खासदार धानोरकर यांच्याकडून भाऊ प्रवीण काकडे यांचे नाव समोर येताच दिर अनिल धानोरकर म्हणतात विधानसभा लढणारच .!
चंद्रपूर (वि.प्र.) : भद्रावती नगर परिषदेचे सलग पंधरा वर्षे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष राहिलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर यांनी जानेवारी महिन्यात काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसने उमेदवारी दिली अथवा नाही दिली तरी शंभर टक्के निवडणूक लढणारच, अशी घोषणा धानोरकर यांनी केली. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस पक्षात उमेदवारी वरुन संघर्ष अटळ असल्याचे चित्र दिसत आहे.
एकीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे व बाजार समितीचे संचालक राजू चिकटे यांचे नाव चर्चेत असतानाच अनिल धानोरकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष रंगण्याची चिन्हे आहे.
यासंदर्भात अनिल धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, या मतदारसंघातून उमेदवारी मागणारे अनेक जण आहेत. सर्वांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. मात्र, धानोरकर कुटुंबाचा या मतदारसंघावर दावा आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तरी लढणार, नाही दिली तरी शंभर टक्के लढणारच. काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर इतर अनेक पक्ष आपल्याला निवडणुकीत मदत करायला तयार आहेत. मात्र, इतरांची मदत घेण्यापेक्षा काँग्रेस पक्षाला प्राधान्य आहे आणि काँग्रेस माझ्यावर अन्याय करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे बाजार समितीचे संचालक राजू चिकटे यांचे नाव देखील समोर करण्यात आले आहे. या दोन नावाशिवाय काँग्रेस पक्षात अनेक वर्षापासून सक्रिय असलेले चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व चंद्रपूर जिल्हा परिषद चे माजी सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूरच्या माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, महिला काँग्रेस अध्यक्षा नम्रता ठेमस्कर , डॉ. खापने, डॉ. आसावरी देवतळे, डॉ. विजय देवतळे, कुणबी समाजाच्या संवाद संघटनेचे सचिव विजय बदखल, डॉ. चेतन खुटेमाटे, कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्यासह एकूण सतरा ते अठरा उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र धानोरकर कुटुंबाचा हक्क या मतदार संघावर आहे असाही दावा अनिल धानोरकर यांनी केला आहे. भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे. पाणी प्रस्न निकाली काढला आहे. मी काम करून दाखविले आहे त्यामुळेच उमेदवारी मागत आहे असेही धानोरकर म्हणाले. दरम्यान धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर आता काय भूमिका घेतात व त्यांचे मत कुणाच्या पारड्यात जाते विधानसभा निवडणुका जाहीर होताच कळणार आहे. सध्यातरी भद्रावती व वरोराच्या काँग्रेसच्या उमेदवारी वरून संघर्ष होणार हे स्पष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल धानोरकर हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या देखील संपर्कात आहेत. काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली तर भाजपची दारे त्यांच्यासाठी उघडी आहेत. अशा वेळी ते वेगळा निर्णय घेऊ शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान काही दिवसापूर्वीच कुणबी समाज संघटनेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा - भद्रावती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचा शब्द कुणालाही दिलेले नाही हे वक्तव्य केले होते. तेव्हापासूनच अनिल धानोरकर अतिशय आक्रमकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
विधानसभेचे प्रबळ दावेदार न व्हावे म्हणून पक्षातून हेतू पुरस्पर ६ वर्षाकरिता निलंबन : डॉ.विजय देवतळे यांची पत्रपरिषदेत माहिती
विधान परिषदेत पक्ष विरोधी भूमिका घेणारा चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार कोण ?
भद्रावती : पक्षविरोधी कोणतेही काम केले नसताना पक्षासाठी इमाने इतबारे काम करीत असताना सुद्धा केवळ आगामी विधानसभेसाठी या भागातील काँग्रेस उमेदवारीचे प्रबळ दावेदार न व्हावे म्हणून या क्षेत्रातील पक्षाच्या एका प्रबळ नेत्याच्या सांगण्यावरून आम्हा दाम्पत्याला पक्षश्रेष्ठींने यावर आमचे म्हणणे न ऐकता ६ वर्षासाठी निलंबित केले. हा आम्हाला राजकारणातून संपविण्याचा डाव असल्याचे डॉ.विजय देवतळे यांनी पत्र परिषदेत सांगितले.
एखाद्या प्रकरणावर न्याय देताना न्यायालय दोन्ही बाजू ऐकून न्याय देते. परंतु या ठिकाणी त्या नेत्याचेच म्हणणे ऐकून आम्हा उभयंता पती,पत्नीला काँग्रेस पक्षातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आदेशाने नाना गावंडे यांनी ६ जुलै २०२४ ला पत्र देऊन ६ वर्षाकरिता निलंबित केले. हे निलंबन घटनाबाह्य आहे. पक्षश्रेष्ठींनी आमचे म्हणणे ऐकून नंतर त्यावर निर्णय द्यावयास पाहिजे होता. स्वातंत्र्य पूर्वीपासून देवतळे घराणे काँग्रेस सोबत आहे. स्वर्गीय दादासाहेब देवतळे हे सन १९६२ मध्ये या भागातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी मंत्रिपद देखील भूषविले. त्यांचे पश्चात स्वर्गीय संजय देवतळे यांनी या भागाचे नेतृत्व केले. ते सुद्धा मंत्री राहिले. सन २०१४ मध्ये संजय देवतळे यांना पक्षाने लोकसभेकरिता तिकीट दिली.त्यात ते पराभूत झाले. नंतरच्या विधानसभेकरिता पक्षाने त्यांना विधानसभेची तिकीट न देता माझी पत्नी डॉ. आसावरी देवतळे यांना तिकीट दिली. त्यावेळी संजय देवतळे भाजपाकडून लढले. मत विभाजनामुळे शिवसेनेचे बाळू धानोरकर निवडून आले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने शिवसेनेच्या बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी आम्ही उभयंत्यांनी पक्षाचे उमेदवार बाळू धानोरकर यांचा प्रचार करून निवडून आणले. नंतरच्या विधानसभेकरिता त्यांनी आपली पत्नी प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळवून दिली. प्रतिभा धानोरकर यांचे काँग्रेस पक्षात कोणतेही योगदान नव्हते. या माध्यमातून आमच्यावर पक्षाने त्यावेळी अन्याय करून सुद्धा आम्ही पक्षाशी ईमान राखून काम करीत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आम्ही प्रबळ दावेदार उमेदवार म्हणून होतो.मात्र आम्हास पक्षश्रेष्ठींने काही कारण नसताना ६ वर्षाकरिता पक्षातून निलंबित केले. पक्षश्रेष्ठीने आमचे हे निलंबन मागे घ्यावे असे डॉ.विजय देवतळे यांनी यावेळी सांगितले. विधानसभेच्या गोपनीय मतदान प्रक्रियेत या नेत्याने पक्षविरोधी मतदान करून सुद्धा पक्षश्रेष्ठींने त्यांचेवर कोणतीच कारवाई केली नाही. परंतु त्याच लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून आम्हास पक्षातून निलंबित केले हा कसा न्याय असे डॉ.देवतळे यांनी शेवटी सांगितले.