बल्लारपूरचे नाव देशात मोठे करा, आई-वडिलांना विसरू नका!

बल्लारपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थिती .! 

बल्लारपूर (का.प्र.) : विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यात त्यांचा स्वतःचा फायदा आहेच, पण बल्लारपूरचाही मोठा फायदा आहे. आपल्या भागातील एखादा विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थीनीचे राज्यभर, देशभर कौतुक होते, तेव्हा बल्लारपूरचे आणि येथील लोकांचेही कौतुक होत असते. माझ्या बल्लारपुरातील विद्यार्थ्यांनी देशात नावलौकीक प्राप्त करावा. त्याचवेळी ज्या आई-वडिलांनी संघर्षातून आपल्याला मोठं केलं, त्यांचाही विसर पडू देऊ नका, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
बल्लारपूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते चंदनसिगं चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपच्या महामंत्री संध्याताई गुरनुले, भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रणंजय सिंग, निलेश खरबडे, वैशाली जोशी, नम्रता आचार्य, रेणुका दुधे, देवा वाटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
ते म्हणाले, ‘स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी नाही तर माझ्या गावासाठी, जिल्हा आणि देशासाठी मी मेहनत करेन, हा भाव ठेवून भविष्य घडविणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षणाच्या संधी वाढाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, बल्लारपूर येथे S.N.D.T. विद्यापीठाचे केंद्र मंजूर केले. सोमनाथ (मुल) येथे भव्य कृषी महाविद्यालय उभारले जात आहे.आता मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजसाठी मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच बल्लारपूर येथे सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन लवकरच होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय आणि डॉ. बाबा आमटे अभ्यासिका उपयुक्त ठरत आहेत. यामागे आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी आणि जिल्ह्याचे नाव देशभरात गौरवाने घेतले जावे, याच उद्देशाने हे सर्व प्रयत्न सुरू आहेत.’ 
एसएनडिटीमध्ये ६२ अभ्यासक्रम सुरू होतील, तेव्हा या जिल्ह्यातील माझ्या बहिणींच्या कौशल्यांसाठी आकाश मोकळे होणार आहे. स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरच्या माध्यमातून आणखी एक दालन मोकळे करून दिले आहे. शिक्षणावर फक्त श्रीमंताचा अधिकार असू नये. उलट ज्यांच्या मनामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्ज्वलित करण्याची गरज आहे, त्या परिवारांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हा उद्देश आहे असेही ते म्हणाले. 
"शिक्षण हे स्वैराचारी असता कामा नये, ते संस्कारी असले पाहिजे". खूप शिकल्यावरही आई-वडिलांचा परिचय करून देताना लाज वाटत असेल तर काहीच उपयोग नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘माणूस द्या मज माणूस द्या’. शिक्षणाचा अर्थ माणुसकी जोपासणारा नसेल, तर त्या शिक्षणाचा फक्त धनप्राप्तीसाठी उपयोग होईल. आत्मविश्वास जागवावा लागेल. त्यातूनच पुढचा मार्ग सुकर होणार आहे. पैसा महत्त्वाचा आहे, पण सर्वस्व नाही. मन निराश न ठेवता जगातील उत्तमोत्तम ज्ञान कसे आत्मसात करता येईल, याचा सातत्याने विचार करा. कोणत्याही युगात शिक्षणाचे महत्त्व कायमच राहिले आहेत. म्हणूनच घरावरील नेमप्लेटवर नावाखाली शिक्षणचाच उल्लेख असतो. आपल्या संपत्तीचा नसतो. शिक्षण हे धनापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. शिक्षण हा सर्वाधिक मिरवण्याचा अलंकार आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 
आत्मविश्वासासोबत संधीकडेही बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर संधी सोडायची नाही. कोणत्या दिशेने जावे, असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. त्यासाठी आपल्यातील क्षमता, गुण, दोष कागदावर लिहून काढले पाहिजे. जगात परिपूर्ण कुणीच नाही. प्रत्येकात काहीतरी दोष आहेत. १४७ गुणदोष आहेत, असं स्व. श्रीकांत जिचकार म्हणायचे. प्रत्येकात एवढे गुणदोष असणे शक्यच नाही. त्यामुळे लिहून काढा, त्याचा करियर निवडताना फायदा होईल. स्वतःसाठी जगणे हा शिक्षणाचा अर्थ नाही. शिक्षण घेताना आई-वडिलांची सेवा करायचीच आहे. पण भारतमातेचाही विचार करा. देशासाठी मोठे व्हायचे आहे, हा विचार करा. ज्या देशाने मला सर्व दिलं, त्या देशासाठी मी देखील काहीतरी करू शकतो, असाही भाव मनात ठेवण्याचा सल्ला आ. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

