बल्लारपूर (का.प्र.) : महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दाणादाण उडवली. आता त्यांचे नेते ईव्हीएममध्ये गोंधळ केला असल्याचे कारण पुढे करत आहेत. जो तो कॅमेऱ्यासमोर येईन ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आगपाखड करत आहे. अशा विरोधकांच्या बाबतीत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार कडाडले. विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी विरोधकांवर केली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवार म्हणाले, विरोधकांचे जे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचीही वर्तणूक संशयास्पद आहे. ते काय आमच्यासोबत मॅच फिक्सींग करून निवडून आलेत का? 'ये अंदर की बात है और काँग्रेस के प्रदेशाध्यक्ष हमारे साथ है', असं काही आहे का, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे निवडून आले, लोकसभेमध्ये त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तेव्हा ईव्हीएमवर कुणीच का नाही बोललं नाही, अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केली.
कायदे करणारे काँग्रसचे 'ते' कोण नेते होते ? :
1951 आणि 1961 मध्ये दोन्ही कायदे कुणी बदलवले. ते काँग्रेसचे कोण नेते होते, ज्यांनी संसदेत लांबलचक भाषण दिलं होतं की, 'कागदी मतपत्रिका छापल्यानं गोंधळ निर्माण होतो, बिहार राज्यासारखं बुथ कॅप्चरींग होतं..' हे कोण बोललं होतं? 2010 मध्ये मनमोहन सिंह यांनी समिती नेमली होती. त्या समिताचा अहवाल कुणाच्या राज्यात आला? तो कुणी स्विकारला, असे म्हणत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर पुन्हा प्रश्नांची बरसात केली. कर्नाटकमध्ये विजय होतो, तेव्हा काँग्रेस जिंकते आणि हारते तेव्हा ईव्हीएम मशीन हारवते, हा काँग्रेसचा बालिशपणा आहे.असे मुनगंटीवार म्हणाले.
..तर कर्नाटकने त्यांना निवडून देऊ नये :
तेलंगणामध्ये ते जिंकले तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे जिंकले. अन् महाराष्ट्रात हारले तर ईव्हीएममुळे हारले, अशी दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. ईव्हीएमवर जर आक्षेप असेल तर निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. कारण त्यांच्यावर हा आरोप नसला पाहिजे की, आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी निवडून आणलं. छोट्या राज्यामध्ये आम्ही त्यांना निवडून आणतो, हा त्यांचा दुसरा हास्यास्पद आरोप आहे. कारण हा आरोप करून ते कर्नाटकचा अपमान करत आहेत. कारण कर्नाटक हे छोटे राज्य नाही. तर पर कॅपिटा इनकममध्ये पहिल्या पाच राज्यात कर्नाटक पुढे आहे. कर्नाटकबद्दल हे लोक असं बोलत असतील तर कर्नाटकच्या जनतेने त्यांना पुढचे 100 वर्ष निवडून देऊ नये, असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटकच्या जनतेला केले.
लष्करी आळी, तुडतुडा तसेच अन्य पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे मुनगंटीवार यांचे निर्देश .!
पिक विमा भरपाईतील अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनास सूचना ..!धान खरेदीची नोंदणी बंद राहिल्यास संस्थांवर कडक कारवाईचे निर्देश ..!
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी कापणीच्या आधी पिकांवर पडलेल्या लष्करी आळी आणि तुडतुडा सारख्या रोगांमुळे झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे निर्देश आज श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हिडियो कॉन्फरन्स) झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. धान खरेदी केंद्रांवर नोंदणी बंद ठेवून शेतकऱ्यांना नाडणाऱ्या संस्थावर व व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांमधे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. निवडणुक आचारसंहितेपूर्वीच पिक नुकसानीची भरपाई वितरित करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तत्कालीन कृषीमंत्र्यांनी तेव्हा दिले होते. त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचा आढावाही आज श्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पिक नुकसान भरपाईच्या विविध बिंदूंवर सविस्तर चर्चा झाली. पिक नुकसानीची २०२ कोटी रूपयांची भरपाई या आधीच वितरित करण्यात आलेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक गावांमधे पिकांवर कापणीपूर्वी लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच अनेक भागात तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे व सर्वेक्षण पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागांच्या मदतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मदत करावी असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे यासंदर्भातील प्रशासकीय अडचणी त्वरित दूर करण्यात याव्यात, याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून बैठका घेण्याची सूचनाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना नाडणाऱ्या संस्थांवर कडक कारवाईच्या सूचना :
धान खरेदी केंद्रांवर नोंदणी बंद ठेवून शेतकऱ्यांना नाडणाऱ्या संस्थांवर वेगाने कडक कारवाई करावी अशा सूचनाही श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनास दिल्या. कुणाच्याही गलथानपणामुळे अथवा राजकारणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान यापुढे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत चंद्रपूर जिल्हाधिकारी श्री विनय गौडा यांच्यासह कृषी विभागाचे नोडल अधिकारी व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.