वृक्षारोपण व गुणवंतांचा सत्कार .. शिंदे साहेबांचा ८३वा जयंत्युत्सव साजरा .!
बल्लारपूर (का.प्र.) : यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी,भद्रावती द्वारे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव तथा माजी आमदार स्व. निलकंठराव शिंदे साहेब यांचा ८३वा जयंत्युत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्रीमती निलिमा ताई शिंदे यांनी "स्व. नीलकंठराव शिंदे साहेबांचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हे प्रेरणादायी आहे" असे मार्गदर्शन केले.
१ जुलै २०२५ ला स्व. निलकंठराव शिंदे साहेब यांचा ८३वा जयंत्युत्सव यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चीचोर्डी, भद्रावती येथे उत्साहात संपन्न झाला. या जयंती उत्सवाप्रित्यर्थ दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती निलिमा ताई शिंदे विश्वस्त, शिक्षण शिक्षण संस्था भद्रावती ह्या होत्या. प्रमुख अतिथी डॉ विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ कार्तिक शिंदे सचिव, डॉ विशाल शिंदे सहसचिव, डॉ जयंत वानखेडे विश्वस्त, प्रा धनराज आस्वले जेष्ठ समाजसेवक भद्रावती, डॉ सुधीर मोते प्राचार्य हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन व माल्यार्पन करून करण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमती नीलिमा ताई शिंदे यांनी स्व. नीलकंठराव शिंदे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांचे कार्य खरच प्रेरणादायी आहे, त्यांच्या कार्याचा आदर्श बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन केले. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे सर यांनी "वृक्षाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करत असताना वृक्षारोपण काळाची गरज" असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ विशाल शिंदे, डॉ जयंत वानखेडे प्रा. धनराज अस्वले सर यांनी साहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना लोकसहभागातून आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ बक्षीस देण्यात आले. कु. राई दास ह्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना चिकाटी व अभ्यासातील सातत्याने आपले यश संपादन करता येते असे सांगितले.प्रा. सौ. उज्वला वानखेडे यांनी भावगीतातून साहेबांना आदरांजली अर्पण केली. महाविद्यालयाच्या परिसरात याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण मत्ते यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.