कोरोनाला सामोरे जाण्यासाठीच नियतीने उध्दव ठाकरे यांची निवड केली असावी!

मुंबई (जगदीश काशिकर) - सत्ता येते आणि जाते, पण लक्षात राहते ती कारकीर्द. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना एका अनपेक्षित पेच प्रसंगात महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली लागली आणि अशाच अनपेक्षित घडामोडीमुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. पण या ३१ महिन्यातील त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ कोरोना विरोधातील यशस्वी लढ्यात व्यतीत करावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. त्यामुळे कदाचित कोरोना संकटातून महाराष्ट्राची सुखरूप सुटका करण्यासाठी नियतीनेच उध्दव ठाकरे यांची निवड केली असावी, असा विश्वास शिवसेना पक्ष प्रवक्त्या आणि विधान परिषद सदस्या प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाकरे यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य पदाचाही राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. या घटनाक्रमावर बोलतांना प्रा डॉ कायंदे म्हणाल्या, उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या चार महिन्यात कोरोना संकट आले. सर्व कारभार ठप्प झाला होता. आर्थिक घडी विस्कटली होती. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोना संसर्गाचा विस्फोट होण्याचा धोका होता. कायंदे पुढे म्हणाल्या, साऱ्या जगाचे लक्ष धारावीकडे होते. केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि भाजप शासित अन्य राज्य धारावीचा मुद्दा पुढे करून उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत होते. ठाकरे यांनी ही परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली. जनतेशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे सतत संवाद साधून परिस्थितीची जाणीव करून देत राहिले. सत्य लपवले नाही आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत राहिले, असे सांगून प्रा डॉ कायंदे म्हणाल्या, ठाकरे यांच्यामुळेच कोरोना संकटातून महाराष्ट्र बाहेर पडला. प्रा डॉ कायंदे यांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशातील अनुक्रमे कोरोना मृत्यू लपविण्याचा प्रयत्न आणि गंगा नदीत कोरोना रुग्णाचे मृतदेह आढळून आले होते याकडे लक्ष वेधले. उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थलांतरित उत्तर भारतीय मजुरांना वेशीवर थांबवत होते तेव्हा ठाकरे सरकारने केलेल्या मदतीची आठवण आजही हे मजूर काढतात आणि ते उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त करतात याकडेही प्रा डॉ कायंदे यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांची नेमणूकच कोरोना संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी केली होती. हे संकट आता निवळले आहे, त्यामुळे आता ठाकरे यांनीही राजीनामा देवून पुन्हा पक्ष कार्याला वाहून घेण्याचे सूतोवाच केले आहे, असा विश्वास प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.