उरलासुरला नक्षलवाद २०२६ पर्यंत संपवू .!
चंद्रपूर (वि.प्र.) : नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील नक्षलवाद जवळजवळ संपवला आहे. उरलासुरला नक्षलवाद येत्या २०२६ पर्यंत समुळ नष्ट केला जाईल, असा सज्जड इशारा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आज चंद्रपूरच्या सभेत दिला.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे वन तथा सांस्कृतिक कार्य मंत्री तथा भाजपा-महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, क्रिष्णालाल सहारे, करण देवतळे, देवराव भोंगळे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राहूल पावडे आदी उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजेच्या आत अमित शहा यांना येथील मोरवा विमानतळाहून रवाना व्हायचे होते. ते चंद्रपुरातील सभेच्या मंचावर आले तेव्हा त्यांच्याकडे अवघ्या पाच मिनिटाचाच वेळ होता. तरीही त्यांनी आल्याआल्या माईक हाती घेतला आणि दमदार भाषण केले. ते म्हणाले, मोदी सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी १५ लाख १० हजार कोटी रूपये दिले. सोबतच खुप सार्या विकासाच्या योजना दिल्या. येत्या काळात महायुतीचे सरकार आणा. अवघ्या पाच वर्षात आम्ही महाराष्ट्राचा गौरव परत मिळवून देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शहा गेल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत जोरदार भाषण झाले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी केलेल्या शेकडो योजनांची यादीच सादर केली आणि सर्व उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन केले. यावेळी किशोर जोरगेवार यांचेही भाषण झाले.