प्रत्येक कामात परफेक्शन ठेवा : 

जपानमध्ये एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता एका टक्क्याने देखील कमी असेल तर ते उत्पादन रद्द केले जाते. शंभर टक्के उत्तम गुणवत्ता तिथे अनिवार्य आहे. त्यामुळेच जापान जगात सर्वात पुढे आहेत. एवढे परफेक्शन आपल्या कामामध्ये असले पाहिजे. एखादे बीज लावताना ते छोटेसे रोपटे असते. पण ते मोठे झाल्यावर तुम्ही तोडू शकत नाही. त्यामुळे भविष्यातील इच्छेचे बिजारोपण करा, रोज परिश्रमाचे पाणी टाका. तुमच्या मनातील इच्छेचा वृक्ष एवढा मोठा होईल, की तुमच्या ज्ञानाचा प्रकाश समाजालाही मिळेल, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 


‘योग, ध्यान करा; रोज डायरी लिहा’ :

मोठे होण्यासाठी छोटी छोटी कामे करा. योग करा, ध्यान करा. सात तास झोप घ्या. जरा विश्रांती घेऊन एखादं सुंदर गाणं ऐकलं पाहिजे. एकावेळी एकच काम करायचे. मेंदूला ताजेतवाने ठेवायचे असेल तर रोज डायरी लिहा. एक पान रोज प्रत्येकाने लिहायचेच आहे. मनात येईल, तो विचार लिहून ठेवा. त्यातून सकारात्मकता निर्माण होते. मोठे होण्यासाठी आई-वडिलांच्या सेवा करा, त्यांचा आदर करा. 

‘तर बल्बचा शोध लागलाच नसता’ :

१८५० ते ५५ चा काळ होता. शाळेतून मिळालेले पत्र मुलाने आईला दिले. आई पत्र वाचताना रडायला लागली. थॉमस अल्वा एडिसनने विचारले, या पत्रात असं काय आहे. आई म्हणाली, तुझ्या शिक्षिकेने लिहिले आहे की, ‘तुमचा मुलगा एवढा हुशार आहे की, इतर मुलांसोबत शिकवताना अडचण जात आहे. तुम्ही याला घरीच शिकवा.’ आईने घरीच शिकवायला सुरुवात केली. त्याला रसायनशास्त्रात खूप रस होता. पण संघर्ष कमी नव्हता. भाजी विकली, पेपर टाकले. त्याचा एक कानही निकामी झाला. मात्र जिद्द सोडली नाही. आज एडिसनच्या नावावर एक हजार पेटंट आहेत. बल्बचा शोधही त्यानेच लावला. खूप मोठा झाल्यावर एक दिवस त्याला ते जुने पत्र सापडले. त्यात लिहिले होते, ‘तुमचा मुलगा वर्गातील सर्वांत ढ विद्यार्थी आहे. त्याला शिकवताना अडचणी येतात. इतर विद्यार्थी बिघडण्याची शक्यता आहे.’ त्याच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते, ही कथा सांगून आ. श्री. मुनगंटीवार यांनी ‘कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती’ ही कविता विद्यार्थ्यांपुढे वाचली.
-----------------------

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा विषमतामुक्त गौरवशाली भारताच्या निर्माणाचा संकल्प .. 

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विकसित भारतावर मांडले विचार .. ब्रह्मपुरी येथील ‘विकसित भारत @ २०४७’ प्रोफेशनल मीट कार्यक्रमात साधला संवाद ..!

