१५ दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही!

१५ दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही ;संकटात सापडलेल्या जनतेसाठी तात्काळ मदतकार्य सुरू करा - जयंत पाटील.. नांदेड येथील अतिवृष्टीत सापडलेल्या गावांची जयंत पाटील यांनी केली पाहणी..

मुंबई (जगदीश काशिकर) - महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत मात्र अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदेड दौर्‍यावर असून त्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची व शेतीची पाहणी केली. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचे संकट असून वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी नदीपात्रातून गावांमध्ये शिरले आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना निळा, आलेगाव, एकदरा या गावांची पाहणी प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. 

संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले आणि गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला तरी सरकार तयार झाले नाही. कुणाला किती खाती द्यायची आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे याच्यातच यांचा वेळ जात असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.