बल्लारपुर (का.प्र.) - चिंचोली येथील महाविद्यालय शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनी परीक्षेसाठी राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात येत असताना खामोना जवळील दर्ग्यासमोर झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार निंबाळा येथिल अंजली नंदलाल मेश्राम वय 20 वर्ष व तिची वर्ग मैत्रीण सगुणा भिवसन झाडे वय 20 वर्ष ह्या दोघीही निंबाळा येथुन विद्यापीठाची परीक्षा देण्याकरिता राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात येत असताना ट्रक ला ओव्हरटेक करण्याच्या नादात राजुऱ्या कडून कोरपना येथे आपल्या बहिणीच्या घरी जात असलेल्या चुनाळा येथील विशाल रामचंद्र चिंचोलकर वय 26 वर्ष ह्याच्या दुचाकीला धडकल्याने रस्त्यावर कोसळल्या.दरम्यान मागुन येत असलेल्या ट्रक चे चाक एका युवतीच्या डोक्यावरून गेल्याने ती गतप्राण झाली तर रस्त्यावर आदळल्याने लागलेल्या मारामुळे दुसऱ्या युवतीनेही जागीच प्राण सोडले. विद्यापीठाची परीक्षा देण्यास निघालेल्या युवतींची काळाने अचानक परीक्षा घेतल्याने दोन्ही युवतींचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली व पंचनामा करून दोन्ही युवतीचे शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा उप जिल्हा रुग्णालयात पाठविले मात्र ज्या ट्रक खाली युवती आली त्या ट्रक बद्दल कुठलीही माहिती मिळू शकली नाही. राजुरा पोलिसांनी विशाल रामचंद्र चिंचोलकर ह्याला ताब्यात घेतले असून एपीआय साखरे ह्यांच्या नेतृत्वात घटनेचा तपास सुरू आहे.