बल्लारपुर (का.प्र.) : फिल्म फेस्टिव्हल कंपनीतर्फे आयोजित चौथ्या मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात उत्कर्ष देव लिखित व दिग्दर्शित द लास्ट अॅक्ट या लघुपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारच्या मानकरी चंद्रपूरच्या प्राचार्य डॉ. जयश्री कापसे गावंडे ठरल्या आहेत. एनएफडीसी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संलग्नित आशय फिल्म क्लब आणि अभिजित फिल्म सोसायटी यांचे सहकार्य लाभलेल्या या महोत्सवाचा समारोप राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे नुकताच डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर मग मेघराज राजे भोसले, महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक जय भोसले, व्यवस्थापकीय संचालक रश्मिता शहापूरकर, महोत्सव संयोजक व फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव, महोत्सवाचे प्रमुख सचिन शेंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात एकूण ८०० चित्रपट सहभागी झाले. त्यात नामांकन मिळालेले ८१ चित्रपट बघण्याची संधी रसिकांना मिळाली. द लास्ट अॅक्ट हा लघुपट चंद्रपूर येथून निर्मित झालेला असून त्याच्या निर्मात्या कोमल देशमुख, लेखक व दिग्दर्शक उत्कर्ष देव, डीओपी निखिल कांबळे, सहकारी कलावंत जगदीश नंदूरकर, वेशभूषाकार ड्रेस ऑन रेंटचे श्रेयस कापसे आदींच्या परीश्रमातून साकारलेला आहे.
चंद्रपुरातील एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे प्राचार्य (प्र.) पदी कार्यरत रंगकर्मी डॉ. जयश्री कापसे गावंडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.