फोरमला मिळालेलं यश .!
बल्लारपुर (का.प्र.) : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने गुरुवारी राज्यातील विविध वीज केंद्रांतील अभियंत्यांचे बदली आदेश जारी केले. या यादीत चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील तांत्रिक विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्याचाही समावेश आहे. धवे हे अभियंता अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत होते. एकाच पदावर दीर्घकाळ राहिल्यामुळे केंद्रातील पारदर्शकता आणि गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच, एकाच ठिकाणी राहून भ्रष्टाचारास अप्रत्यक्षपणे पाठबळ दिलं जात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. केंद्रातील काही ठेकेदारांमध्येही त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटू लागला होता.
या पार्श्वभूमीवर भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष अय्यूबभाई कच्छी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड आणि उपमुख्य प्रशासकीय अभियंता डॉ. भूषण शिंदे यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करत धवे यांची तत्काळ बदली करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार गुरुवारी कनिष्ठ अभियंता धवे यांची बदली खापरखेडा वीज केंद्रात करण्यात आली आहे. यापूर्वीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र धवे यांना तांत्रिक विभागातील आपल्या पदाशी एवढं आपुलकीचं नातं होतं की त्यांनी आपल्या पदावरून हटण्यास नकार दिला होता आणि तब्बल १५ वर्षे एकाच पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला.
आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की धवे आपल्या वरिष्ठांचा सन्मान ठेवून खापरखेडा वीज केंद्रात रुजू होतात का, की यापूर्वीप्रमाणेच वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवतात?
दरम्यान, चंद्रपूर वीज केंद्राच्या आरपी विभागात अजून एक उपकार्यकारी अभियंता आहेत जे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. असं वाटतंय की त्यांनी धवे यांचा विक्रम मोडायचा चंगच बांधला आहे. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या नावाचाही समावेश या बदलीच्या यादीत आहे. त्यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच पुढील बातमीत प्रकाशित केली जाईल.
