मी नाराज नाही; आमदार म्हणून जनतेचे प्रश्न मांडणार .!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया .!

बल्लारपुर (का.प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (16 डिसेंबर) नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुनगंटीवार यांचे नाव नव्हते. त्यानंतर त्यांनी सोमवारी यासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेऊन सुमारे दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. आपण नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घेतले. नितीन गडकरी हे सुरुवातीपासून आपले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली असे मुनगंटीवार म्हणाले.
आपण कोणत्याही प्रकारे नाराज नाही. आपण कधीही नाराज असू शकत नाही. अनेक वर्ष आपण विरोधी पक्षांमध्ये होतो. त्यावेळी देखील आपण जनतेच्या हिताची कामे केली. आता आपण मंत्री नसलो तरी आमदार म्हणून जनतेच्या हितासाठी संसदीय आयुधांचा वापर करणार आहे. जनतेच्या सेवेचे व्रत आपण घेतले आहे, ते कायम सुरू राहणार असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले. 

पक्ष मोठा :

भारतीय जनता पार्टीचे आपण एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. याच जन्मात नव्हे तर पुढील अनेक जन्मातही आपण भाजपमध्ये असू. राष्ट्रसेवा करण्याची संधी आपल्याला भाजपनेच दिली. त्यामुळे पुढील रणनीती ही भाजपचा आमदार म्हणून जनसेवेची असेल. मंत्री म्हणून आपण यापूर्वीही जनतेचीच कामे करीत होतो. आता आमदार म्हणूनही जनतेची कामे करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 
पक्षाने आपल्याला वेगळी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याकडून कळले आहे. त्यामुळे पक्ष देईल ती नवी जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाशी संबंधित सर्व पुस्तकांचा पुन्हा आपण अभ्यास करणार आहे. संसदीय आयुधांचा वापर करीत आपण जनतेच्या सेवेचे कामे करणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून अशा प्रकारे वागणूक भाजपमध्ये दिली जात नाही. पक्षाने योग्य विचार करूनच काहीतरी निर्णय घेतला असेल असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले नाव यादीत असल्याचे सांगितले होते. पण नंतर नाव नव्हते. असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार हे कामकाजामध्ये उपस्थित नव्हते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पहिल्या दिवशी फार काही महत्त्वाचे कामकाज नव्हते. मंत्री म्हणून अनेक फाइल्स हाताळाव्या लागतात. अधिकाऱ्यांकडून चर्चेतील मुद्द्यांवर ब्रीफिंग केले जाते. आजचा कोणताही मुद्दा नव्हता. त्यामुळे आपण विधिमंडळात आलो नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत नाराज नाही. आपण नाराज राहणारे व्यक्ती नाही असे मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा नमूद केले.

मंत्रिपदाविना चंद्रपूर जिल्हा झाला पोरका .! 
सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश नसल्याने जिल्हावासियांची निराशा :

महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला आता सुरुवात झाली आहे. 33 वर्षानंतर नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाकडे. 30 वर्ष सलग आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मंत्री पदाला पोरका झाल्याचा संताप जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.
राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकासाचा झंझावात निर्माण केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतरचे पहिले ‘सरप्लस’ बजेट महाराष्ट्राला दिले. याशिवाय 50 कोटी वृक्षारोपण करीत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालटच सुधीर मुनगंटीवार यांनी करून टाकला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेतली होती. 

हा तर अन्याय आहे :

महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा आवर्जून समावेश असेल, असे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटत होते. त्यामुळे सलग सात टर्म विधानसभा जिंकणारे सुधीर मुनगंटीवार यांना काय मिळणार? याची उत्सुकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होती. मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्यामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला. चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत, हे विशेष.

मंत्रिपद मिळणे होते गरजेचे :

2019 मधील विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजारांवर मतं मिळाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी 33 हजार 440 मतांनी विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेली आघाडी मोठी आहे. 25 हजार 985 मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या आघाडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपमधील त्यांची ज्येष्ठता आणि जनसंपर्क पाहता त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळणे गरजेचे होते. मात्र असे न झाल्याने चंद्रपूर जिल्हातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत. 

जिल्ह्याच्या प्रगतीत मुनगंटीवारांचे योगदान :

सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचं रोपटं आता वटवृक्ष झालं आहे. भारतीय जनता पार्टीला चंद्रपूरमध्ये अभेद्य किल्ला बांधण्यामध्ये मुनगंटीवार यांचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे देखील चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भाजपकडून मोठी अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. भारतीय जनता पार्टी आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.




Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.