोडे यांनी थेट चंद्रपूर शहरात कार्यालय सुरू करण्याची हिम्मत दाखविली आहे. डॉ. दिलीप कांबळे यांचा कॉग्रेस पक्षाशी तसा संबंध नाही, मात्र त्यांनीही उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. भाजपाचे एक माजी नगसेवक देखील कॉग्रेसने उमेदवारी दिली तर विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. वादग्रस्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे यांचा कॉग्रेस व चंद्रपूर जिल्ह्याशी तसा संबंध नाही. मात्र त्यांनीही लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद मिळवित कॉग्रेस पक्षात प्रवेश करून थेट नेते बनले आणि आता विधानसभेची तिकीट मागत आहेत. संजय रत्नपारखी, इंजिनिअर गौतम नागदेवते हे देखील या स्पर्धेत आहेत. या सर्वांचा कॉग्रेस पक्षाशी काय संबंध असा प्रश्न निष्ठावंतांच्या वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच कॉग्रेस प्रवेश करणाऱ्या डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) यांनी बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली आहे. एम.बी.बी.एस. व उच्च शिक्षित डॉ.गावतुरे (बेहरे)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपले मामा आहेत असे सांगून प्रचारात गुंतल्या आहेत. राजकारणात प्रतिस्पर्धी उच्व शिक्षित व आपल्या तोडीचा नको हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे महिला खासदार डॉ. गावतुरे यांना उमेदवारी मिळू देतील का ही चर्चा देखील काँग्रेसच्या वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या शोभा पोटदुखे यांचे जावई डॉ.संजय घाटे बहुजन चळवळीतून आता थेट कॉग्रेस पक्षाकडे उमेदवारीची अपेक्षा करित आहेत. पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक बंडू धोतरे यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान कॉगेस पक्षात प्रवेश केला आणि बल्लारपूरातून उमेदवार मागितली आहे. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी देवूनही पक्ष कार्यात पाच वर्ष सक्रीय नसलेले डॉ. विश्वास झाडे निवडणूक बघता सक्रीय झाले आहेत. राजकारणात नवख्ये युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे बल्लारपुरातून इच्छुकआहे. आजवर शिवसेनेत सक्रीय राहिलेले खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दिर व भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वरोरा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे. धानोरकर यांनी जाहीर पक्षप्रवेश केलेला नाही. मात्र, त्यांना काँग्रेसची उमेदवारी कशाच्या बळावर हवी हे कळायला मार्ग नाही. त्यांच्या दाव्यामुळेही निष्ठावंतांचे वर्तुळ अस्वस्थ आहे. चंद्रपूर शहरात शिकवणी वर्ग चालविणारे प्रा. विजय बदखल व नेत्ररोग तज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रविण काकडे यांनी सुध्दा उमेदवारी मागितली आहे. विशेष म्हणजे, काकडे हे खासदार धानोरकर यांचे खाजगी स्वीय सहायक म्हणूनक काम करतात. यापूर्वी त्यांचा काँग्रेस पक्षांशी कोणताही संबंध नव्हता. मात्र, त्यांनी सुध्दा उमेदवारी मागितल्याने निष्टावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित झालेले डॉ. विजय देवतळे यांनीसुध्दा वरोरा विधानसभेतून उमेदवारी मागितली आहे. त्यांचा अर्ज जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी निलंबित केल्यामुळे स्विकारला नव्हता. त्यामुळे त्यांनी थेट पक्षाचे मुंबई कार्यालय गाठून उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नसलेल्या तथाकथीत नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवू लागले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांला संधी देण्याऐवजी आयारामांना संधी व आश्वासने दिली जात असल्याने निष्टावंत कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहे. त्यामुळे नाराज झालेले निष्टावंत कार्यकर्ते निवडणूकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्यास नवल वाटणार नाही.