मराठी भाषा अभिजातच... !

अनेक वर्षाच्या संघर्षाला पूर्णविराम .. अभिनंदनाचा ठराव घेऊन महासंघाने मानले शासनाचे आभार..!

चंद्रपूर ( वि.प्र.) : माय मराठीला अडीच हजार वर्षांपेक्षा जुनी परंपरा असून मराठीला आद्यग्रंथकार मुकुंदराज, चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकडोजी महाराजांपर्यंत व अनेक साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची अनमोल देणगी मराठी साहित्य विश्वाला देवून समृध्द केले आहे. जगातील असंख्य विद्यापीठात मराठीला श्रेष्ठ दर्जा प्राप्त झालेला असून मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी मराठी भाषकांचे योगदान मोलाचे आहे. 
"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, ही मराठी माणसांना अमॄताहून गोड बातमी आहे. मराठीच्या जवळपास साठ बोली असून त्या आपापल्या परिसरात समॄध्द तेने बोलल्या जातात. २२००वर्षांपुर्वीपासून या बोली अस्तित्वात आहेत. शिलालेख, ताम्रपट, ग्रंथरूपात त्यांचे पुरावे उपलब्ध आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविण्याचा मार्ग मोकळा होईल. तरूणांना रोजगाराच्या संधी मिळतील., आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा प्रभाव वाढेल, हे लाभ आहेतच.विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, अर्थ शास्त्र, ई. विषयातील संशोधनाला मराठी भाषेतून महत्त्व प्राप्त होईल. यासाठी परिश्रम घेणे आवश्यक ठरणार आहे. बाजार पेठेत मराठीच्या जाणीवपूर्वक सतत वापरातून ती दिमाखात आपले अस्तित्व जगाला दाखवणार आहे. तेव्हा गरज आहे, ती भाषा संवर्धन, विकास, आणि ग्रंथ लेखणाची. आणि त्याद्वारे ज्ञाननिर्मिती करण्याची. चला तर, मराठी जनहो, या मंगल कार्यासाठी स्वत:सिद्ध होऊ या."
डॉ श्याम मोहरकर चंद्रपूर, जेष्ठ साहित्यिक, समिक्षक, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य वि.सा.संघ नागपूर ,पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे अध्यक्ष,मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाविषयी राज्य सरकार, केंद्र सरकार, साहित्यिक आणि मराठी भाषकांच्या योगदानाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने नुकतेच आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे प्रास्ताविक प्रा. दिलीप जाधव खजिनदार सांगली यांनी केले. तर सभेच्या बैठकीची भूमिका आणि ठराव महासंघाचे सचिव बाळासाहेब माने मुंबई यांनी मांडला. त्या ठरावाला डॉ ज्ञानेश हटवार , सुरेश नखाते व सर्वांनी अनुमोदन दिले, व सर्वानुमते ठराव संमत झाला. यावेळी कार्याध्यक्ष संपत गर्जे पुणे, उपाध्यक्ष डॉ प्रतिमा बिस्वास मुंबई, उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर, डॉ मनिषा रिठे, प्रा. विजय हेलवटे चंद्रपूर, बापू खाडे पुणे, दीपा ठाणेकर मुंबई, मंजिरी गजरे ठाणे, ओमप्रकाश ढोरे अमरावती, विजया मने गडचिरोली यांनी आपल्या मनोगतातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सर्वच मराठी साहित्य संस्था , मराठी विषय शिक्षक, प्राध्यापक , मराठी भाषकांबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून सुनील डिसले यांनी अभिजात मराठी साठी महासंघाने केलेला संघर्ष, चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन वरोरा येथे घेण्यात आलेल्या महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात घेतलेले ठराव, त्याचा केलेला पाठपुरावा आणि या संघर्षाचे मिळालेले फळ, राज्य व केंद्र सरकारचे योगदान, साहित्यिकांचा पाठपुरावा याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केला.
"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णक्षण आहे.सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या मराठी भाषेला तिच्या समृद्धीसाठी खऱ्या अर्थाने राजमार्ग मिळाला. मराठी विषय शिक्षक महासंघाने प्रामुख्याने इयत्ता बारावी पर्यंत मराठी भाषा सर्व विद्याशाखा अनिवार्य व्हावी, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रामुख्याने लढा दिला. स्वयंभू असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने ती जगमय होईल यात शंका नाही.."
प्रा. बाळासाहेब माने सचिव मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य :
या आभासी सभेला डॉ. शरद दुधाट अहमदनगर, मीनल पाटील नंदुरबार, व्यंकट दुडीले बीड, सुरेश नखाते नागपूर, नीता खोत नागपूर, गिरीश काळे वर्धा, योगेंद्र सनेर धुळे, चांगदेव खोले नाशिक, रेखा कटके रायगड, सुनील कारवखे हिंगोली, नामदेव मोरे चंद्रपूर, संतोष कोठावळे धाराशिव, संतोष कदम जळगाव, स्मिता भुसे अहमदनगर, भाग्यदेवी चौगुले रत्नागिरी, अंजना खताळ मुंबई, बाबासाहेब माळवे कोल्हापूर, यशवंत पवार यवतमाळ, अरविंद मोडक पुणे, निलेश पाकदुने अकोला, पवन कटरे गोंदिया , विनोद हटवार भंडारा यांच्यासह राज्य कार्यकारिणीतील समस्त सदस्य व राज्यातील ३५ जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या आभासी सभेचे सूत्रसंचालन सचिव बाळासाहेब माने मुंबई यांनी केले तर सभेचे आभार कोषाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे भंडारा यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.