ब्रम्हपुरी : राष्ट्र सर्वोपरी हा विचार घेऊन देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी २०१४ साली जबाबदारी सांभाळली आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये जे होऊ शकले नाही ते फक्त अकरा वर्षांमध्ये करून दाखवले. त्यांनी पुढच्या अनेक दशकांचा विचार केला. देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे पूर्ण होतील त्यावेळी माझा भारत कसा असेल याची तयारी आज सुरू केली. २०४७ पर्यंत विषमतामुक्त, भयमुक्त, नक्षलमुक्त आणि त्याचवेळी रोजगारयुक्त, समतायुक्त, समरसतायुक्त गौरवशाली भारताच्या निर्माणाचा संकल्प केला, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  
ब्रम्हपुरी येथे आयोजित ‘विकसित भारत @ २०४७’ प्रोफेशनल मीट या कार्यक्रमाला आ. श्री. मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, महिला जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, रामजी लाखिया, प्रज्वलंत कडू, प्रा. शेख सर, अरुण शेंडे,अरविंद नंदूरकर, प्रकाश बगमारे, श्रीराम पाटील डोंगरवार, तनय देशकर,मनोज भूपाल, साकेत भानारकर, रामलाल दोनाडकर, मनोज वाठे, सुयोग बालबुधे, ज्ञानेश्वर दिवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘२६ मे २०१४ रोजी जनतेच्या आशीर्वादाने स्वतःला प्रधानसेवक ही उपाधी लावणारे देशगौरव श्री. नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान झाले. ९ जून २०२४ ला तिसऱ्यांदा लोकांनी आशीर्वाद दिला. जनतेसाठी आम्ही काय करतोय आणि आमचा संकल्प काय आहे, हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून मा. मोदीजींनी देशाला सांगितले. त्यांनी हजारो कामे केलीत. पण संपूर्ण देशात देशभक्तीचा विचार जागृत केला, हे मला सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण काम वाटते. देश एक आहे, राष्ट्र सर्वोपरी आहे, अशी भावना प्रत्येकात निर्माण केली. माझ्यादृष्टीने त्यांच्या प्रत्येक कामाचा केंद्रबिंदू राष्ट्रभक्ती आहे. ‘मै देश नहीं झुकने नहीं दुंगा’ हा त्यांचा भाव विकासाचा केंद्रबिंदू आहे.’
‘आपल्या देशाचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ ला सादर करण्यात आला. तो अर्थसंकल्प फक्त १९७ कोटींचा होता. त्यातील ४६ टक्के खर्च संरक्षण यंत्रणेवर होता. मा. मोदीजी पंतप्रधान व्हायच्या आधीपर्यंत म्हणजे ६६ वर्ष ९ महिने अकरा दिवस या देशाचे सर्वाधिक मोठे बजेट २०१३-१४ चे १६ लक्ष ६५ हजार २९७ कोटी होते. मात्र, मोदीजींसारखा एक नेता देशाच्या प्रगतीचा विचार करून येतो. आध्यात्मिक, शैक्षणिक, पायाभूत सुविधा, आर्थिक सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीचा प्रयत्न करतो. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर या अकरा वर्षांत आपले बजेट ५० लक्ष ६५ हजार कोटी रुपयांचे झाले आहे. तिप्पटीने बजेट वाढले आहे. १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली, त्यानंतर दरडोई उत्पन्न २०१३-१४ पर्यंत १ लक्ष २५ हजार रुपये होते. २०२३-२४ मध्ये २ लक्ष ७७ हजार ६०३ रुपये दरडोई उत्पन्न आहे,’ याचाही त्यांनी उल्लेख केला.

महामार्गांचे जाळे :

काँग्रेसच्या ५४ वर्षांच्या राज्यात महाराष्ट्रात ४७६६ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. गेल्या अकरा वर्षांत १८ हजार ३६६ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग झाले. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांची ही किमया आहे. 

स्वच्छता अभियान :

पंतप्रधान श्री. मोदीजींनी स्वच्छता अभियानात १२ कोटी शौचालये बांधली. आज गावागावात शौचालये झाली आहेत. एवढ्या वर्षांत महिलांची प्रसाधनगृहे बांधू शकले नव्हते. आज ९९ टक्के गावांमध्ये स्वच्छतागृह झालीत. २०४७ मध्ये विकसित भारत म्हणजे भयमुक्त, विषमतामुक्त, नक्षलमुक्त, रोजगारयुक्त, समरसतायुक्त, समतायुक्त, गौरवशाली भारत होय. मोदीजींनी पाच जन्म घेतले तरीही ३७० कलम रद्द करू शकत नाही, असे विरोधी पक्षातील नेते म्हणायचे. पण मोदीजींनी करून दाखवले.

