...अन् ‘याला’ म्हणे आमदार व्हायचे आहे !

गुंडगिरी करणाऱ्या रावतांच्या कार्यकर्त्यांना महिलांनी धू.. धू.. धुतले .!

बल्लारपुर (का.प्र.) : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा असतात. नगरसेवकाला आमदार व्हावं वाटतं, आमदाराला मंत्री व्हावं वाटतं, तर मंत्र्याला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. महत्त्वाकांक्षा असणं गैर नाही. पण त्यासाठी वाम मार्ग अवलंबणे चुकीचे आहे. गुंडगीरी करणे चुकीचे आहे. अशाच गुंडगिरीचा नमुना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी दिला.
'विजय झाला तर माजायचे नाही, अन् पराभव झाला तर लाजायचे नाही', असे विचार ज्या नेत्याचे आहेत, त्या नेत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण आहे. सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात त्यांचे मानाचे स्थान आहे. या नेत्याबद्दल त्यांचे विरोधकही आदराने बोलतात. अशात सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे. आणि ही दिवाळखोरी संतोष रावत नावाच्या उमेदवाराने काल रात्री दाखवली. 
लोकप्रतिनीधी या नात्याने सुधीर मुनगंटीवार मुल तालुक्यातील कोसंबी या गावात लोकांच्या बोलावण्यावर गेले होते. तेथे नलेश्वर तलावाच्या संदर्भात ते ग्रामस्थांशी चर्चा करत होते. तेव्हाच सरपंचाने संतोष रावत यांना बोलावले. संतोष रावत तेथे पोहोचले आणि गावकऱ्यांसोबत हुज्जत घालायला लागले. मुनगंटीवार यांच्याशीही रावतांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पण सभ्य, उच्चविद्याविभूषीत, सुसंस्कृत मुनगंटीवार यांनी त्याही परिस्थितीत रावतांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण रावत भांडणावर उतरले. त्यांचा एक कार्यकर्ता राकेश रत्नावार याने मुनगंटीवार यांच्यावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. 
राकेश रत्नावार मुनगंटीवार यांच्या दिशेने जात असल्याचे बघून महिला भडकल्या. या सर्व सुधीर मुनगंटीवार यांच्या लाडक्या बहीणी. भावावर चाल करून जाणाऱ्याला त्या सोडणार थोडेच होत्या. त्यांनी राकेश रत्नावार, विजय चिमड्यालवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. म्हणजे इतका की, अक्षरशः 'धू.. धू.. धुतले… चांगलेच तुडवले.’ याचा प्रत्यय काल रात्री कोसंबीवासीयांना आला. पराभव समोर दिसू लागल्यावर रावतांनी काय केले, हे काल कोसंबीवासीयांनी बघितले. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अन् संतोष रावत यांचा सर्व स्तरातून निषेध होऊ लागला. 
संतोष रावतसारखा गुंड जर आमदार झाला, तर या मतदारसंघाचे काय होईल, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. असा गुंड आमदार आम्हाला नको, असे बल्लारपूर मतदारसंघातील लोक बोलत आहेत. 'अन् या गुंडाला म्हणे आमदार व्हायचे आहे', असेही लोक उपहासाने बोलत आहेत.


सुधीरभाऊंसाठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी .!

मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ ..‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव .. पराभव दिसताच राडेबाजीवर उतरलेल्यांना लाडक्या बहिणींनी शिकवला धडा .. काँग्रेस उमेदवार संतोष रावतांच्या कार्यकर्त्यांचा सुधीर मुनगंटीवारांवर हल्ल्याचा प्रयत्न .!

