"जिंदगी में ऊँचा उठने के लिए
किसी डिग्री की जरूरत नही हैं,
अच्छे शब्द ही इंसान को बादशाह बना देते है"।
आपले जीवन यशस्वी होण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीची भागीदारी असते. आपले कुटुंब, आपले मित्र मैत्रिणी परिवार आणि सर्वात म्हणजे आपले शिक्षक. आपल्या जीवनातील अविभाज्य घटक. ज्यांच्यामुळे आपले शिक्षण, आपले संस्कार यांना एक आकार मिळतो. त्यामुळे ते नेहमीच पूज्यनीय आहेत. आजही आपल्याला शिकविलेले सर,मॅडम मग त्या बालवाडीतील असल्या तरीही त्यांच्या भेटीने आनंद मिळतो तो परमानंद पण आजकलचे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये हे नाते नाही. शिक्षक दिसले तरी प्रणाम, नमस्कार तर सोडाच पण साधी ओळखही दाखवत नाहीत विद्यार्थी. खरंच किती दुर्दैवी ते विद्यार्थी आणि शिक्षक !
"जल जाता है वो दिए की तरह
कही जीवन रोशन कर जाता हैं,
कुछ इसी तरह से हर गुरु
अपना फर्ज निभाता है"।
त्यांच्या मेहनतीला,कष्टाला तोडच नाही. वाचकहो, ह्याच परमानंदाची अनुभूती मला काल आली आणि मन परत एकदा बालपणात भारत विद्यालयामध्ये गेले. ती शाळा, तो लाकडी मोठा दरवाजा, ते पिंपळाचे झाड, पाण्याचा टॅंक, ते वर्ग आणि सर्व शिक्षक. काल माझ्या भाच्याची मुंज होती आणि मला कळालं माझ्या लहानपणीचे भारत विद्यालयाचे सर -""कुमार सर"" आले आहेत. मग काय आल्यापासून त्यांना भेटीची उत्सुकता. जवळपास तीस वर्षानंतर मी त्यांना भेटणार होते. कुमार सर मला ओळखतीलं की नाही ? त्यांच्या लक्षात येईल की नाही ? या संभ्रमात मी आणि सर समोर दिसले. त्यांच्यात काहीच बदल झाला नव्हता फक्त वयोमानाने गळ्याला पट्टा होता. मी त्यांच्याजवळ गेले आणि पाया पडले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर पुसटसा प्रश्न चिन्ह दिसला मला. मी लगेच म्हणाले,""सर, मी स्मिता अंबुलगेकर", मग काय त्या.₹ प्रश्नचिन्हाने ताबडतोब आनंदाच्या छटांची जागा घेतली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले आणि हसले," अगं ओळखले मी तुला! तु इंग्रजी शाळेमध्ये शिक्षिका आहेस ना, काल तुझी आठवण काढली,खूप नाव कमावलं, खूप मोठी झालीस,मग काय मी त्यांच्या त्या कौतुकाने भरावून गेले ही तर खरी यशाची पावती, आदर्श पुरस्कार. जवळ उभे असलेले माझे वडील, माझे मामा या सर्वांकडे पाहून सर म्हणाले" मुलगी खरच खूप हुशार,ॲक्टिव आहे अगदी लहानपणापासूनच". त्यांच्या या कौतुकास्पद उद्गार ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू जमा झाले. भेटीचा आनंद माझ्या चेहऱ्यावर आणि कुमार सरांचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता,जाणवत होता. जीवनात अजून खूप मोठी हो! यशस्वी हो ! हा त्यांचा आशीर्वाद माझ्या जीवनातील अमूल्य भेट होती. एक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखं वाटलं. शिक्षकांचा आदर आणि विद्यार्थ्यांचा सन्मान,कौतुक याच तर दोन गोष्टी आयुष्यात हवे असतात. ज्या ज्या शिक्षकांनी आपले ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्यांना आयुष्याच्या संघर्ष साठी तयार केले असते अशा प्रत्येक शिक्षकांना हा गुरु दर्जा द्यावा. आदर, सर्वधर्म समभाव, एकता,राहणीमान,मैत्री,प्रेम या सर्व गुणांचा उदय हा शाळेतूनच होत असतो आणि त्यांना चालना देणारे सगळे शिक्षकच असतात मग त्यांना विसरुन कसे चालेल. नोकरी निमित्त म्हणा किंवा आपल्या व्यस्त जीवनातून म्हणा त्यांना घरी जाऊन भेटता येत नाही पण प्रसंगी भेटल्यावर त्यांचा आपण होऊन सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आजही माझ्या प्रत्येक कार्याला,लेखाला, व्हिडिओला,आवर्जून कमेंट करणारे फोन करून कौतुक करणारे माझे "" बाभुळगावकर सर". मला नेहमी प्रेरणा देतात. त्यांच्या या प्रेरणेमुळेच माझ्यात उत्साह निर्माण होतो. उल्हास निर्माण होतो. खरचं असे अनेक शिक्षक मला लाभले मी त्यांची ऋणी आहे. शिक्षकांची कौतुकाची थाप ही नेहमीच पाठीवर असते. त्यामुळे खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आजही सर्व शिक्षकांशी मी बांधली गेली आहे.
" मुझे पढ़ना, लिखना सिखाने के लिए
मुझे सही गलत की पहचान सिखाने के लिए
मुझे बडे सपने देखने और आकाश में घुमने का सहारा देने के लिए
मेरे मित्र, गुरु और जीवन का प्रकाश बनने के लिए",
सभी शिक्षकों को
शुक्रिया..! धन्यवाद.. प्रणाम..!!
सौ स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर .. ✍️