मी घरात झोपले असताना अचानक थोड्या गोंधळाने माझी झोप मोडली. नेमका कशाचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी बाहेर आले तर आवाज गच्चीवरून येत होता. एक एक पायरी चढताना त्या गोंधळाच्या आवाजाने पावलांच्या आवाजाची जागा घेतली आणि त्यासोबत गाण्याची एक लहर माझ्या कानी पडली. संध्याकाळी गच्चीवर गाणे कोणी लावले याची उत्सुकता वाढत होती आणि शेवटी एकदम समोर दृश्य आले तर मला थोडे आश्चर्य वाटले. समोर दोन मुले आमच्या अपार्टमेंटमधील काही बायकांना नवीन गाण्यावर गरबा शिकवित होते . सर्वजणी त्या गरब्याच्या स्टेप्स शिकण्यात खूप मग्न होत्या .दिवसभरातील नवरात्रीच्या स्वच्छतेची कामे करून, घरातील सर्व जबाबदारी पार पडून त्या शिकत होत्या, त्यामागे होती ती त्यांची जिद्द. नवरात्री म्हटलं की संपूर्ण देशाचे वातावरण कसे ताजेतवाने ,भक्तमय होऊन जाते. अगदी लहान वयापासून ते वृद्धांपर्यंत या सर्वांमध्ये उत्साह संचाला जातो. नवरात्र सुरू होण्याच्या आधीपासून म्हणजे अनंत चतुर्दशी पासून वेध सर्वांना लागतात .देवी कशी आणायची? डेकोरेशन कसे करायचे ?रोषणाई कशी करायची ?कार्यक्रम काय आणि किती वेळ ठेवायचा? वर्गणी मागायला कोण आपापल्या भागात फिरायचे? अशी सर्व सार्वजनिक मंडळाची पूर्वतयारी सुरू होते. अगदी त्यात सर्व वयोगटातील स्त्रिया पुरुष लहान मुले या सर्वांचा सहभाग हा उत्स्फूर्तपणे असतो .सार्वजनिक नवरात्री सोबत प्रत्येक घरात सुद्धा तेवढ्याच जोमाने नवरात्रीची तयारी सुरुवात असते. सर्व घर स्वच्छ करणे ,रंगरंगोटी ,सगळे भांडे कपडे धुणे ,देवाचे सगळे सामान व्यवस्थित करणे, अगदी किराणा पण संपूर्ण नवा भरणे ह्या सर्व गोष्टी फक्त नवरात्रीतच होतात.
वाचक ,या सर्व धावपळीत म्हणजे गरबा दांडिया यांच्यासोबत आरत्या सुद्धा तेवढ्याच जोमाने म्हटल्या जातात अगदी तबला पेटी ढोलकीच्या सहाय्याने .संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण असते या नऊ दिवसात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पारंपरिक रीतीने नवरात्र साजरे केले जातात. कलकत्त्यामध्ये दुर्गामाता पुजा ही विशेषता: पाहण्यासारखी असते .गुजरात मध्ये गरबा आणि दांडियाला तेवढेच जास्त महत्त्व दिले जाते .उत्तर भारतात" जय माता दी" म्हणत देवीच्या आराधनासाठी अनेक उपक्रम योजले जातात तर महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी नवरात्र साजरी केली जाते.अशाच प्रकारचे वेगळी पद्धत माझे पाहण्यात आली ती म्हणजे साखळी आरती. मराठवाड्यामधील वसमत आणि शिरडशहापुर या गावांमध्ये ही पारंपरिक साखळी आरती नवरात्रात म्हटली जाते. आरत्या आपल्यासारख्याच पण म्हणण्याची पद्धत वेगळी .आता ती कशी खर तर वाचक त्या आरत्या ऐकल्या वरच त्यामधील जोश, भक्ती आणि एकात्मता दिसून येते ,तरीही मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते. नवरात्रीचे नऊ दिवस दोन्ही गावातील ब्राह्मण गल्लीमध्येच म्हणल्या जाणाऱ्या या साखळ्या आरत्या, खरच खूपच श्रवणीय आहेत .सारख्या चालीच्या आरत्या एकत्रित करून प्रत्येकाने एक एक कडवे घेऊन अशा एकाच चार-पाच आरत्या म्हणायची कला या दोन गावातील ब्राह्मण समाजामध्ये दिसून येते. गल्लीतील सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांचा या सगळ्या आरत्यांमध्ये समावेश असतो. पारंपरिक पद्धत ,पारंपरिक मान हे साखळी आरत्याबाबतीत आहे .अगदी पुरातन काळापासून नवरात्रीचे नऊ रात्र आरत्यांसाठी ठरविल्या गेले आहेत म्हणजे अगदी दुसऱ्या माळी पासून ते नवमीपर्यंत.दरवर्षीचे मान अगदी पहिल्यापासून चालत आलेली आहेत,त्यामध्ये कधीच मागे - पुढे, भांडण, द्वेष या गोष्टी आल्या नाहीत,उलट ठरलेले दिवस व ठरलेले घर यात अगदी उत्साह संचाला जातो. ढोलकी पेटी आणि टाळ्यांच्या गजरात सुरेल ताल-लयबद्ध आरत्या खरंच ऐकण्यासारख्याच असतात .त्यात त्यांचे विशेष महत्त्व म्हणजे 33 कोटी देवी देवतांच्या आरत्या त्या नवरात्रीमध्ये रोज म्हटल्या जातात .त्यानंतर जोगवा, गोंधळ, देवीचे पद यांचा सुद्धा ठसकेदार पहाडी आवाजात समावेश होतो .त्या आरत्यांचे एक मुख्य आकर्षण म्हणजे सर्व आरत्या या पहिल्या अंतरापासून च सुरुवात होतात आणि नंतर मुखडा गायला जातो. पहिल्या अंतरापासून सुरुवात करतात त्यामध्ये आरत्या काळजीपूर्वकच ऐका तरच त्या लक्षात येतात .त्या आरत्यांचा मुख्य उद्देश जरी भक्ती भाव असला तरी ,ब्राह्मण समाजाचा असला तरी इथे सर्वधर्मसमभाव ,एकमेकांसाठीचा जिव्हाळा या दोन मौल्यवान गोष्टी राबविल्या जातात. या आरत्यांचा रोजचा शेवट म्हणजे फक्त पेढे प्रसाद हाच असतो. "अतिथी देवो भव" या उक्तीप्रमाणे आता या दिवसात कोणी फराळ तर कोणी दूध देतात .आधुनिक या जगात गरबा आणि दांडियाचे सर्वत्र जाळे पसरत असताना सुद्धा या दोन गावात मात्र आरतीलाच अजूनही प्राधान्य आहे. वाचक मला अभिमान वाटतो स्वतःचा कारण शिरड शहापूर हे माझे आजोळ आणि वसमत हे माझे सासर आहे म्हणून अगदी लहानपणापासून ही भक्ती आणि साखळी आरती ह्यांना मी जवळून ऐकलं आहे . जर तुम्हाला वेळ भेटला नवरात्र मध्ये तर एकदा तरी या गावांना भेट देऊन त्या आरत्या कशा आहेत याचा अनुभव घ्यावा.
सौ. स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर (अंबुलगेकर)©️नांदेड