७ ऑक्टोंबर पासून राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण .!

रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी वरोरा -भद्रावती - चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचा यल्गार .!

वरोरा (वि.प्र.) : कोरोना संक्रमणाच्या लॉक डाऊन काळात बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, वरोरा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा तसेच मुंबई, पुण्यासाठी दररोज २२/२४ डब्ब्यांची सुपर एक्सप्रेस चालविण्यात यावी, अशा येथील नागरिकांच्या प्रलंबित मागण्या असून रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मागणीकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. वरोरा - भद्रावती- चंद्रपूर स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा साखळी उपोषण व वेळ पडल्यास आमरण उपोषण करू, असा इशारा वरोरा - भद्रावती - चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी दिला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी वरोरा - भद्रावती - चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने सविस्तरपणे स्वयंस्पष्ट निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच जिल्ह्यातील जनप्रतिनिधी,शासनाचे व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी इ.ना देण्यात आले होते. या मागण्यांचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वेमंत्री मंत्री यांना पाठवून त्याच्या पूर्ततेसाठी विचारणाही करण्यात आली. परंतु अपवाद वगळता लोकप्रतिनिधी यांनी याबाबत पाठपुरावा केला नसल्याचे दिसून येते. परिणामतः बराच कालावधी लोटूनही प्रवाशांच्या रास्त मागण्यांच्या संदर्भात साधे उत्तरही वरिष्ठ स्तरावरून अजूनपर्यंत प्रवाशी संघाला देण्यात आले नाही, हा नाकर्तेपणाचा कळस आहे. रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच जनता रेल्वे गाड्यांच्या थाब्यांपासून वंचित आहे. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचे राजेंद्र मर्दाने यांनी सांगितले. याबाबत शिष्टमंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डी. जेनित चंद्रा (भा प्र.से) यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या,अन्यथा रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी येत्या ७ ऑक्टोंबर पासून साखळी उपोषण करण्याचा इशारा मर्दाने यांनी दिला आहे. शिष्टमंडळात वरोरा-भद्रावती- चंद्रपूर रेल्वे संघाचे उपाध्यक्ष प्रवीण गंधारे, छोटुभाई शेख, पदाधिकारीगण विजय वैद्य, खेमचंद नेरकर, विवेक बर्वे, जगदीश तोटावार, विलास दारापूरकर, सागर कोहळे, भास्कर गोल्हर, संजू राम आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.