बल्लारपुर : बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू लागल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातल्या कोसंबी गावात सोमवारी रात्री काँग्रेसच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांबरोबर राडा करत थेट मा. मंत्री व महायुतीचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
लाडक्या बहिणी धावल्या सुधीरभाऊंच्या सुरक्षेसाठी .!
काँग्रेस—भाजपात राडा होण्याचे कारण अगदीच क्षुल्लक होते. सुधीरभाऊ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन तलावाच्या कामासंदर्भात मदत करण्याबाबत चर्चा करत होते. त्यावेळी गावातला सरपंच काँग्रेसचा असल्याने तलावाचे दुरुस्ती काम रखडल्याची तसेच सुधीरभाऊंपर्यंत हा विषय पोहोचू देत नसल्याची तक्रार भाजपाचे कार्यकर्ते सुधीरभाऊंकडे करत होते. प्रचारादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना कोसंबी येथे जाता आले नव्हते. परंतु, प्रचार संपल्यानंतर कोसंबीला भेट दिली असता कार्यकर्त्यांबरोबर बैठकीत हा विषय समोर आला. त्यावेळी अनेक महिलाही या ठिकाणी उपस्थित होत्या. मात्र, तेव्हाच मूलवरून काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत त्यांच्या समर्थकांसह तिथे पोहोचले आणि प्रचाराची वेळ संपल्यानंतरही, प्रचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आचार संहितेचा भंग करीत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यासही सुरुवात केली.
त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना शांतपणे समजावले की, आपण कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेत असून कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग करत नाही. तसेच, तुम्हाला हवे तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे, पोलिसांकडे तक्रार करू शकता. आणि, मी येथून गेल्यानंतर, तुम्हालाही येथे बैठक घेता येईल, माझी काही हरकत नसेल. परंतु, अशा प्रकारे मला जाब विचारण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर, संतोष रावत यांच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या अंगावर जात आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा, मुनगंटीवार यांच्या अंगरक्षक आणि सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवारांना धक्काबुक्की करणाऱ्यांच्या मध्ये अंगरक्षक आल्याने तिथे मोठा गोंधळ झाला. काही काँग्रेस कार्यकर्ते स्थानिक महिलांच्याही अंगावर धावून गेले. मात्र, सुधीरभाऊंच्या या बहिणींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बेदम चोप देत चांगलाच धडा शिकवला. तसेच, सुधीरभाऊंवर धावून गेलेल्यांनाही या महिलांनी त्यांची जागा दाखवून दिली.
काँग्रेसच्या उलट्या बोंबा :
काँग्रेस उमेदवार संतोष रावत व त्यांच्या समर्थकांनी कायदा हातात घेत स्वतःच निवडणूक आयोग असल्याप्रमाणे दादागिरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे, सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षक घटनास्थळी येऊन वस्तुस्थिती जाणून घेत नाही, तोपर्यंत आपण हलणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली. अखेर, पोलिस अधीक्षकांनी कोसंबीत येऊन मंत्री सुधीर मुनगंटीवारांची साक्ष नोंदवून घेतल्यानंतरच मुनगंटीवार चंद्रपूरला रवाना झाले.
या राड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने, भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवारांसह भाजपा कार्यकर्त्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करा, अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मूल पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. पहाटे चारच्या दरम्यान पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांनी मध्यस्थी करत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते पांगले.
तक्रारींचे मार्ग सोडून राडेबाजी कशासाठी?
निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला असेल तर, त्यांच्यावर कारवाईचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आयोगाने अशा तक्रारींसाठी एका अॅपची निर्मितीही केली आहे. मुनगंटीवार यांनी आचार संहिता भंग केली होती तर, काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी हाकेवरच्या अंतरावर असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी किंवा पोलिसांत तक्रार का नोंदविली नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे. आयोगाने अॅपची सोय केली असल्यांने, स्थानिक कोसंबीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही अशी तक्रार करता आली असती. मात्र, मूल ते कोसंबी ५ किमी अंतर जाऊन स्वत: कायदा हातात घेत स्टंटबाजी करण्यामागे संतोष रावतांचा हेतू काय आहे? आधी पोलिसांवर विश्वास नाही असे सांगत आचार संहिता भंगाची तक्रार न नोंदविणारे संतोष रावत राड्यानंतर, पोलिसांकडेच न्याय मागण्यासाठी कसे गेले? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
कोसंबीच्या सुधीर मुनगंटीवार यांचे बैठकीत महिला मोठ्या प्रमाणावर होत्या. यामुळेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ‘फार काही’ करता आले नाही. कारण या महिलाच आक्रमक झाल्यांचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. ‘कोसंबीच्या लाडक्या बहिणीच सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी सुरक्षेची ढाल झाल्याची’ चर्चा आता परिसरात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.