शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे उर्वरित ५८.९४ कोटी रुपये .!


ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे उर्वरित ५८.९४ कोटी रुपये .!
मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी; ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांना दिलासा .!
ना. मुनगंटीवार यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेऊन मांडला होता मुद्दा. .!

चंद्रपूर (वि.प्र.) : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची उर्वरित रक्कम मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत पिकविम्याची उर्वरित रक्कम तातडीने देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांना उर्वरित ५८.९४ कोटी रुपये मिळणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत होते. राज्यशासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषीमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला होता. त्यानंतर १४३.८१ कोटी रुपये पिक विमा रकमेचे वाटप झाले. पण ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांचे ५८.९४ कोटी रुपये प्रलंबित होते. 
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्याचे कृषी मंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळाली तरच शेतीचे पुढचे नियोजन करणे शक्य होईल. शिवाय सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना आधार होईल, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती.  
ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीला विमा हफ्त्याचा राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हयातील उर्वरीत शेतकऱ्यांची पिक विमा नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचे विमा कंपनीमार्फत कळविण्यात आले आहे. ही बाब देखील पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम लवकरच मिळण्याचा मार्ग त्यामुळे मार्ग सुकर झाला होता. पण उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नव्हती. 
सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात आवर्जून चर्चा झाली. ना. श्री. मुनगंटीवार यांनी हा विषय पुन्हा एकदा लावून धरला. अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. 

ना. मुनगंटीवार यांचे मानले आभार :

पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर पिक विम्याच्या रकमेसाठी आणि आता उर्वरित रकमेसाठी देखील ना. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असलेल्या ना. मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

चंद्रपूर येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता .. मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय; ना.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश .. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणार भाजीपाला संशोधन केंद्र

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एकार्जुना येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत भाजीपाला संशोधन केंद्र स्थापन करण्यास आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
याअंतर्गत भाजीपाला पिकात अनुवंश शास्त्राचा अभ्यास करून सुधारित संकरीत वाण विकसित करणे व गुणवत्तापूर्वक उत्पादनास चालना देणे, भाजीपाला पिकांच्या देशी वणांचे संवर्धन करणे, दुर्मिळ अशा रान भाज्यांची संवर्धन व लागवड करणे, भाजीपाला पिकांचे दर्जेदार उत्पादनासाठी शेडनेट हाऊस, आधुनिक रोपवाटिका तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्स एरोपोनिक्स तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन इत्यादी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे, भाजीपाला पिकांचे बिजोत्पादन तंत्रज्ञान विकसित करणे, संरक्षित भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान विकसित करुन उत्पादन वाढविणे, भाजीपाला पिकांवर येणाऱ्या किडी व रोगांचा अभ्यास करून त्यावर नियंत्रणाचे प्रभावी उपाय शोधणे, भाजीपाला पिकांची प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि साठवणूक, प्रक्रिया उदयोगास चालना देणे, भाजीपाला पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे ही या उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्राची उद्दिष्ट्ये असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मागील दोन दशकांमध्ये भाजीपाला उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. तथापि, वातावरणात होणारे बदल व त्यामुळे उद्भवणारे खोड किडीच्या समस्या, कमी टिकवण क्षमता, बदलत्या वातावरणात अनुकूल तंत्रज्ञानाचा अभाव आदी बाबींचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने मिरची, हळद, वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी, मुळा इत्यादी भाजीपाल्याचे पिके घेतली जातात. भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी उपयुक्त जमीन, मुबलक पाणी व मजुंराची उपलब्धता इत्यादी असल्याने या जिल्ह्यात भाजीपाला लागवडीस मोठा वाव आहे. सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्याच्या एकार्जुना येथे कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. मात्र, दिवसेंदिवस भाजीपाला पिकांची वाढती मागणी, चांगला बाजारभाव व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी असलेल्या संधी आदी बाबी पाहता भाजीपाला पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी उच्च तंत्रज्ञान युक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारणे आवश्यक होते असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणे, गुणवत्तापूर्ण बिजोत्पादन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करण्यासाठी या संशोधन केंद्र स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. या संशोधन केंद्रासाठी 10 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचेही पालकमंत्री ना.श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.