आयात कमी, निर्यात वाढली :

आज आपण फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न बघतोय. झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट आणि झिरो इम्पोर्ट. एकेकाळी आमचे बजेट सैन्यदलाला लागणारी सामग्री खरेदी करण्यात जायचे. आता आयात कमी झाली आणि निर्यात वाढली. आपल्या युद्धसामग्रीचे महत्त्व वाढले आहे. कोरोनाकाळात अनेक श्रीमंत देशांमध्ये जनतेला मोफत व्हॅक्सीन देण्याची हिंमत नव्हते. मोदीजींनी २२० कोटी व्हॅक्सीन मोफत दिले. यासाठी हिंमत लागते.

जय अनुसंधान :

देशात इनोव्हेशन, इन्व्हेशन्स कमी होते. २०१४ पूर्वी देशात ५ आणि ७ हजार पेटंट भारतात व्हायचे. अमेरिका ५ लाखांच्या वर होते. मोदीजींनी ‘जय जवान, जय किसान आणि जय अनुसंधान’चा नारा दिला. आता देशात ७० ते ७५ हजारांच्या वर पेटंट होऊ लागले आहेत. आपला देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल याचे मोठे योगदान आहे.
 

विकसित राष्ट्राची पायाभरणी :

काशी कॉरिडोर, करतारसिंग कॉरिडोर, वन रँक वन पेन्शनचा निर्णय केला. पुलवामा सर्जिकल स्ट्राईक तर हा देश कधीही विसरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महू, चैत्यभूमी, दीक्षाभूमी, लंडनचे घर, महाड विकसित केले. जनधन खाते मोठ्या प्रमाणात उघडले गेले. देशात गरिबांची बँक खातीच नव्हती. इन्कमटॅक्स रिटर्नमध्ये सात पटींनी वाढ झाली. आयुष्यमान भारतने अख्ख्या देशाला दिलासा दिला. देशात एकच एम्स होते. अटलजींनी सहा निर्माण केले. मोदीजींनी पंधरा एम्स वाढवले. आज गडचिरोली, वर्धा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये मेडिकल कॉलेज आले. लोकांचा विश्वास असेल तर एक नेता विकसित राष्ट्र निर्माण करू शकतो.

४४ लक्ष कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात :

आयआयएम फक्त १३ होते. अकरा वर्षांत वीस झाले. विद्यापीठे ७२३ होती, आज दिड हजारांहून अधिक झाली आहेत. मोदीजींनी ४४ लक्ष कोटी रुपये जनतेच्या खात्यांमध्ये थेट देण्याचे काम केले. देशाला पुढे नेण्याचा संकल्प फक्त मोदीजींनी करून होणार नाही. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. गावांमधील शाळांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे. 

चंद्रपूरची सैनिकी शाळा :

देशातील पहिली सैनिक शाळा १९६१ मध्ये स्थापन झाली. आज एनडीएच्या परीक्षेत देशातील सर्वाधिक विद्यार्थी चंद्रपूरच्या सैनिक शाळेतून पास झाले, याचा मला खूप आनंद आहे. हे कळल्यावर सर्जिकल स्ट्राईक करणारे राजेंद्र निंभोरकर यांनी कौतुक करण्यासाठी मला फोन केला. आज ही सैनिक शाळा बघण्यासाठी लोक येतात आणि अभिमान व्यक्त करतात. 

वाघांचा जिल्हा :

जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूरमध्ये आहेत. काँग्रेसने वाघांचे संवर्धन केले नाही. मी वनमंत्री झालो तेव्हा ११२ वाघ होते आज ६०० हून अधिक वाघ झाले आहेत. आपण वन अकादमी केली. चंद्रपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल तयार झाले. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासातूनच देशाची प्रगती होईल. शेतकरी, गरीब, महिला, युवा प्रत्येक घटकासाठी मोदीजींनी कामे केली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".