स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांना बळ देणारी : निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री

बल्लारपूर (का.प्र.) : कांग्रेस पक्ष तळगळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आजचे सत्ताधारी मतचोरीतून सत्तेवर आले आहे. त्यांच्या विरोधात देश पातळीवर विरोधी पक्ष नेते राहूल गांधी आंदोलन करत आहेत. आपण निराश होऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिद्दीने व आत्मविश्वासाने लढू. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेत आपली सत्ता आणू.ही निवडणूक कार्यकर्त्यांची असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांना बळ देणारी आहे,असे प्रतिपादन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री यांनी बल्लारपूर येथे केले.बल्लारपूर तालुका व शहर कांग्रेसच्या वतीने स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे गुरुवार दि. १६ /१०/२०२५ रोजी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची आढावा सभा पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 


सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कांग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंग रावत,प्रदेश कांग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, कांग्रेसच्या जेष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे, शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम शेख,डॉ. अनिल वाढई यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


याप्रसंगी सुभाष धोटे म्हणाले, आपली लढाई विचारसरणीची आहे. कांग्रेस पक्ष मजबूत करणे, प्रत्येक कार्यकर्त्यांचे लक्ष पाहिजे. कार्यकर्त्यांच्या बळावर आम्हाला नेतेपण मिरवता येते.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ. नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद जिद्दीने लढून आपली सत्ता आणू. उमेदवारी मागणारे, अनेक असतात. मात्र,उमेदवारी एकालाच मिळते.यामुळे मतभेद वाढतात.मतभेद विसरून जाऊ, एकत्रित प्रयत्नातून निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 
प्रास्ताविक घनश्याम मुलचंदानी यांनी केले. संचालन शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी, तर आभार प्रदर्शन नरेश मुदंडा यांनी केले. यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील कांग्रेसचे पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".