संत कोंडय्या महाराज देवस्थानाच्या विकासात खंड पडू देणार नाही - सुधीर मुनगंटीवार

श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान धाबा येथील १ कोटी ४९ लक्ष रुपयांच्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण .!

धाबा (वि.प्र.) : श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील विकासकामांसाठी आजवर जेव्हा जेव्हा माझ्याकडे मागणी करण्यात आली तेव्हा तेव्हा ती मंजूर केली. ज्यावेळी सभागृहाच्या बांधकामासाठी मागणी आली, महाराजांच्या कृपेने आपण ताबडतोब १ कोटी ४९ लक्ष रुपयांची मागणी पुर्ण केली. यापुढेही देवस्थानाच्या विकासात खंड पडू देणार नाही, असा शब्द राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर केलेल्या धाबा येथील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील सांस्कृतिक सभागृहाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या सभागृहासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मंत्री असताना १ कोटी ४९ लक्ष रुपये मंजूर केले होते. यावेळी त्यांनी संत कोंडय्या महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. देवस्थानाचे विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी त्यांचा भव्य सत्कार केला. या कार्यक्रमाला सिरपूर-कागजनगर (तेलंगणा) आमदार डॉ. हरीशबाबू पालवाई, राजुराचे आमदार देवराव भोंगळे, संस्थेचे अध्यक्ष सुहास माडुरवार, माजी अध्यक्ष अमर बोडलावार, दीपक बोनगिरवार, राजाभाऊ चिलमंतवार, विजयराव देशमुख,रामकृष्ण सांगडे,शेगमवार महाराज,बबन पत्तीवार,किशोर अगस्ती, मुनेश्वर हडपे,अशोक भस्की यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी विचार मांडले. ते म्हणाले, ‘सभागृहाच्या बांधकामासाठी माझ्याकडे ५० लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. पण चांगलं घडविण्यासाठी संत आपल्याला बुद्धी देतात. मी ५० लाख रुपयांच्या ऐवजी १ कोटी रुपयांना मान्यता दिली. सभागृह बांधायला घेतले तेव्हा पैसे कमी पडत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अतिरिक्त ४९ लाख रुपये देऊन काम पूर्ण केले. आज या सभागृहाचे लोकार्पण करताना मनस्वी आनंद होत आहे.’
तीर्थक्षेत्र योजनेंतर्गत मंदिराला सोलर यंत्रणा उपलब्ध करून दिली. याशिवाय वॉटर एटीएम, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रोड, शववाहिका आणि सीएसआर निधीतील रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली. संस्थानाने प्रत्येकवेळी जे मागितले ते देण्याचा प्रयत्न केला, भविष्यातही त्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देखील आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. 
हा परिसर शक्तिशाली आहे. इथे जे येतात ते सुख समाधान घेऊन जातात. त्यामुळे आता अपुऱ्या सोयी सुविधांचा प्रश्न सोडविण्याचा आणि यात्रेकरुंना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न संस्थानाने करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मला संधी मिळाली तेव्हा महाराष्ट्रातील यात्रास्थळांना मदत केली. पंढरपूरची वारी हरितवारी व्हावी यासाठी अर्थमंत्री म्हणून निधी उपलब्ध करून दिला. पंढरपूरमध्ये उत्तम असे तुळशी वृंदावन करून दिले. पंढरपूरलाच मल्टिप्लेक्सच्या धरतीवर ७० कोटी रुपये खर्चाचे संकीर्तन सभागृह केले. भीमाशंकरला १५० कोटी रुपये देऊन ज्येष्ठांसाठी दर्शनाची व्यवस्था. घृष्णेश्वरला महादेव वन निर्माण केले. भगवान महादेवांचे मंदीर छत्रपती शिवाजी महाजारांचे कुलदैवत आहे. मंदिर उंचावर असल्याने तिथे बेलाची पाने उपलब्ध व्हायची नाहीत. तातडीने बैठक घेतली आणि बाराशे बेलाची झाडं लावली. आज दहा ते बारा फुटाची बेलाची झाडं दिमाखात उभी आहेत आणि महाशिवरात्रीला बेलाची पानंही मोठ्या प्रमाणात आहेत, असेही आ. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कोराडीच्या जगदंबा मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचेही ते म्हणाले. 

आश्वासन अपूर्ण राहणार नाही : 

धाबा उत्तम व्हावा यासाठी १४ कोटी रुपयांचा प्रस्ताव आला आहे. तो पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. मंजूर करण्याची शक्ती परमेश्वर देईल. पण आश्वासन अपूर्ण राहणार नाही, यादृष्टीने लवकरच आढावा बैठक घेणार आहे. यात कोणतेही काम सुटणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.